श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 105 ☆
☆ डोंगर ☆
आठवणींचा डोंगर होता प्रचंड मोठा
मनात आले मारुन यावे सैर सपाटा
दुरून डोंगर छान वाटला म्हणून चढलो
ठेच लागली पाय घसरला आणिक पडलो
पाय ठणकतो त्यात मोडला हिरवा काटा
आठवणींचा डोंगर होता प्रचंड मोठा
गाभुळलेल्या चिंचा होत्या झाडावरती
मनात ठसली ती तर होती शेंड्यावरती
गोट्यासोबत भिरकवला मी एक लखोटा
आठवणींचा डोंगर होता प्रचंड मोठा
उभ्या पिकातच शिरली होती दोन पाखरे
येउन गेले होते वारे इथे बोचरे
त्यांनी केला गावोगावी मग बोभाटा
आठवणींचा डोंगर होता प्रचंड मोठा
आठवणीच्या वाटे वरुनी खूप धावलो
अजून मजला कळले नाही कुठे पोचलो
वयासोबती धुरकट झाल्या साऱ्या वाटा
आठवणींचा डोंगर होता प्रचंड मोठा
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈