श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ चंदन जळले ☆
आयुष्याची झाली माझ्या बघ रांगोळी
चंदन जळले प्रेताखाली कुठे दिवाळी
सारा सागर होता माझ्या रे बापाचा
फेरा चुकला कुणास आहे हा नशिबाचा
जाळ्यामधली आज जाहले मी मासोळी
चंदन जळले प्रेताखाली कुठे दिवाळी
ग्रीष्म ऋतूचा कंटाळा ना कधीच केला
घामाचे हे अत्तर पुसले या देहाला
मेघ बरसले कधीतरी मग संध्याकाळी
चंदन जळले प्रेताखाली कुठे दिवाळी
वर्षा झाली आज निघाले पुरती न्हाउन
दुःखांचे गाठोडे नेले त्याने वाहुन
जीव जाळला तेव्हा तेव्हा झाली होळी
चंदन जळले प्रेताखाली कुठे दिवाळी
दिशा उजळल्या घरात माझ्या सूर्य न आला
सोबत केली कशी सोडु मी काळोखाला
मिठी मारली अंधाराने कातरवेळी
चंदन जळले प्रेताखाली कुठे दिवाळी
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈