मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ सुजित साहित्य # 7 – आकार…! ☆ – श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

 

(श्री सुजित कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं। इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं। अब आप श्री सुजित जी की रचनाएँ  “साप्ताहिक स्तम्भ – सुजित साहित्य” के अंतर्गत  प्रत्येक गुरुवार को  पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है उनकी कविता  “आकार…!”। )

 

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #6☆ 

 

☆ आकार…!☆ 

 

कुभाराचं ते मातीची भांडी घडविणारं चाक मला कायमच जवळच वाटत गेलं.   फिरत्या चाकावर मातीला हवा तसा आकार देताना त्याचा हात चुकत नाही पण त्याच्या आयुष्याचा आकार  मात्र नेहमीच चुकत गेला. हे अस का होतं? परंपरागत व्यवसाय स्विकारताना त्याच्या  आयुष्याचं मातेरं का व्हावं?

त्याचं  आख्खं आयुष्य गेलं ह्या फिरत्या चाकावर मातीला हवा तसा आकार देण्यात पण हे चाक कधी त्या कुंभाराला  हवं तसं फिरलंच नाही. आणि परिस्थितीला हवा तसा आकार त्याला  कधी देताच आला नाही.

या कुंभाराची लेकरं लहान असताना, त्यांची कित्येक स्वप्न त्याने, नाईलाजास्तव, प्रापंचिक  अडचणींच्या,

पायवाटेवर  चिखलात तुडवताना मी पाहिली आहेत.  तो कुंभार मी कवी. तो निर्मिती करत गेला आणि त्याची तुटपुंजी कमाई पहाताना मी हळवा होत गेलो.

आणि त्या कुंभाराच्या सुखस्वप्नांच्या चिखलाची त्यांच्या साठीच नव नवी हवी तशी  विविध आकाराची भांडी तो बनवत गेला. त्याचं जगण त्याच्या स्वप्नांना आकार  देत गेलं .

तो कुंभार  आता थकलाय. इतकी वर्षे संभाळून ठेवलेल्या परिस्थितीचा घडा आता, हळूहळू पाझरू लागलाय.त्याच्या  पायाखालचा चिखलही आता पहील्या पेक्षा कमी झालाय कारण आता…

त्याच्या लेकरांनी आपआपल्या स्वप्नांचा चिखल

आपआपल्या पायाखाली तुडवायला सुरवात केलीय

पुन्हा नव्याने परिस्थितीला, त्यांना हवा तसा आकार देण्यासाठी….!

हे वास्तव मला जाणवलं. ते मनात रेंगाळत  असतानाच माझ्याही मनात  एका कवितेने  आकार घेतला. .

तोपर्यंत तो कुंभार त्याचा जीवनप्रवास साकार झाला होता. मातीच्या भांडयान कलेचा आधार घेतला होता. त्याची मुलही मातीची भांडी बनवतात. वापरण्यासाठी नाही तर सिरॅमिक पॉट शोभिवंत फुलदाणी म्हणून. . . . !

 

© सुजित कदम, पुणे