श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 69 ☆
☆ तरी म्हणे बायको.. ☆
घरासाठी तीच राबराब राबते
तरी म्हणे बायको कुठे काय करते
सगळ्यांना उठताच हवा आहे चहा
घरी माणसं दोनच वा असोत दहा
सगळ्यांचा चहा टेबलावर ठेवते
तरी म्हणे बायको कुठे काय करते
झाडलोट जन्मजात मिळते ही कला
घाम करी फरशिचा बोळा हा ओला
घर नीटनेटकं नि साफसुफ ठेवते
तरी म्हणे बायको कुठे काय करते
नाष्टा प्रत्येकाला वेगळाच हवा
कुणी म्हणे थालिपीठ कुणी म्हणे रवा
दोन तलवारीनेच युद्ध ती लढते
तरी म्हणे बायको कुठे काय करते
खाली आहे आग वर ठेवला तवा
तिचा अग्निहोत्राशी रोज खेळ नवा
हात अन् भाकरी दोन्हीही भाजते
तरी म्हणे बायको कुठे काय करते
चपळता यावी म्हणून टाकते कात
कमी नाही कुठे ही बाईची जात
संकटांना साऱ्या ती पुरून उरते
तरी म्हणे बायको कुठे काय करते
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈