श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 82 ☆
☆ भिती ☆
मला सूर्याची भिती वाटते
आग ओकत असतो डोक्यावर
पत्र्याच्या घरात जीव घाबरतो
बाहेर सावलीला जावं तर
झाडांची बेसुमार कत्तल झालेली
कुठल्याही लढाईखेरीज
आणि कत्तल करणारे पहुडलेल
एसी लावून गादीवर…
उष्माघाताने जीव जातात
तुमच्या माझ्यासारख्यांचे
आणि सूर्याला त्याचं देणं घेणंही नसतं…
तशीच ही थंडी, कुठून येते ते कळतच नाही
वाजते पण आवाज करत नाही
घरात हिटर आहे ना ?
मग काळजी कशाची ?
बाहेर थंडीत कुडकुडणाऱ्यांची काळजी करायला
परमेश्वर आहेच ना !
कधीकधी परमेश्वर, दानशूराच्या रुपात
वाटतो गरिबांना, काही शाली काही ब्लँकेट्स
तरी मरतातच काही कुडकुडून
या थंडीच्या त्रासदीने…
पाणी घुसतं झोपडपट्यांमधे
चाळीत आणि बंगल्यात सुद्धा
सुनामीच्या लाटा उध्वस्त करतात किनारे
वाहू लागतात निर्जीव वाहनांसोबत
प्राणी आणि माणसं सुद्धा
कशासाठी हा कोप, कशासाठी हे तांडव
अरे जीव जगवण्यासाठी हवी
थोडी मायेची उब,
तहान लागली तर घोटभर पाणी आणि
प्रसन्न राहण्यासाठी छान गुलाबी थंडी…
पण किती या दुःखाच्या डागण्या
फक्त सुखाची किंमत कळण्यासाठी…
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈