सुश्री आरूशी दाते
(प्रस्तुत है सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की अगली कड़ी प्रवास. सुश्री आरूशी जी के आलेख मानवीय रिश्तों को भावनात्मक रूप से जोड़ते हैं. सुश्री आरुशी के आलेख पढ़ते-पढ़ते उनके पात्रों को हम अनायास ही अपने जीवन से जुड़ी घटनाओं से जोड़ने लगते हैं और उनमें खो जाते हैं। यह सत्य है कि अक्सर हम जीवन में कई प्रवास करते हैं. कभी कभी हम थक जाते हैं . हम अर्थात हमारा शरीर या मन. उस थकान का अहसास कभी शरीर तो कभी मन दे देता है. किन्तु, हमारा जीवन भी तो आखिर एक प्रवास ही है न ? इस प्रवास पर सुश्री आरुशी जी का विमर्श अत्यंत सहज किन्तु गंभीर है. सुश्रीआरुशी जी के संक्षिप्त एवं सार्थकआलेखों तथा काव्याभिव्यक्ति का कोई सानी नहीं। उनकी लेखनी को नमन। इस शृंखला की कड़ियाँ आप आगामी प्रत्येक रविवार को पढ़ सकेंगे।)
साप्ताहिक स्तम्भ – मी_माझी – #20
☆ प्रवास ☆
प्रवास करून करून थकले बाई, बास आता, कुठ्ठे कुठ्ठे जाणं नको आता…
असं बऱ्याच वेळा होतं, आणि थकलेलं मन किंवा शरीर हा डायलॉग बोलून जातं. कधी कधी हे मनातल्या मनात असतं तर कधी बोलून दाखवलं जातं… मन किंवा शरीर थकत आहे म्हणजे नक्कीच त्यांचा उपयोग केला जात आहे…
जन्म आणि मृत्यू ह्यातील प्रत्येक क्षणाचा प्रवास हा आपल्याला समृद्ध करणारा असतो… फक्त आपण समृद्ध होत आहोत ही जाणीव खूप महत्त्वाची असते… कुठलाही प्रवास काही तरी देऊन जातो आणि जेव्हा काही तरी घेऊन जातो तेव्हा आपलं आयुष्य नक्कीच बदलून जातो… प्रवासात येणारे अनुभव, घालवलेला वेळ, पैसा, बुद्धी, कष्ट ह्याला नक्कीच काही ना काही तरी अर्थ आहे, विनाकारण कोण कशाला ह्या गोष्टी खर्च करेल, हो ना ? ह्या प्रवासातून काही तरी साध्य होणार आहे म्हणून हा सगळा खटाटोप केला जातो… निरर्थक काहीच नाही…
खरंच हा प्रवास करताना किती ऍडजस्टमेंट करायला लागतात नाही, कधी ह्या अडजस्टमेंट्स मान्य असतात, तर कधी नाही. पर्याय नसतो कधी कधी. काही वेळा त्यामुळे चीड चीड होते, पण सकारात्मकता असेल तर हे ही दिवस जातील ह्या प्रमाणे हा प्रवासही सुखाचा होईल ह्यात शंका नाही. त्यात प्रवासातील साथीदार कोण आहेत, त्यांची गरज किंवा आवश्यकता काय आहे, त्यांचे त्या प्रवासातील महत्व काय आहे ह्या गोष्टी खूप घडवून आणतात…
किती ही काही झालं तरी, प्रवासाची दिशा जर ठरलेली नसेल तर सगळंच अवघड होऊन बसेल, हो ना? म्हणजे भरकटलेला प्रवास कदाचित निरर्थक ठरेल, त्याचे परिणामही चांगले नसतील, त्यामुळे सर्व जाणिवा जिवंत ठेवून प्रवासाचा आनंद घेणे कधी ही योग्यच ठरेल… असा प्रवास प्रगल्भतेकडे नेणारा असेल…
© आरुशी दाते, पुणे