मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ कवितेच्या प्रदेशात # 8 – पंढरीची वारी ☆ – सुश्री प्रभा सोनवणे
(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ “कवितेच्या प्रदेशात” में उनकी पंढरपुर वारी से संबन्धित स्मृतियाँ। उनकी स्मृतियाँ अनायास ही हमें याद दिलाती हैं कि समय के साथ संस्कार जो हमने विरासत में पाये हैं आधुनिकता, व्यावहारिक एवं स्वास्थ्य कारणों से बदलते जाते हैं। किन्तु, आस्थाऔर मान्यताएं बनी रहती हैं। सुश्री प्रभा जी ने इस विषय पर बड़ी ही बेबाकी से अपनी राय रखी हैं एवं मैं भी उनसे पूर्णतः सहमत हूँ।
आज प्रस्तुत है उनका यह पठनीय आलेख “पंढरीची वारी ”।
अब आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी का साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 8 ☆
☆ पंढरीची वारी ☆
वर्षानुवर्षे लोक श्रद्धेने वारीला जातात, इतका काळ ही प्रथा टिकून आहे हे खरोखर विलक्षण आहे, लहानपणापासून आषाढी कार्तिकी एकादशी चा उपवास केला जातो, आमचं ग्रामदैवत सोमेश्वर त्यामुळे घरात सगळे शिवभक्त, नाथपंथिय असल्याने गोरक्षनाथाची बीज आणि शिवरात्र हे घरात होणारे उत्सव! माहेरी कोणी वारीला गेल्याचं स्मरत नाही…नसावंच!
सासरी आल्यावर सासूबाई विठ्ठल भक्त, दर एकादशी चा उपवास करणा-या धार्मिक, सासरे पालखीच्या दिवसात वारक-यांना जेवण देत ती प्रथा मोठे दीर जाऊ बाई अजूनही पाळतात, दोनशे-अडीचशे वारकरी जेवायला येतात !
माझ्या मनातही विठ्ठलभक्ती आहे लग्नानंतर !….संत परंपरेचा आदर आहे पूर्वीपासूनच!
वीस वर्षांपूर्वी एक मैत्रीण म्हणाली, आपण आळंदी ते पुणे वारी बरोबर येऊ चालत मी हो म्हटलं, पहाटे स्वारगेटहून बसने आळंदीला गेलो आणि वारीत सामिल झालो…. प्रवासात कोणी कोणी खिचडी, पोहे असं काही खायला देत होते ते खात होतो फक्त पाण्याची बाटली बरोबर होती, संध्याकाळी पुण्यात शिवाजीनगर ला पोहोचलो, तिथून रिक्षा पकडून मैत्रीणीच्या घरी गेलो, तिच्याकडे पिठलंभात करून खाल्ला! माझे पाय सुजले होते चालल्यामुळे, त्या मैत्रीणीने तेल गरम करून माझे पाय चोळून दिले ही तिची सेवा चिरस्मरणात राहणारी…वारीमुळे निर्माण झाली ही मैत्रीतल्या कृतज्ञतेची भावना! वारीतला तो अनुभव- आळंदी ते पुणे… छान होता, पण फार भक्तिभावाने किंवा भारावलेपणाने ओथंबलेला नव्हता!
आता कालच एका मैत्रिणीचा फोन झाला ती आळंदीच्या पालखीबरोबर चालत पंढरपूर ला गेली…वारीतले फोटो, भारावलेपण….. मला स्वतःला आता यापुढे कधीही वारीत जायची इच्छा नाही…पण जे जातात त्यांच्या स्टॅमिन्याचं विशेषतः साठी ओलांडलेल्यांचं कौतुक आहे, आत्ता एका तरूण मुलाला विचारलं ,”वारी बद्दल तुझं मत काय? “तर तो म्हणाला ” दोन दिवस पुण्यातले रस्ते बंद होतात, वाहतूकीत आडथळे एवढंच मत आहे बाकी काही नाही”, मी आत्ता सोसायटीच्या कृष्णमंदिरात बसलेय आणि हा तरूण अनोळखी, मंदिरात दर्शनाला आलेला, पुजा-याशी मराठीत बोलत असल्यामुळे मी त्याच्याशी बोलले! वारी एक आश्चर्य, अस्मिता…. पण मला स्वतःला वारीचं विशेष आकर्षण नाही, ईश्वरवादी, आस्तिक असूनही!
देह त्यागताना
डोळाभर दिसो
आत्म्या मध्ये वसो
विठ्ठलचि॥
© प्रभा सोनवणे,
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पुणे – ४११०११
मोबाईल-9270729503