सुश्री प्रभा सोनवणे
(आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी के उत्कृष्ट साहित्य को साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 83 ☆
☆ आरक्षण …. ☆
आयुष्याचा प्रवास करताना
प्रत्येकालाच हवी असते
आपापली आरक्षित जागा!
धकाधकीच्या जीवनात ही
लळत लोंबत जगण्याची वेळ
कधीच न आलेल्या प्रवाशाला तर
सहनच होत नाही गर्दीतली घुसमट!
आता निवांत रमावे इथे
असे वाटत असताना,
खिडकीतल्या चिमण्यांना
हुसकावून द्यावे अंगणात
तसे माहेरवाशिणींना
वागविले जाते तेव्हा
बंद करावा माहेरचाही प्रवास!
आपले अस्तित्व नाकारणा-यांकडे
थांबू नये मुक्कामाला!
सोडू नये आपली आरक्षित हक्काची जागा,
विनाआरक्षण करू नये प्रवास कदापिही!
कारण वयाचा आणि नात्याचा मान राखून
चटकन उठून जागा देणा-यांची पिढी
संस्कारली गेली नाही आपल्याकडून!
म्हणूनच करावी तरतूद,
आपल्या आरक्षणाची
कुठल्याही प्रवासाला निघण्यापुर्वी!
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
सार्थक रचना
बहुत बहुत शुक्रिया सर
धन्यवाद हेमंतजी ?