श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 80 ☆ माणसा तू महान आहेस ☆
माणसा तू महान आहेस
तू भुंकू शकतोस कुत्र्यासारखा
तू कावळ्यांसारखी कावकावही करतोस
कधीकधी डोमकावळ्या सारखाही वागतोस
खरंच माणसा तू महान आहेस…
मोरासारखा पदरपिसारा फुलवून नाचू शकतोस
डूख धरून बसू शकतोस नागासारखा
चित्त्याच्या वेगाने धावतोय तुझा मेंदू
खरंच माणसा तू महान आहेस…
शाखाहारी प्राण्यांसारखा पालाही खातोस आणि
सिंहासारखं मांस भक्षणही करतोस
हिंस्त्र प्राणी शिकार करतात पोटासाठी
तू मात्र स्वतःच्या स्वार्थी अहंकारापोटी
चालतोस गोळ्या, असहाय्य प्राण्यांवर,
कधीकधी आपल्या आप्तांवर सुद्धा
खरंच माणसा तू महान आहेस…
खरंच माणसा तू माणूस आहेस का जनावर ?
हेच कळत नाही, अजून आम्हा प्राण्यांना
पण तरीही
खरंच माणसा तू महान आहेस…
कारण संशोधनाची किमया
देवानं फक्त तुलाच बहाल केली आहे
म्हणूनच तू महान आहेस
म्हणूनच तू महान आहेस…!
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈