श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
☆ रंजना जी यांचे साहित्य # 70 –वणव्यातालं चांदण ☆
तुझ्या हास्यानं रे फुललं वैशाख वणव्यात चांदणं।
विसरले सारे दुःख अन् उघडे पडलेले गोंदणं।।धृ।।
गेला सोडून रे धनी गेलं डोईचं छप्पर।
भरण्या पोटाची गार भटकंती ही दारोदार।
लाभे दैवानेच तुला समजदारीचं देणं।।१।।
कुणी देईना रे काम कशी रे दुनियादारी।
नजरेच्या विषापरी सापाची ही जात बरी।
याला पाहून रे फुले तुझ्या हास्याचं चांदणं।।२।।
रोजचाच नवा गाव रोज तोच नवा खेळ।
दमडी दमडीत रे कसा बसेल जीवनाचा मेळ।
कसा आणू दूध भात कसा आणू रे खेळणं।।३।।
नसे पायात खेटर पायपीट दिसभर।
घेऊ कशी सांग राजा तुला झालरी टोपरं।
करपलं झळांनी या गोजिरं,हे बालपणं।।४।।
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈