श्री सुजित कदम
☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #79 ☆
☆ बाप्पा…! ☆
बाप्पा तुझा देवा घरचा पत्ता
मला तू ह्या वर्षी तरी
देऊन जायला हवा होतास..
कारण..,
आता खूप वर्षे झाली
बाबांशी बोलून
बाबांना भेटून…
ह्या वर्षी न चूकता
तुझ्याबरोबर बांबासाठी
आमच्या खुशालीची
चिठ्ठी तेवढी पाठवलीय
बाबा भेटलेच तर
त्यांना ही
त्याच्यां खुशालीची चिठ्ठी
माझ्यसाठी
पाठवायला सांग…
बाप्पा…,
त्यांना सांग त्याची चिमूकली
त्यांची खूप आठवण काढते म्हणून
आणि आजही त्यांना भेटण्यासाठी
आई जवळ नको इतका हट्ट
करते म्हणून…,
बाप्पा तू दरवर्षी येतोस ना तसच
बाबांनाही वर्षातून एकदातरी
मला भेटायला यायला सांग..,
तुझ्यासारखच…,त्यांना ही
पुढच्या वर्षी लवकर या..
अस म्हणण्याची संधी
मला तरी द्यायला सांग…,
बाप्पा.., पुढच्या वर्षी तू…
खूप खूप लवकर ये..
येताना माझ्या बाबांना
सोबत तेवढ घेऊन ये…!
© सुजित कदम
पुणे, महाराष्ट्र
मो.७२७६२८२६२६
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈