सुश्री प्रभा सोनवणे
(आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी के उत्कृष्ट साहित्य को साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 90 ☆
☆ कमळखुणा ☆
आठवणी आता पुसट होत चालल्यात सखी,
गढुळ पाण्यातल्या प्रतिबिंबासारख्या !
त्याच पाण्यात फुलल्या होत्या कधी,
शुभ्र कुमुदिनी,
आकांक्षेचं नीळं कमळ,
याच पाण्यात पाहिलं होतं ना आपण?
एक डोळा बंद करून,
कॅलिडोस्कोपमध्ये दिसणारी
हसरी, नाचरी, रंगीबेरंगी
असंख्य काचकमळं
फेर धरून नाचत रहायची!
रविवारची साद….
चर्चच्या घंटेचा नाद
एक भावणारा निनाद,
जाईच्या मांडवाखाली
पसरलेल्या वाळूत
काच लपविण्याचा खेळ
“काचापाणी”
तेव्हा ठाऊक तरी होतं का ?
भविष्यात पायाखाली
काचाच काचा अन् डोळाभर
पाणीच पाणी !
आठवणी आता पुसट होत चालल्या तरी,
कमळखुणा खुपतात ग काळजापाशी!
© प्रभा सोनवणे
(अनिकेत काव्यसंग्रह १९९७)
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
धन्यवाद हेमंतजी ?