मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ कवितेच्या प्रदेशात # 7 – पाऊस ☆ – सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

 

 

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात”  में  उनकी  वर्षा ऋतु से संबन्धित कवितायें और उनसे जुड़ी हुई यादें। निःसन्देह यादें अविस्मरणीय होती हैं।  विगत अंक में सुश्री प्रभा जी ने “रिमझिम के तराने” शीर्षक से वर्षा ऋतु और उससे संबन्धित साहित्यिक संस्मरण साझा किए थे।  कृषि पृष्ठभूमि से जुड़े होने से वर्षा ऋतु में गाँव की मिट्टी की सौंधी खुशबू, धन-धान्य से परिपूर्ण जीवन के संस्मरण, घर के वयोवृद्ध जनों का स्नेह निःसन्देह आजीवनअविस्मरणीय  होते हैं। साथ ही सूखे और अकाल के दिन भी हमें रुलाते हैं। उन्होने इस सुदीर्घ साहित्यिक अविस्मरणीय इतिहास को सँजो कर रखा और हमारे पाठकों के साथ साझा किया इसके लिये उनका आभार और लेखनी को नमन । 

आज प्रस्तुत है उनका संक्षिप्त आलेख “पाऊस” एवं तत्संबंधित कविता “आठवणी”। 

अब आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी का साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 7 ☆

 

☆ पाऊस  ☆

 

पावसाच्या माझ्या ज्या काही आठवणी आहेत त्या सुखद आणि सुंदरच आहेत, शेतकरी कुटुंबात वाढल्यामुळे पाऊस प्रियच….लहानपणी आजोबा आम्हाला विचारायचे “आज पाऊस पडेल का” आणि पडला की साखर तोंडात भरवायचे !

गावाकडचा पाऊस खुप छान वाटायचा एकदा मी चौथीत असताना आमच्या गावात खुप पाऊस पडला आम्ही भावंडे आणि आमचे धाकटे काका वाड्याच्या  वरच्या मजल्यावरच्या खिडकीतून तो धुवांधार पाऊस पहात होतो ओढा भरून वहात होता आणि घरासमोरची विहिर तुडुंब भरून ओसंडून वहात होती….

तसा आमचा शिरूर तालुका तसा दुष्काळग्रस्त पण आमच्या लहानपणचा तो पाऊस लक्षात राहिलेला  …..

एकूणच लहानपणीचे पावसाळे…खुपच आवडलेले ..त्याकाळी आम्ही पुण्यात रहात असू पण आषाढ, श्रावणात आवर्जून गावाकडे जायचो!

नंतरच्या काळात मात्र पावसानं शेतक-यांना खुप रडवलं… ७२ चा दुष्काळ आणि शेतीव्यवसायाला लागलेली उतरती कळा….हिरवं ऐश्वर्य हरवलं….

 

☆ आठवणी ☆

 

नका मनाशी घालू पिंगा आठवणींनो जुन्या

मला वाटते, एकदा तरी, कुशीत घ्यावे पुन्हा

पुढेच जाई, काळ परंतू ,मन घुटमळते तिथे

दगडी वाडा, बाग फुलांची, आणि फळांचे मळे

 

घरात नांदे सुखसमृद्धी,होती दौलत खरी

तुळशी वृंदा वनी मंजिरी आनंदे डोलती

माय आणखी  ,आजी काकी सांजवात लावती

खमंग येती, वास कशाचे? सा-या हो सुगरणी

 

गुरे वासरे,गोठ्यामधली,अबलख घोडा दिसे

धनधान्यांनी भरली पोती कसली चिंता नसे

वळणावरती, वेडीबाभळ,वाट कुणाची बघे ?

झुळझुळणारा अवखळ ओढा त्या पांदीतुन निघे

 

शिवालयाशी वटवृक्षावर  पक्षीमेळा जमे

स्वर घंटेचा सांगे येथे सत्य सुंदरम् वसे

मनीमानसी ,सदा नांदती माहेराच्या खुणा

कुळवंताची लेक सांगते गतकाळाच्या त-हा

 

नसे फुकाचा डामडौल हा ,कथा सांगते खरी

कधीतरी या पहावया ती गावाची चावडी

 

© प्रभा सोनवणे,  

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पुणे – ४११०११

मोबाईल-9270729503