मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ कवितेच्या प्रदेशात #6 – रिमझिम के तराने ☆ – सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

 

 

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात”  में  उनकी  वर्षा ऋतु से संबन्धित कवितायें और उनसे जुड़ी हुई यादें। निःसन्देह यादें विस्मरणीय होती हैं किन्तु,  मैं विस्मित हूँ!  सुश्री प्रभा जी के पास तो वर्षा ऋतु से संबन्धित कविताओं के संस्मरणों का एक इतिहास है १९७८ से लेकर सतत प्रकाशित रचनाएँ, मानधन, अग्रज साहित्यकारों का स्नेह और पाठकों का सम्मानधन । प्रत्येक रचना के साथ कुछ न कुछ तो जुड़ा ही है। उन्होने इस सुदीर्घ साहित्यिक अविस्मरणीय इतिहास को सँजो कर रखा और हमारे पाठकों के साथ साझा किया इसके लिये उनका आभार और लेखनी को नमन।

उनके अविस्मरणीय स्वर्णिम संस्मरणों के प्रति उनके विचारउनके ही शब्दों में –

“ पाऊस खुप आवडता ऋतू, आयुष्यातल्या अनेक पावसाळ्यांच्या अनेक आठवणी …..मागच्या पावसाच्या आठवणी जाग्या झाल्या  त्या आजच्या  # *कवितेच्या प्रदेशात*  मध्ये सादर करते….” – प्रभा सोनवणे

अब आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी का साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं । )

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 6 ☆

 

 ☆ रिमझिम के तराने ☆

 

पावसाळ्यात  पावसाच्या कवितांना  उधाण येतं! अनेक संस्थां वर काम करत असताना, जुलै  ऑगस्ट मधे  पावसाच्या कवितांचे  आयोजन केले आहे.

परवा स्वतःच्या पावसाच्या  कविता  एकत्र वाचल्या आणि किती तरी पावसाळे आठवले.

माझ्या *अनिकेत* या संग्रहातील कवितांमधून पावसाच्या कविता निवडायला सुरुवात केली. हा माझा १९७८ पासून चा पाऊस आहे.

ही कविता १९८० साली  *स्वराज्य* साप्ताहिकात सचित्र प्रकाशित झाली होती आणि या कवितेचे दहा रूपये मानधन ही मिळाले होते. ती ही कविता–

 

*सखी मेघ बरसती रिमझिम रिमझिम*

*जणू छेडते कुणीतरी सुरेल सरगम*

          (*अनिकेत*-   बालमैत्रिणीस)

 

त्याच काळात लिहिलेली ही पुढची रचना-

 

*रिमझिम बरसली धारा*

*अंगाला झोंबे वारा*

(*अनिकेत* –गीत )

 

*पाऊस असा पाऊस तसा*

*पाऊस आहे कसा कसा* ?

 

ही आणि पुढच्या ब-याच रचना  अनिकेत मधल्या च आहेत. पाऊस शिर्षकाची ही कविता पहिल्यांदा टिळक स्मारक मंदिरात सादर केली तेव्हा कविसंमेलनाचे अध्यक्ष-न.म.जोशी  यांनी या कवितेचं कौतुक केलं होतं.

दुसरी  एक गोष्ट या कवितेच्या बाबतीतली अशी की,या कवितेची चोरी झाली होती.

माझी *सखी* ही कविता मला टीव्ही वर चा सिनेमा पहाताना झालेली… टीव्ही वर *तुमसा नहीं देखा* हा लागला होता..मी शाळेत असताना पाहिला होता….शाळेचे दिवस आठवले आणि ही कविता  जन्माला आली

 

*आयुष्यातचं पुस्तक  उघडलं की*

*पहिल्यांदा तू सामोरी येतेस*

*तुझा नितळ सावळा रंग*

*दाटलेल्या मेघाला सारखा*..

*बरसत रहातो पुस्तकभर*  !

 

यानंतर ची अष्टाक्षरी रचना ही याच मैत्रिणी वर केलेली..अकाली हे जग सोडून गेलेली ती….

 

*मेघ बरसला  आज*

*आल्या श्रावणाच्या सरी*

*तुझी आठवण येता*

*झाले कावरी बावरी*

 

ही कविता मी १९९२ साली लिहिली. आणि मैत्रिणी ला वाचून दाखवत असताना तिथे तिच्या बिल्डींग मधे रहाणारी अमराठी-पंजाबी शीख मुलगी आली होती. त्यानंतर ती पंजाबी मुलगी मला पंधरा सोळा वर्षांनी रस्त्यात भेटली..तेव्हा ती म्हणाली, “मुझे  आपकी कविता आज तक याद है जिसमे  आपने लिखा था, मेरी पाजेब कुछ बोल नही रही है”!

इतकी सुंदर दाद ऐकून मी अवाकच झाले….ते शब्द  असे आहेत….

 

*मेघ बरसला आज*

*सखे रिकामे अंगण*

*मुके झाले आहे आज*

*माझ्या पायीचे पैंजण*

आषाढात ब्रह्मकमळं उमलतात… माझी *ब्रह्मकमळ* ही एका आषाढातली ख-याखु-या घटनेची कविता. या कवितेला मला साहित्य प्रेमी भगिनी मंडळाचा कवी कालिदास पुरस्कार मिळाला होता आणि *आपले छंद* या अतिशय सुंदर दिवाळी अंकात ती प्रकाशित झाली होती आणि त्या काळात – वीस वर्षा पूर्वी या कवितेला मला दोनशे रुपये मानधन मला मिळाल॔ होतं  …

*रिमझिमत्या शीतल सांजेला*

*त्या राजस कळ्या*

*उघडू लागल्या चोची*

*जणू  आषाढ मेघांच्या*

*अमृत सरीच प्राशण्यासाठी* !

( *मृगचांदणी*- ब्रह्मकमळ )

 

एका पावसाळी संध्याकाळी बालगंधर्व च्या कट्ट्यावर मैत्रिणी बरोबर गप्पा मारत बसलो होतो. नंतर रविराज मध्ये जेवायला जायचं होतं! घरी जाताना रिक्षा डेक्कन काॅज वे वरून गेली. काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या…. आणि रात्री कागदावर शब्द बरसले….

 

*सखे,निमित्त फक्त*

*आपल्या गाठी भेटीचे*

*पण आपल्या मनातला*

*पाऊस मात्र* ,

*किती वेगळा* ….

*तुझा तुझ्या पुरता*..

*माझा माझ्या पुरता*..

 

माझी “पाऊस प्रतिक्षा” ही कविता प्रेयसी चं हळवं दुःख सांगणारी..मला स्वतःला माझी ही कविता खुप आवडते…

 

*मी साधू पाहतेय संवाद* –

*पावसाशी*…  *तुझ्या शी*….

*आणि ऐकते  आहे*

*मोबाईल मधून येणारे*…

*नाॅट रिचेबल*….

*नाॅट रिचेबल*..

*हे उत्तर*….     *वारंवार*!

 

पावसाच्या काही गजल ही मी लिहिल्या आहेत. मृगाक्षी वृत्तातील या गजल च्या दोन  शेरांनी समारोप करते…

 

*किती दुष्काळ सोसावा धरेने*

*अता बरसायचे  आहे जरासे*

*मला या वेढती लाटा सुनामी*

*मरण टाळायचे  आहे जरासे*

( *मृगचांदणी*-जरासे )

 

© प्रभा सोनवणे,  

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पुणे – ४११०११

मोबाईल-9270729503