श्री सुजित कदम
☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #63 ☆
☆ शेवटचं पत्र..! ☆
(एखादी कविता ह्या काव्य संग्रहातून)
विसरली असशील
तू मला पण मी
मी तुला विसरलो नाही
आयुष्यातलं पहिलं वहिलं प्रेम
असं विसरून
चालत नाही
आठवणीत आहेस तू
अजूनही माझ्या
नसेन आठवणीत
मी अजूनही तुझ्या
आठवणीत आहेत माझ्या
चार दोन भेटीगाठी
एक दोन मिठ्या
विसरली असशील तू
तेव्हाच्याच काही शपथा
आठवतही नसेल तुला
मी तुला दिलेलं गुलाबाचं फूल
मला मात्र आठवतंय
ते तू ठेवलं होतं
तुझ्या पुस्तकात जपून
कदाचित ते अजूनही
त्या पुस्तकातच असेल
लक्षात नाही तुझ्या म्हणून
ते पुस्तकही तू दुसरंच
कोणाला दिलं असेल,
जाणवतो मला अजूनही
तुझा तो हळुवार स्पर्श
लक्षात नसेल तुझ्या
तू मला दिला होतास
एक नक्षीदार शंख
जपून ठेवली नसशील
मी तुला दिलेली काही
प्रेमपत्रं..
अजूनही माझ्या वहीत
आहे तुझं ते शेवटचं पत्र..
© सुजित कदम
पुणे, महाराष्ट्र
मो.७२७६२८२६२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈