सुश्री प्रभा सोनवणे
साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 121
☆ वृत्त-अर्कशेषा ☆
आजकाल मी इथेच वाट पाहते ना
दूर दूर होत एकटीच राहते ना
पंचमीस रंग खेळला कुणी दुपारी
शब्द एक लागला मलाच तो जिव्हारी
लावलाच ना कधी गुलाल मी कुणाला
डाग एक तो उगाच लाल ओढणीला
“लोकलाज सोडली” मलाच दोष देती
ना कळे कुणास प्रेम आकळे न प्रीती
एक दुःख जाळते मनास नेहमीचे
ना कुणास माहिती प्रवाह गौतमीचे
तारतम्य पाळतेच स्त्री ,वसुंधराही
प्रीतभाव ना कळे पुरूष, सागराही
एकटीच शोधते खुणा इथेतिथे ही
सोडते स्वतःस त्या जुन्याच त्या प्रवाही
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈