मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #7 – व्हावे मानव ☆ – श्री अशोक श्रीपाद भांबुरे
श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । साप्ताहिक स्तम्भ अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक भावप्रवण कविता “ व्हावे मानव”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 7 ☆
नटराजा तू पुन्हा एकदा कर रे तांडव
टाक चिरडुनी धरतीवरचे सारे दानव
मांडून शकुनि डाव बैसला अजून येथे
द्यूत खेळण्या उत्सुक सारे कौरव पांडव
घमेंड नाही जिद्द ठेवली होती त्याने
ससा हारला आणि जिंकले येथे कासव
शतकांमागे पुन्हा एकदा जावे म्हणतो
धर्म जातिला झुगारून या व्हावे मानव
सूर्यालाही रोखू त्यांना असे वाटले
आभासाचे कुजके पडदे पोकळ मांडव
पहा तुला या रातराणिचा सुंगध म्हणतो
कशास घाई वेड्या आधी दीपक मालव
थकलेला हा चंद्र रात्रिला म्हणतो आहे
या देहावर तुझीच सत्ता कायम चालव
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८