मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – काव्य दिंडी # 1 – ☆ तरिही वसंत फुलतो – स्व सुधीर मोघे ☆ – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

 

(सुश्री ज्योति  हसबनीस जी  का  ई-अभिव्यक्ति  में पुनः स्वागत है. सुश्री ज्योति जी ने ई-अभिव्यक्ति में  मराठी साहित्य की नींव डाली है, एवं  एक नई ऊंचाइयों  पर पहुँचाया है . उनके योगदान को कभी भी नहीं भुलाया जा सकता. हम उनके ह्रदय से आभारी हैं , जो उन्होंने  “साप्ताहिक स्तम्भ – काव्य दिंडी ” के हमारे आग्रह को स्वीकार  किया है. इस साप्ताहिक स्तम्भ के माध्यम से वे मराठी साहित्य के विभिन्न स्तरीय साहित्यकारों की रचनाओं पर विमर्श करेंगी. आज प्रस्तुत है उनका आलेख  “तरिही वसंत फुलतो  – स्व सुधीर मोघे ” । इस क्रम में आप प्रत्येक मंगलवार को सुश्री ज्योति हसबनीस जी का साहित्यिक विमर्श पढ़ सकेंगे.)

 

☆साप्ताहिक स्तम्भ – काव्य दिंडी # १ ☆

 

☆ तरिही वसंत फुलतो  – स्व सुधीर मोघे ☆ 

 

आज आपल्यात सामिल होतायत अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेले सुधीर मोघे आपल्या *तरिही वसंत फुलतो*ह्या अर्थपूर्ण क वितेला घेऊन. किर्लोस्करवाडीत जन्मलेला, पुण्यात स्थिरावलेला आणि आपल्या कवितासखीला सोबत घेऊन कवी, लेखक, गीतकार, संगीतकार, निवेदक, चित्रकार,लघुपट निर्माता, दिग्दर्शक अशा सगळ्याच वाटांवर स्वच्छंद मुशाफिरी करणारा हा कलाकार, आपल्या अनवट सुरावटीचे अनोखे अमिट ठसे रसिकांच्या मनावर उमटवणारा, साहित्याच्या गगनी स्वैर विहार करणारा हा मुक्तछंद पक्षी ! ह्या मनस्वी व्यक्तिमत्वाला आरपार वेढलेल्या त्यांच्या कवितेचं इतकं विलोभनीय दर्शन रसिकांना घडतं की शेवटी ऋतूगंधच्या टीमला देखील त्यांना विचारावंसंच वाटलं की ‘ तुमच्या मनात एखादी कल्पना येते ती कोणत्या रूपांत येते ? शब्दांच्या..सुरांच्या..की रेषा अन् रंगांच्या ?

गदिमा प्रतिष्ठानचा चैत्रबन पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ना.घ.देशपांडे पुरस्कार,राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार, मटा सन्मान, अशा अनेकविध पुरस्कारांचे तुरे आपल्या शिरपेचात मिरवणारा,पण त्याचवेळी मातीत भक्कम पाय रोवलेला हा गुणी पण तितकाच मनस्वी कलाकार ! ‘चौकटचा राजा ‘, ‘कळत नकळत’ ह्या चित्रपटांतून, ‘एकाच ह्या जन्मी जणू ‘, ‘फिटे अंधाराचे जाळे ‘, ‘दयाघना ‘ सारख्या अवीट गोडीच्या गीतांतून आणि ‘शब्दधून ‘’, लय ‘, ‘आत्मरंग ‘सारख्या काव्यसंग्रहातून ह्या कलाकाराच्या कवितेवर रसिकांनी भरभरून प्रेम केलं व लोकप्रियतेच्या शिखरावर ह्या कविराजाला पोहोचवलं !

तर अशा ह्या कवीराजाची कविता मी घेऊन येतेय….!

*तरिही वसंत फुलतो*

 

प्रत्येक जन्मणारा क्षण शेवटास ढळतो

तरिही वसंत फुलतो….!

उमले फुले इथे जे, ते ते अखेर वठते

लावण्य,रंग,रूप सारे झडून जाते

तो गंध तो फुलोरा अंती धुळीस मिळतो

तरिही वसंत फुलतो….!

जे वाटती अतूट जाती तुटून नाते

आधार जो धरावा, त्यालाच कीड लागे

ऋतू कोवळा अखेरी तळत्या उन्हात जळतो

तरीही वसंत फुलतो….!

तरिही फिरून बीज, रूजते पुन्हा नव्याने

तरिही फिरून श्वास, रचती सुरेल गाणे

तरिही फिरून अंत उगमाकडेच वळतो

उगमाकडेच वळतो….!

प्रत्येक जन्मणारा क्षण शेवटास ढळतो

तरिही वसंत फुलतो….!

 

‘जातस्य ध्रुवो मृत्यु:’ हे शाश्वत सत्य ! जन्माला आलेल्याचा शेवट हा नक्कीच ठरलेला ! चराचरातील कुठलीही गोष्ट ह्याला अपवाद नाही. अगदी सुखदु:खाच्या क्षणांनाही शेवट हा असतोच ! आयुष्याला वेढून असलेल्या क्षणैक सुखदु:खाची क्षणभंगूरताच तर कवीला इथे स्पष्ट करायची नाहीय ना ?

उत्पत्ती स्थिती आणि लय ही  त्रिसूत्री युगानुयुगे समर्थपणे राबवणारा  तो सृष्टिकर्ता आणि त्या शाश्वत चिरंतनाचा मुकाट स्वीकार करणारं चराचर ! उन्हाळा, हिवाळा, आणि पावसाळा ह्या अव्याहत फिरणाऱ्या ऋतूचक्राचा ह्या सृष्टीवरील अखंड वावर आणि त्या ऋतूरंगात रंगलेले, दंगलेले, भंगलेले अवघे चराचर !

‘रंग माझा वेगळा’ म्हणणाऱ्या सहा ऋतूंच्या अनुपम सोहळ्यात चराचराने साजरा केलेला वसंतोत्सव, सोसलेल्या ग्रीष्माच्या झळा, झेललेल्या वर्षेच्या धारा, प्यायलेलं शरदाचं चांदणं, अनुभवलेली हेमंतातली शिरशिरी, पचवलेली शिशिरातली पानगळ ही सारी त्या नियंत्याचीच करामत ! त्या करामतीत जे जे फुलतं उमलतं ते अखेरीस वठतं ह्या चिरंतन सत्याचा अपरिहार्य स्वीकार हा गृहीतच धरलाय ! उमलणं, फुलणं, गंधवती, सौंदर्यवती होणं, व शेवटी पाकळ्या गळून कळाहीन होणं ह्या फुलाच्या अवस्था, तद्वतच, शैशव, तारुण्य आणि, वार्धक्य हे मानवी जीवनातले टप्पे ! पण आपलाच बहर वेचता वेचता कळाहीन अवस्थेला सामोरं जाणं  हे फुलाप्रमाणेच मानवालाही चुकलेलं नाही !

फुलाचा बहर, त्याचं लावण्य, त्याचा गंध जसा तात्कालिक, त्याचा शेवट हा ठरलेलाच तसंच माणूस देखील ह्या निसर्गनियमाला अपवाद कसा ठरणार ? अंती भुईच्या कुशीतच दोघांची  चिरविश्रांती !

माणसाचं भावविश्व म्हणजे  त्याचा जिवाभावाचा गोतावळाच  ! जणू काही त्याचंच एक अविभाज्य अंग  ! अनोख्या रेशीम बंधाने विणलेलं वस्त्रच जणू ! त्याचा पोत तलम, त्याची झळाळी अपूर्व !  संशय, गैरसमजाची कसर लागली की बघता बघता ते गर्भरेशमी वस्त्र विरायला वेळ देखील लागत नाही ! अतूट वाटणारी नाती बघता बघता दगा देतात, भावविश्वाला क्षणार्धात उध्वस्त करतात. आणि मग मनाच्या खास कप्प्यात जपलेली नात्याची कोवळीक करपायला वेळ लागत नाही !

बदल हा तर सृष्टीचा नियम.. आणि तो साऱ्या चराचराच्या अंगवळणी पडलेला ! त्यालाच अनुसरून पुन: होत्यांचं नव्हतं झालेलं चित्र पालटतं, अंताकडून उदयाकडे वाटचाल सुरू होते.   पुन: सृजनोत्सव, पुन: रूजणं, फुलणं, आणि सुरेल सुरावटीचं  आनंदगान गाणं !

अशा प्रकारे जीवनप्रवासातल्या साऱ्या स्थितीबदलांना सामोरं जातांना देखील दुर्दम्य आशावादाचा वसंत मनी जपण्याचा मंत्र देणारी ही कविता ! ऋतू बदलतात, दिवस पालटतात तसेच भोवतालच्या परिसरात, आयुष्यात कितीही आणि कशीही उलथापालथ झाली तरी सृष्टीचं ऋतूचक्र, जीवनाचं रहाटगाडगं  हे अव्याहत आणि नियमित सुरूच असतं, ते तुमच्यासाठी थांबणारं नसतं, ही जीवनातली अपरिहार्यता समजून घे असं सूचित करणारी आणि दुसऱ्या बाजूने हेही दिवस पालटतील हा दुर्दम्य आशावाद मनी बाळगण्याचा कानमंत्र  देणारी

ही मला अत्यंत भावलेली सुधीर मोघेंची रचना ! ‘तरिही वसंत फुलतो ‘ ही प्रत्येक कडव्याच्या शेवटी येणारी ओळ मनाला येणारी काजळी पुसून टाकण्याचं काम अतिशय सफाईने करते. आणि मन नकळत एका ठेक्यावर डोलत राहतं….* तरिही वसंत फुलतो*….!

 

© ज्योति हसबनीस,

नागपुर  (महाराष्ट्र)