सुश्री प्रभा सोनवणे
☆ डोळे ☆
(जुन्या डायरीतून….)
काहूर भावनांचे
अंतरात दाटलेले
समजून घे जरा तू
तुज सांगतील डोळे!
ही मूक वेदना
हृदयास जाळणारी
अंगार ना विझे हा
व्यर्थ सांडतील डोळे!
गेले कुठून कोठे
माझे मला कळेना
गर्दीत माणसांच्या
मज शोधतील डोळे!
सांभाळले प्रीतीला
होऊन मुक्त राधा
हे वेड भाळण्याचे
बघ लावतील डोळे!
सर्वस्व वाहिले अन्
झाले तुझी सख्या रे
सारे कलंक काळे
मूक शोषतील डोळे!
दृष्टावतील कोणी
पडतील घाव देही
अनुरागी तृप्त झाले
मिटतील शांत डोळे!
© प्रभा सोनवणे
२९ नोव्हेंबर १९९८
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011