कविराज विजय यशवंत सातपुते

 

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक,  सांस्कृतिक  एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं  ।  अब आप प्रत्येक शुक्रवार को उनके मानवीय संवेदना के सकारात्मक साहित्य को पढ़ सकेंगे।  आज इस लेखमाला की शृंखला में पढ़िये “कुठे चाललोय आपण? . . .  समाज पारावरून . . . !” ।)

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – पुष्प सातवे  # 7 ☆

 

☆ कुठे चाललोय आपण? . . .  समाज पारावरून . . . ! ☆

 

*जमाना बदललाय भाऊ* असं म्हणत प्रत्येक पिढीने सोयीस्कर रित्या  आपले रहाणीमान बदलले.  चुकांचे समर्थन करण्यासाठी नवे साधन मिळाले. सुनेने सासू ला आत्याबाई सोडून  आई म्हणायला सुरवात केली. मामंजीचे पप्पा झाले. पण नात्यातला संघर्ष होतच राहिला. जनरेशन गॅप तशीच राहिली. फक्त तिचे स्वरूप बदलले.

सासुबाई  नऊवारी साडीतून पंजाबी ड्रेस मध्ये  आल्या.  मामंजी धोतरातून सुट बूट, सलवार कुडता  अशा पेहरावात  आले. नातवंडे मुलांच्या  इच्छेने वाढू लागली.  वडील धा-यांनी नातवंडांचे फक्त लाड करायचे  आणि वेळप्रसंगी  आजी आजोबांनी नातवंडांचा संभाळ करायचा एवढ्या परीघात नाती फिरू लागली.

मौज मजा,  ऐषोराम,  एकमेकांवर केलेला खर्च यात नात्याचा हिशोब होऊ लागला. रक्ताची नाती गरजेपोटी  उपयोगात  आणण्याचा नवा प्रघात सुरू झाला आणि ग्रामीण भागातील समाज पारावर  पिंपळपारावर खळबळ माजली. वृद्धाश्रम  आणि पाळणाघर यांना काळाची गरज आहे  अशी शहरी लोकांनी दिलेली मान्यता गावातील वृद्धांना घातक ठरू लागली.  गावातल्या गावात एकाच कुटुंबातील दोन पिढ्यांची दोन घरे झाली.  शेतातल घर  अर्थातच म्हाताऱ्याच्या वाट्याला आले.  आणि गावातील घर दुमजली होऊन दोन भाऊ स्वतंत्र दोन मजले करून वरती खाली राहू लागले.  शेती करण्यासाठी पगारी मजूर बोलावताना जुनी पिढी हळहळली पण त्याच वेळेस  आलेले  उत्पन्न वाटून घेताना  उगाचच कुरकुरली.

समाज पारावर देखील  अनेक बदल घडत आहेत. माणूस माणसापासून दूर जातो आहे.  आणि याला कारणीभूत ठरला आहे तो पैसा.  बदलत्या जमान्यात *माणूस  ओळखायला शिकले पाहिजे*  हेच वारंवार कानी पडते. हा माणूस  ओळखायच्या स्पर्धेत  आपण मात्र  कंपूगिरी करत  आहोत.  आपल्या  उपयोगी पडणारा तो आपला.  गरज सरो नी वैद्य मरो या  उक्ती प्रमाणे आपल्या माणसाची व्याख्या बदलते आहे.  बदलत्या काळात जात पात धर्म भेदभाव नष्ट होत  असले तरी  आर्थिक विषमता  हे मूळ माणसामाणसात प्रचंड दरी निर्माण करीत आहे. ही विघातक दरी जनरेशन गॅप पेक्षा ही विनाशकारी आहे.

आपण सर्व जण ज्या मार्गाने जात  आहोत त्या मार्गावर वाडवडिलांचे आशिर्वाद, संस्कार  अभावानेच आढळतात. पण महत्व कांक्षी विचारांना पुढे करून स्वार्थाला दिलेले  अवाजवी महत्त्व माणसाला  एखाद्या वळणावर तो एकटा  असल्याची जाणीव करून देत आहे.

माणूस किती शिकला? काय शिकला? यापेक्षा तो आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी आहे का याची चर्चा माणसातला  आपलेपणा नष्ट करते. बसा जेवण करूनच जा असा  आग्रह करणारे  आज फालतू कारणे शोधून बाहेर हाॅटेलमध्ये स्नेहभोजनाचे जंगी बेत  आयोजित करतात यातून व्यवहार सांभाळत पुढे जायचे हा कानमंत्र  एकमेकांना देत ही कंपूगिरी समाजात  एकमेकांना धरून रहाते.

मन दुखावले की नाती संपली. भुमिका बदलल्या. पात्रे बदलली. पैसा सोबत  असला की माणसांची गरज नाही. पैशाने माणूस विकत घेता येतो हा विचार करत  सर्व जीवन प्रवास चालू आहे.  संवाद माध्यमातून प्रबोधन करणारी पिढी समोरासमोर आली तरी  ओळख दाखवताना दहा वेळा विचार करून ओळख दाखवते अशी  सद्य परिस्थिती आहे.  नवीन पिढीला  आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण करून देताना  आपण आपल्याच लेकरांना चार भिंतीची ओळख करून देतो पण त्या भिंतीवर  असणाऱ्या छप्पराचे ,  त्या चार कोनाचे कौटुंबिक महत्त्व सांगायला विसरतो.

नव्या वाटेने चालताना  जुन्या आठवणींना उजाळा देणारे प्रसंग घडतात. तेव्हा  आपली माणसे  आपल्या सोबत  असावीत.  नव्या जमान्यात वावरताना  आपण कुठे चाललो आहोत याचा विचार करण्याची वेळ आली आहे.  आपला जीवनप्रवास ह्रदयापासून ह्रदयापर्यत व्हायला हवा  इतके जरी  आपण ठरवले तरी मला वाटत  आपण माणसांना घेऊन, माणसासोबत  आपला जीवन प्रवास सुरू ठेऊ. होय ह्रदयापासून ह्रदयापर्यत.

✒  © विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकारनगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.

 

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Chinmay wagh

सुंदर