मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ? मी_माझी – #17 – पाचोळा… ? – सुश्री आरूशी दाते

सुश्री आरूशी दाते

 

(प्रस्तुत है  सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की   सत्रहवीं कड़ी  पाचोळा…।  सुश्री आरूशी जी  के आलेख मानवीय रिश्तों  को भावनात्मक रूप से जोड़ते  हैं।  सुश्री आरुशी के आलेख पढ़ते-पढ़ते उनके पात्रों को  हम अनायास ही अपने जीवन से जुड़ी घटनाओं से जोड़ने लगते हैं और उनमें खो जाते हैं। एक पान  के पत्ते से  नवजीवन की परिकल्पना को जोड़ना एवं अंत में दी हुई कविता दोनों ही अद्भुत हैं। सुश्रीआरुशी जी के  संक्षिप्त एवं सार्थकआलेखों  तथा काव्याभिव्यक्ति का कोई सानी नहीं।  उनकी लेखनी को नमन। इस शृंखला की कड़ियाँ आप आगामी प्रत्येक रविवार को पढ़  सकेंगे।) 

 

? साप्ताहिक स्तम्भ – मी_माझी – #17 ?

 

☆ पाचोळा… ☆

 

पाचोळा, पानांचा… पानगळ… निष्पर्ण… एका सुरुवातीचा शेवट?
कदाचित शेवट… म्हणून भकास?

कदाचित?

की नव्याची सुरुवात?

अनेक विचार आपल्यालाच डाचत राहतात… पण पाचोळा कोणालाच नको असतो हे नक्की… पायदळी तुडवले जाण्याची शक्यताच जास्त असते… दुर्लक्षित होणे, ह्या सारखी भावना सुखावह नक्कीच नाही… पण मग अजून एक विचार मनात येतो… पाचोळा ही पूर्णत्वाची स्थिती तर नाही? समर्पणाची तयारी तर नाही? आयुष्यावर मात करत असताना झेललेल्या अनेक घावांचे व्रण नाहीसे करण्यासाठी ही धडपड नसावी ना? का सर्व जबाबदऱ्यांमधून बाहेर पडून हलक्या झालेल्या जीवनाचा वाऱ्याच्या झुळकी बरोबर सुरू झालेला प्रवास तर नाही? ह्या पानगळीबरोबर अनेक अयोग्य गोष्टीचा ऱ्हास होत असेल,  नाही का !

ह्याची उत्तरं प्रत्येकासाठी नक्कीच वेगळी असणार, ह्यात नवल नाही… पण उत्तरं शोधायचा प्रयत्न प्रगल्भतेच्या मार्गातील मैलाचा दगड ठरू शकतो… कारण ज्याची सुरुवात व्हावी वाटत असते, त्यासाठी कशाचातरी शेवट होणे ह्याला पर्याय नाही, हा निसर्गाचा नियम विसरून चालणार नाही…

कोंब होतो मी अवखळ,
पानापानातील सळसळ,
श्रुंगारलो सजलो देही,
जाणवे झाडाची कळकळ…

ऋतूंच्या बहरण्या साजे,
अनोखे चित्र सकळ,
खोडाखोडात अवतरे,
जगण्यासाठी पाठबळ…

वसंताच्या आगमनाने,
मिळाली माया सोज्वळ,
ग्रीष्माची उष्ण झळ,
नक्कीच होईल पानगळ,

जगरहाटी ठरलेली,
बाणवली जन्मभर,
निर्मिती, स्थिती, लय,
घडले सारे भरभर…

म्हणूनच म्हणतो,

आज पाचोळा जरी,
अनुभवले कोवळे क्षण,
पुलकित होत होतो,
पिऊन नाविन्याचे कण…

तुडवू नको पायदळी,
गळलो जरी अवकाळी,
सृष्टीचा एक भाग होतो,
आयुष्याच्या सकाळी…

 

© आरुशी दाते, पुणे