श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ गळ्यातला फास ☆
मी साधा कागद
कुणी लिहितो चार शब्द
माझ्या काळजावर
त्याच्या काळजातल्या संवेदनांचे
आपल्याच प्रियेसाठी
काळजातले ते कोरडे शब्द
त्यालाच भावत नाहीत
मग
राग निघतो माझ्यावर
माझा देहाचा चोळामोळा करून
टाकतो डस्टबिनमध्ये
आणि घेतो दुसरा कागद…
बालमित्रा तू तर
खूप मोठं काम केलंस
फक्त दोन काड्या जोडून
मला पार आकाशात नेलंस
भाताने चिटकवल्यास
कागदावर काड्या
वापरला होतास
साधा पुड्यांचा दोरा
आज आहेस निरागस
उद्या होशील मोठा
पतंग छाटण्याच्या नादात
वापरशील नायलॉन दोरा
मला वरती उडताना पाहून
पाहिजे तेवढा हास
फक्त होऊ नकोस रे
कुणाच्या गळ्यातला फास
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈