मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ पुष्प आठवे # 8 ☆ स्री भ्रूण हत्या  एक समाजविकृती ! . . . समाज पारावरून . . . ! ☆ – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक,  सांस्कृतिक  एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं  ।  अब आप प्रत्येक शुक्रवार को उनके मानवीय संवेदना के सकारात्मक साहित्य को पढ़ सकेंगे।  आज इस लेखमाला की शृंखला में पढ़िये  स्त्री भ्रूण हत्या जैसी एक सामाजिक विकृति पर विचारणीय आलेख “स्री भ्रूण हत्या  एक समाजविकृती ! . . .  समाज पारावरून . . . !”

 

☆ समाज पारावरून – साप्ताहिक स्तंभ  – पुष्प  आठवे # 8 ☆

 

☆ स्री भ्रूण हत्या  एक समाजविकृती ! ☆

आजकाल तरूण पिढी विवाह बद्ध झाल्यावर हम दो हमारा एक  असा विचार सर्रासपणे करताना आढळून येते.  मग  अशा वेळी  *आपला वंश पुढे नेण्यासाठी  आपले नाव लावणारा मुलगाच  आपल्याला हवा* अशी मानसिकता प्रत्येकाने  राजरोस पणे करून घेतली आहे.  उच्च शिक्षित समाजात याचे प्रमाण जास्त आहे. या साठी पैशाच्या बळावर गर्भ लिंग तपासणी करून योग्य ती खबरदारी घेण्याची चढाओढ आपापसात लागली आहे. अपत्य जन्माला घालणारी माता देखील कधी कधी स्वेच्छेने या प्रकरणी होकार देऊन दोषी ठरत आहे.  स्वार्थ साधू वृत्ती  असल्याने  मला  अमुक एक हवे आहे त्यासाठी मी वाट्टेल ते करायला तयार आहे हा दुराग्रह स्त्री भ्रूण हत्या समस्येचे मूळ बनला आहे.

मुलीला पणती मानण्यात धन्यता मानणारे स्वतःवर वेळ आली की  मुलाला जन्म देण्यात जास्त धन्यता मानतात.  आज समाजात *मुलगा झाला* या बातमीत सामावलेला  आनंद  आणि *मुलगी झाली * या बातमीतील खेद विसरून चालणार नाही. ही समाज मानसिकता बदलायला हवी.

गर्भातील  अपत्य जर स्त्री भ्रूण  आहे असे समजले तर तीला  गर्भातच नष्ट करण्यासाठी हजारो प्रयत्न केले जातात. यात समाज विकृती हे महत्वाचे कारण आहे  असे मला वाटते. जोपर्यंत  कुटुंब या प्रकरणात  दोषी ठरत नाही तोपर्यंत मुलगा हवा हा दुराग्रह समाजात पहायला मिळणार.  विवाह करताना जात, पात ,  धर्म  इत्यादी बंधने झुगारून जेव्हा आपण विवाह बंधन स्विकारतो तेव्हा च खर तर  एकमेकांनी शपथ घ्यायला हवी की  गर्भजल परीक्षण न करता  आम्ही  अपत्यास जन्म देऊ.  मुलगा  असो वा मुलगी  आम्ही तितक्याच  आत्मियतेने अपत्याचे पालन पोषण करू.

आज वैद्यकीय सेवेत असलेल्या ब-याच जणांनी या सेवेस व्यवसायाचे स्वरूप दिले आहे.  पैसा फैको नीट तमाशा देखो हा वाक्प्रचार दुर्दैवाने प्रत्येक  क्षेत्रात लागू पडतो  आहे. माणसाला माणूस पैशाच्या बळावर विकत घेतो आहे हे वास्तव स्वीकारण्याची वेळ आता आली आहे. गर्भपात  करणे,  गर्भलिंग तपासणी हे गुन्हे  आहेत हे मान्य असूनही कित्येक सुशिक्षित तो गुन्हा करून मोकळे होतात.  आज मी समाजाचा आहे  या ही पेक्षा माझ्या मुळे समाज आहे ही भावना  माणसाचं माणूस पण हिरावून नेते आहे.

“लेक द्यावी श्रीमंताघरी अन सून आणावी गरीबा घरची ” हा  विचार केव्हाच मागे पडला आहे.  एकटय़ाच्या  पगारात भागत नाही हे कारण पुढे करून भरमसाठ पैसे कमवायचे  आणि याच पैशाच्या जोरावर हवी तशी मनमानी करायची या वृत्ती मुळे आज मुलींची संख्या कमी होत चालली आहे. जातीत मुलगी मिळत नाही म्हणून परजातीय विवाहास मान्यता दिली जाते. पण तिथे ही मुलगा हवा  असा आग्रह दिसल्याने विचारांचे मागासले पण  या समस्येला  अधिक खतपाणी घालते.

समाजातील विविध ठिकाणी  मुलगी वाचवा म्हणून विविध  उपक्रम राबविले जात आहेत. पण कौटुंबिक पातळीवर मात्र *वंशाचा दिवा* कसा  आपल्या घरात तेवत राहिल या कडे लक्ष दिले जात आहे.  नास्तिक मनुष्य देखील मुलगा झाल्यावर देवदर्शन करायला जातो आहे. ही समाज विकृती बदलायची असेल तर प्रत्येकाने  स्वतःच्या कुटुंबापासून या चळवळीची सुरवात केली पाहिजे.

 

✒  © विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.