मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ पुष्प सहावे #6 ☆ पावसाचे मुक्त चिंतन. . .  समाज पारावरून . . . ! ☆ – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

 

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक,  सांस्कृतिक  एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं  ।  अब आप प्रत्येक शुक्रवार को उनके मानवीय संवेदना के सकारात्मक साहित्य को पढ़ सकेंगे।  आज इस लेखमाला की शृंखला में पढ़िये “पावसाचे मुक्त चिंतन. . .  समाज पारावरून . . . !” ।)

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – पुष्प सहावे  #-6 ☆

 

☆ पावसाचे मुक्त चिंतन. . .  समाज पारावरून . . . ! ☆

 

आला पाऊस पाऊस

तन मन भुलवीत

पानाफुलांचा पिसारा

आनंदाने फुलवीत . . . !

 

अनादी अनंत काळापासून या पावसाने वेड लावले आहे. संपूर्ण चराचर व्यापून टाकणारा हा पाऊस तन  आणि मनावर  अधिराज्य गाजवतो. प्रतिक्षा करायला लावणारा हा पाऊस  आल्यावर मात्र तनामनावर मोहिनी घालतो.

पावसाची नऊ नक्षत्रे वजा केली तर बाकी शून्य उरते. . . . बिरबलाची ही चातुर्य बुद्धी विचार करण्यासारखी आहे.  आपला भारत देश हा शेती प्रधान देश आहे.  यामुळे पावसावर आपले सारे भवितव्य अवलंबून आहे. हा पाऊस डोळ्यातले पाणी  आनंदाश्रू त परीवर्तित करतो.  स्नेह, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, माया, ममता सा-या भावनांचा  एक थेंब माणसाला माणुसकीचे नाते जोडायला पुरेसा ठरतो.

माणूस जेव्हा  एकटा  असतो ना तेव्हा  अनेक ताणतणाव, चिंता, काळजी, क्लेश, उलट सुलट विचार यांनी स्वतःच वादाच्या भोवऱ्यात  अडकतो. प्रश्नांचे  आवर्त चक्रीवादळाप्रमाणे मनात घोंघावत  असताना कुणीतरी येतो, केलेल्या कामाची पावती देतो,  अपयश आले  असल्यास धीरान परीस्थिती हाताळण्याचा सल्ला देतो तेव्हा ही व्यक्ती देवदूत वाटते. तिन दिलेला दिलासा मनाला  उभारी देतो. मन मोकळे होते. जाणिवा नेणिवांच्या मोकळ्या  अवकाशात सृजनशील विचारांची पेरणी  आपल्याला  आपल्या ध्येयाकडे घेऊन जाते.

समाजपारावर बारमाही बरसणार्‍या प्रापंचिक तक्रारी या मोसमात दूर होतात.  आषाढ महिन्यात पावसाचे आगमन चराचराला चैतन्य बहाल करून जाते. हिरवा शालू  धरतीला सुजलाम सुफलाम करून जातो. बळीराजान केलेल्या कष्टाच सार्थक होत. पाण्याने भरलेले ढग  असो,  किंवा भरून  आलेले मन  असो बरसून गेल्यावरच बरे वाटते.

गरमागरम चहा, कॉफी, किंवा गरमागरम भजी पावसाळ्यात त्याचा  आस्वाद घेण्याची लज्जत  अवर्णनीय आहे.  पाऊस हा शब्दच मनात चलबिचल सुरू करतो. पावसाळ्यात भिजण्याची मजा  आणि पावसाच्या पाण्यात भिजवून ठेवलेला ताणतणाव माणसाला माणूस करतो. स्नेहाचा  ओलावा भावभावना सांभाळून  एकमेकाच्या काळजात रूजतो आणि सुखसमृद्धीची सुगी आकारास येते.

हा पाऊस खर तर प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय.  टाळताही येत नाही  अन सांगताही येत नाही  असा विषय. तरीही हा पाऊस प्रत्येक जण आपापल्या परीने  अनुभवीत रहातो.  आबाल वृद्धांना आकर्षित करणारा हा पाऊस कवी, कवयित्री चे हळवे व्यासपीठच. मनातल्या भाव भावना शब्दात व्यक्त करताना  आठवणींच्या सरी झरू लागतात आणि साहित्य जन्माला येते. सारे शब्दालंकार व नवरस घेऊन शब्द सरी कोसळत असताना माणूस व्यक्त होतो. कलाकार आणि रसिक एकमेकांना भेटण्याचा हा सोहळा  आकाश  आणि धरतीच्या मिलना इतकाच सुंदर, पवित्र  आणि शब्दातीत आहे.

कथा, कादंबरी, कविता, लेख, नाटक यातून बरसणार्‍या  पावसाने शारदीय  सारस्वतात  अनोखे दालन निर्माण केले आहे. बालकविता पावसाशिवाय अपूर्णच आहेत. पाऊसावर कविता न करणारा कवी, कवयित्री जसे दुर्मीळच तसाच पाऊस न आवडणारी, पावसात न भिजलेली व्यक्ती दुर्मीळच.

सृष्टी चक्रात महत्त्व पूर्ण  असलेला हा पाऊस  अतीवृष्टी आणि दुष्काळ  या दोन्ही रूपातून दर्शन देतो. त्याला हवा तेव्हा येतो. हवा तसा कोसळतो. चराचरात सामावतो. माणसाच्या मनात  आणि निसर्गाच्या कणाकणात सामावणारा पाऊस समाज पारावर असाच चघळत रहावा कधी चेष्टेतून, कधी नाष्ट्यातून  तर कधी सुजलाम सुफलाम  अशा शेतीप्रधान राष्टातून.

 

मेघ नभीचे मनी दाटले

झालो मी साकार.

नभवलयी या शब्दपाखरे

दिसती काव्याकार. . . !

 

ये कविते ये,  अलगद  ओठी

स्थान तुझे स्विकार. . . . !

 

नभवलयी या ,ऋतू पाखरे

करती स्वैराचार .

झाड  होऊनी थांब नभी तू

सृजन ते स्विकार. . . . !

 

ये कविते ये,  अलगद  ओठी

स्थान तुझे स्विकार. . . . !

 

नभवलयी या, रंग फुलांचे

प्रतिभेचा दरबार.

कुंचल्यातुनी रंगव सारे

मनातले सरकार. . . !

 

ये कविते ये,  अलगद  ओठी

स्थान तुझे स्विकार. . . . !

 

नभवलयी या पाऊस धारा

अपुली जीवनाधार

देण्या जीवन कृष्ण घनातून

घे नवा अवतार. . . . !

 

ये कविते ये,  अलगद  ओठी

स्थान तुझे स्विकार. . . . !

 

✒  © विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकारनगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.