श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ भरवसा ☆
तुझ्या डोळ्यांत आरसा
तिथे अंधार हा कसा
मेंदू लागला पोखरू
नाही झोपत पाखरू
एक ध्यास मनामध्ये
एका फुलाची लालसा
नाते फूल पाखराचे
आहे मला जपायचे
दोघे मिळून जपुया
पिढीजात हा वारसा
फूल होता या कळीचे
भाग्य फुले डहाळीचे
गंध दूरवर जाई
होई पाकळ्यांचा पसा
जाई काट्याला शरण
त्याच्या सोबती मरण
क्षणभंगुर आयुष्य
नाही त्याचा भरवसा
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈