श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 89 ☆
☆ देहचा सागर ☆
नको उगाळूस दुःख
नाही चंदन ते बाई
दुःख माती मोल त्याला
गंध सुटणार नाही
तुझ्या कष्टाच्या घामाचे
नाही कुणालाच काही
पदराला ते कळले
टीप कागद तो होई
पापण्यांच्या पात्यावर
दव करतात दाटी
हलकासा हुंदका ही
फुटू देत नाही ओठी
तुझ्या देहचा सागर
सारे सामावून घेई
नाही कुणाला दिसलं
किती दुःख तुझ्या देही
संसाराला टाचताना
बघ टोचली ना सुई
कर हाताचा विचार
नको करू अशी घाई
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈