सुश्री प्रभा सोनवणे
☆ पाऊस आणि मी ☆
एका रिमझिमत्या सांजेला,
आठवणींचे मेघ भरून आले आणि पाऊस बरसत राहीला
मनभर….
हिरवागार भोवताल न्याहाळत,
कट्ट्यावरच्या गप्पा
रंगत असताना….
आठवत राहिले, दुस-याच कुणा
सखीबरोबरचे ते पावसाळी दिवस धुवाँधार….
शाळेच्या मैदानावर खेळलेल्या खो खो ची आठवण यावी,
असेच काहीसे….
अनेक अनेक मैत्रिणींचे,
आयुष्यात येणे जाणे,
मावळत्या सूर्याच्या दिशेने जाताना,
ताज्या टवटवीत होत गेल्या,
पूर्वायुष्यातल्या सख्यांच्या
त्या रसिल्या मैफिली….
ऋणानुबंधाच्या कुठल्या धाग्याने बांधलेले असतात हे सेतू?
आपल्याला एकमेकींकडे
घेऊन येणारे?
वळणावळणाने वाहणारी,
ही आयुष्याची नदी,
क्षणभर थबकते
एखाद्या काॅज वे जवळ
आणि उठतात तिच्या पात्रावर आठवणींचे तरंग !
त्या रिमझिमत्या सांजेला
सखे, निमित्त फक्त,
आपल्या गाठीभेटीचे,
पण आपल्या मनातला
पाऊस मात्र,
किती वेगळा …..
तुझा तुझ्यापुरता,
माझा माझ्यापुरता !!
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
धन्यवाद हेमंत सर ? सुप्रभात