श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
☆ रंजना जी यांचे साहित्य # 54 – घडू दे दर्शन ☆
तुच द्रौपदी, आहिल्या,
सीता, तारा, मंदोदरी।
किती युगे पालटली
कसोटीच्या त्याच परी।
इथे लागते पणाला
रोज द्रौपदी नव्याने ।
कान्हा विसरला आज
धावा ऐकून धावणे।
किती शापीत आहिल्या
शीलारुप गावोगावी।
तया उध्दारीना कोणी
आज रामाच्या अभावी।
दिला शब्द पाळणारा
हरिश्चंद्र ना जगती।
रोज लिलाव मांडण्या
हवी त्यास तारामती।
लाखो रावण मातले
पेटविल्या सीता किती।
हातबल राम आज
विसरला बाण भाती।
ज्ञानी योद्ध्या रावणास
उमजेना मंदोदरी।
पातिव्रत्य दानवाचे
सांभाळते घरोघरी.।
सत्व परीक्षा सोडून
करी असूर मर्दन।
काली दुर्गा भवानीचे
पुन्हा घडू दे दर्शन।
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈