मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #18 – धूर्त सारथी ☆ – श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है । आप  मराठी एवं  हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं।  आज साप्ताहिक स्तम्भ  – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती  शृंखला  की अगली  कड़ी में प्रस्तुत है एकसार्थक कविता “धूर्त सारथी”।)

 

 ☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 18  ☆

 

 ☆ धूर्त सारथी ☆

 

झालो गुलाम आहे सत्तांध या गटाचा

होतो विचार कोठे माझ्या इथे मताचा

 

सत्ता जरी बदलली मी हा तिथेच आहे

नेता धनाढ्य इतका व्यापार हा कशाचा

 

आश्वासने दिलेली होतील का पुरी ही

द्यावा कसा भरवसा सत्त्येतल्या ठगांचा

 

चारा दिसेल तिकडे घोडे असे उधळले

हो धूर्त सारथी मी होतो जरी रथाचा

 

सत्तेस भोगताना मी हात मारलेला

कारागृहात शेवट होणार या कथेचा

 

शिक्षा नकोच इतकी या सेवकास तुमच्या

मस्तीत गैरवापर होतो कधी पदाचा

 

पडलाय प्रश्न साधा जनतेस भाकरीचा

नापाक हा इरादा युद्धात झोकण्याचा

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

[email protected]