श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 95 ☆
☆ भाग्यरेषा ☆
हिरवगर्द पान
त्यावर पडलेला सूर्यप्रकाश
सूर्यप्रकाशातून दिसणाऱ्या
त्याच्या भाग्यरेषा पाहून
मीही माझ्या हातावरील भाग्यरेषा
निरखून पाहिल्या
दोन्हीत बरंचसं साम्य असलं तरी
माझ्या भाग्यरेषांमध्ये
एक स्वार्थी रेषा
ठळकपणे दिसत होती
पण ती रेषा त्या पानावर
कुठेच दिसत नव्हती
मुलाला वाढवताना
त्याच्याकडून माझ्याही काही अपेक्षा होत्या
झाडाचं मात्र तसं नव्हतं
ते देत राहलं फळं, सावली आणि
प्राणवायू देखील निस्वार्थपणे
म्हणूनच गळून पडलेल्या पानांना
पुस्तकात जपून ठेवावंस वाटतं
ती वर्षानुवर्षे राहतात पुस्तकात
सुकतात, जाळीदार होतात
पण दुर्गंध सोडत नाहीत
माणूस मात्र चोवीसतासातच….?
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈