मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – काव्य दिंडी # 2 – ☆ लाख हाते द्यावया आभाळ पुढती वाकले – स्व सुधीर मोघे ☆ – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

 

(सुश्री ज्योति  हसबनीस जीअपने  “साप्ताहिक स्तम्भ – काव्य दिंडी ” के  माध्यम से  वे मराठी साहित्य के विभिन्न स्तरीय साहित्यकारों की रचनाओं पर विमर्श करेंगी. आज प्रस्तुत है उनका आलेख  “लाख हाते द्यावया आभाळ पुढती वाकले – स्व सुधीर मोघे ” । इस क्रम में आप प्रत्येक मंगलवार को सुश्री ज्योति हसबनीस जी का साहित्यिक विमर्श पढ़ सकेंगे.)

 

☆साप्ताहिक स्तम्भ – काव्य दिंडी # २ ☆

 

☆ लाख हाते द्यावया आभाळ पुढती वाकले – स्व सुधीर मोघे ☆ 

 

कवितेची दालनं पार करत असतांना, अचानक सुधीर मोघेंची ही सुंदर रचना नजरेस पडली. तिच्या शब्दांनी मनाची पकड घेतली, नव्हे मनाचा तळच गाठला, आरपार सारं ढवळून निघालं आणि स्वत:चाच स्वत:शी मूक संवाद सुरू झाला.

 

*लाख हाते द्यावया आभाळ पुढती वाकले*

 

लाख हाते द्यावया आभाळ पुढती वाकले

ओंजळी पसरावया पण हात नसती मोकळे

 

स्वच्छंद वाटा धावत्या,डोळे दिवाणे शोधती

रेशमी तंतूत पण हे पाय पुरते  गुंतले

 

सागराच्या मत्त लाटा साद दुरूनी घालती

ओढतो जिवास वेड्या जीवघेणा तो ध्वनी

 

शीड भरल्या गलबतातून शीळ वारा घुमवितो

तीच वाटे येतसे जणू हाक अज्ञातातूनी

 

सांग ओलांडू कसा पण हा वितीचा उंबरा

झेप घेण्याला जरी तू दान पंखांचे दिले

 

थांबता ना थांबती ही वादळे रक्तातली

मस्तकी ना मावणारे वेड तू का घातले

 

लाख हाते द्यावया आभाळ पुढती वाकले

ओंजळी पसरावया पण हात नसती मोकळे

 

आयुष्याला सामोरं जातांना कित्येकदा एका ठराविक  चाकोरीतून जायला लागतं, तुमची इच्छा असो वा नसो. रूळलेली पायवाट आणि अंगवळणी पडलेली त्यावरची वाटचाल सुखावह वाटू लागते. मनातील सूप्त ईच्छा आकांक्षांना मूर्त रूप देण्यासाठी मदतीचा हात देणाऱ्या अनेक संधी आयुष्यात येतात. पण त्या संधीचं सोनं करून जीवनाला हवा तो आकार देण्याइतपत स्थिरता, शांतता मनाला असतेच कुठे ? ते तर गुंतलेलं असतं आपल्याच वाढवलेल्या पसाऱ्यात ! आपल्या आवडीच्या वाटावळणांवरून चौखुर स्वच्छंद उधळण्याचं त्याचं उराशी जपलेलं स्वप्न सत्यात उतरवण्यापेक्षा ह्या रेशमी धाग्यांतच अडकणं त्या मनाला भावतं. त्या रेशमी पसाऱ्यात संधीने अनेकदा दार ठोठावून देखील मनाची कवाडं ही बंदच राहतात !

ओढ असते, तुफानाची ! सागराच्या बेभान लाटांशी मस्ती करत त्यांच्यावर स्वार होण्याची ! जिद्द फुलली असते मनात, त्या सागराच्या गाजेत आपलाही हुंकार मिसळावा आणि फुटावं तिच्याचसारखं उंच उसळून, व अनुभवावा तो थरार ! असं पेटून उठण्याचं ते वय. पण त्याच क्षणी वारा वाहील तिकडे शीड फुलवून संथपणे एका लयीत मार्गक्रमण करणारं गलबत दृष्टीस पडावं, त्याचा तो कुठलाही प्रतिकार न करता वाऱ्याशी हातमिळवणी करत आपली दिशा बदलणं, म्हणजे जणू त्या अज्ञाताच्या हाकेला ओ देणंच ह्याची खुणगाठ मनी पटावी ! आणि स्वत:च्याही नकळत वारा वाहील तशी दिशा बदलवणाऱ्या म्हणजेच  तडजोड करणाऱ्या गलबताचीच ओढ मनी निर्माण व्हावी तोच प्रवास आपलासा वाटावा. तेच विधिलिखित आहे ह्याची खूणगाठ पक्की करावी आणि मनांस शांतवावे अशीच तर अवस्था झाली  असेल ना आपली ?

तरीदेखील एखादा क्षण असा येतोच की मनात कोंदलेलं वादळ पुन्हा एकदा रोंरावत बाहेर येतं. पुन्हा पुन्हा मन त्या वावटळीत गरगरतं, आणि गरगरत राहतात उराशी जपलेली स्वप्न, एखादा जीर्ण शीर्ण पाचोळा भिरभिरावा तशी !

आकाशात भरारी घ्यायला दिलेली मनाची उमेद, क्षितिज गाठायला दिलेले दोन सामर्थ्यशाली पंख सारं सारं अनुकूल असतांना उंबऱ्याशी पावलं अडखळावीत…..ह्याला नक्की काय म्हणावं..? कर्मदारिद्र्य म्हणत स्वत:ला दूषणं द्यावीत की दैवदुर्विलास म्हणत स्वत:ला गोंजारून घ्यावं ?

एखाद्या विचाराने झपाटलं जावं, कायावाचामने त्याचा ध्यास घ्यावा पण सततच परिस्थितीचा बाऊ करत प्रत्यक्ष त्याचा पाठपुरावा करण्यात कमी पडावं, हतबल व्हावं, परिस्थितीशरण व्हावं, असाच काहीसा विचार तर  कवितेतून डोकावत नाहीय ना ?

मनाचा तळ तर पार ढवळून निघाला. खुप अस्वस्थता मनाला आली…उगाचच यू ट्यूब वर एखादं मनाची मरगळ झटकून टाकणारं मस्त गाणं शोधावं म्हणून खटाटोप केला आणि काय जादू बघा ! यू ट्यूब वर ह्या कवितेतील शब्दांना सूरांची साथ मिळाली…बघता बघता ह्याच

शब्दांनी सूरांतून  मनावर मोहिनी घातली. कवितेचे गीत झाले, आणि मी मंत्रमुग्ध झाले !

माझ्याही नकळत मी गाऊ लागले….

लाख हाते द्यावया आभाळ पुढती वाकले

ओंजळी पसरावया पण हात नसती मोकळे..

 

© ज्योति हसबनीस,

नागपुर  (महाराष्ट्र)