श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 83 ☆
☆ विचारांची चादर ☆
उजाडलेल्या अस्तित्वाची
झोपलेल्या देहाला जाणीव होते
बंद डोळ्यांना
प्रकाश किरणांची
चाहूल लागताच
मंदावलेली स्पंदणे
कार्यरत होतात
देहावरची स्वच्छ चादर झटकून
प्रसन्न विचारांचा रथ
धावू लागतो प्रगती पथावर
कधीकधी ह्याच चादरीवर
अविचारांचा धुरळा बसायला सुरूवात होते
चादरीच्या छिद्रांमधे
दाटी वाटीने बसतात धुळीचे कण
मज्जाव करतात
सूर्यकिरणांनाही आत येण्यास
आणि आपण बसतो
पहाट होण्याची वाट बघत…
काळोखाच्या महासागरात
गटांगळ्या खावू लागतो
सुन्न झालेला देह
सागराचा तळ ओढत असतो पाय
मळक्या चादरीसह
मरून जाते हातपाय मारण्याची इच्छा
साऱ्या भविष्याच्या वाटा
अंधुक दिसू लागतात
बुजलेल्या छिद्रांमुळे
स्वच्छ विचारांची चादर
अविचारांच्या धुळीने
काळीकुट्ट होण्यापूर्वी
नीती मुल्यांच्या साबणाने
धुवायला हवी…
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈