श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 99 ☆
☆ मोकाट गुरं ☆
मला संपवायचंय, ‘मला’
आणि तिथं पेरायचय तुला
तू उगवतेस झाड होऊन
मी असतो गवतासारखा पसरून
उन्हाळ्यात जातो वाळून
तरीही फिनिक्स पक्षासारखा पुन्हा येतो वर
झाडांच्या अन्नाचे शोषण करणारा
मी एक स्वार्थी जीव
कधीकधी माझीच मला येते कीव…
झाडं फळं विकत नाहीत
सावली दिली म्हणून सेवा शुल्क मागत नाहीत
आॕक्सिजनचं मोलही सांगत नाहीत
सारंच फुकट देतात
माणसाला फुकटचं खायला आवडतं
हे त्याला माहीत असावं
फक्त एक बी पेरा
फक्त एक झाड लावा
अन् मिळवा सारं फुकट, फुकट, फुकट
तसा तर माझा कुणालाच उपयोग नाही
असं वाटत असतानाच
काही मोकाट गुरं
माझा फडशा पाडून गेली
आणि मग लक्षात आलं
कुठलाही जीव निरुपयोगी नाही
आपल्यालाही जगाव लागेल
या मोकाट गुरांच्या पोटासाठी…
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈