मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #6 – अपहरणाचा बळी ☆ – श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है ।  साप्ताहिक स्तम्भ  अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती  शृंखला  की अगली  कड़ी में प्रस्तुत है एक भावप्रवण  कविता  “ अपहरणाचा बळी ”।)

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 6 ☆

? अपहरणाचा बळी ?

 

डोळ्यांचा या ओला पडदा वाळत नाही

माझा जिवलग सूर्य मजवरी भाळत नाही

 

गळून पडली दोऱ्या मधली फुले सुगंधी

कुणीच दोरा गजरा म्हणुनी माळत नाही

 

वाऱ्याने या सुगंध सारा पसार केला

वाऱ्यावरती कुणी ठेवली पाळत नाही

 

प्रेमग्रंथ हा जीर्ण जाहला तरी चाळते

तुझ्या वेदना आता मजला जाळत नाही

 

स्नान कराया पाप पोचले गंगेकाठी

गंगा करते पवित्र त्याला टाळत नाही

 

अपहरणाचा बळी आजही होते सीता

तरी कुणीही लंका आता जाळत नाही

 

गोठुन गेल्या का लोकांच्या सर्व भावना ?

कुणी आसवे आता येथे ढाळत नाही

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

[email protected]