सुश्री प्रभा सोनवणे
☆ गझल ☆
चंद्र परका चांदणेही पाहवेना
आजची कोजागरी का पेलवेना
सोनचाफा आवडीचा फार माझ्या
मात्र आता गंध त्याचा साहवेना
वेढते वैराग्य की वय बोलते हे
वाट आहे तीच आता चालवेना
फोन माझा, चार वेळा टाळला तू
या मनाला काय सांगू सांगवेना
खूप झाला त्या तिथेही बोलबाला
मूक अश्रू ढाळलेले ऐकवेना
पूर्वजांचे मानले आभार मी ही
कंठ दाटे या क्षणाला बोलवेना
कावळा आलाय दारी घास खाण्या
आप्त आहे पण मला हे मानवेना
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
धन्यवाद हेमंत सर ?
सुरेख…..
धन्यवाद अरूणजी