सुश्री आसावरी केळकर-वाईकर
☆ सूर संगत ☆ सूर संगत – भारतीय संगीतातील रागांवर आधारित ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆
(आज दस-यापासून आम्ही सूर संगत हे संगीतातील माहितीवर आधारित नवीन लेखमाला सादर. दर रविवारी एका रागाविषयी सुरेल माहिती क्रमश: सुरू करत आहोत. लेखिका सध्या चेन्नईस्थित असून ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रहमान ह्यांच्या KM College of Music & Technology मधे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या प्राध्यापिका आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक ठिकाणी शास्त्रीय, उपशास्त्रीय व सुगम गायनाचे कार्यक्रम सादर करतात.)
श्री सरस्वत्यै नम:
शीर्षक लिहीत असताना मनात विचार आला कि सूरसंगत मधे ‘स’ला उकार ऱ्हस्व किंवा दीर्घ कसाही दिला तरी अर्थात काय फारसा फरक पडणार आहे!? सुर म्हणजे देव आणि सूर म्हणजे संगीतातला स्वर! खरं पाहू जाता संगीत हाच देवाशी जोडणारा शीघ्रगतीमार्ग मानलेला आहे. त्यामुळं भाषेतील व्याकरणदृष्ट्या दोन्हींत फरक असला तरी सुर आणि सूर एकच असं म्हटलं तरी हरकत नसावी!
आजचा योगायोग असा कि आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दसऱ्याचा, सरस्वतीपूजनाचा दिवस आहे. सरस्वती सर्व कलांची देवता मानली जाते आणि भारतीय शास्त्रीय संगीतात सरस्वती नावाचा रागही असल्याने वाटलं कि, ह्या मालिकेची सुरुवात ‘सरस्वती’ रागानेच करूया. म्हटलं तर फार प्रचलित नसणारा किंवा तसा आधुनिक म्हणता येईल असा हा राग. कर्नाटकी संगीतातून हा राग हिंदुस्थानी पद्धतीत आलीकडच्या काळात आला असंही म्हटलं जातं. मात्र पूर्वीच्या जातीगायन पद्धतीत सुरांच्या केल्या जाणाऱ्या ‘परम्युटेशन कॉम्बिनेशन्स’च्या आधारे हे ‘कॉम्बिनेशन’ हिंदुस्थानी पद्धतीतही असणार, फक्त ते फार प्रचलित झालं नसावं असं म्हणता येईल.
लिहिता लिहिता असंही मनात आलं, भले आवडीचा प्रकार कोणताही असो मात्र संगीतावर प्रेम तर प्रत्येकाचेच असते. संगीताची नावड असलेला फारच विरळा! मात्र रागसंगीताचे शिक्षण प्रत्येकाने घेतलेले असते असे नाही. तर ह्या निमित्ताने सोप्या पद्धतीने तीही थोडी माहिती वाचकवर्गास करून द्यावी! प्रत्यक्ष रागसंगीताचा विद्यार्थी नसलेल्यांना फार सखोल ज्ञान हवं असं निश्चितच नाही. मात्र ह्या शास्त्रातील किमान मूलभूत गोष्टींची माहिती करून घेणं हे रंजक असेल हा विश्वास वाटतो. ही मालिका लिहिताना ह्या मूलभूत गोष्टींचा उल्लेख टाळून मी काहीच लिहू शकणार नाही आणि ह्या गोष्टींचे अर्थ माहीत नसतील तर वाचकांना तितकी मजा येणार नाही, म्हणून तोही खटाटोप!
सगळ्यात पहिलं म्हणजे राग आणि एखादं गाणं ह्यात काय फरक आहे? खरंतर ह्या विषयावर एक पूर्ण लेख होऊ शकेल. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर राग कसा गायचा/वाजवायचा ह्याचे काही ठराविक नियम पाळावे लागतात आणि अशा नियमबद्धतेतही उत्तम संगीतसाधक तासनतास एखादा राग गाऊ शकतोच, शिवाय प्रत्येकवेळी त्याच रागात नवनवीन नक्षीकामही करू शकतो. एखादं गीत मात्र त्याची विशिष्ट स्वररचना निश्चित झाल्यावर प्रत्येकवेळी जसेच्यातसे गायले जाते.
एक ठराविक आरोह-अवरोह असताना राग बराच काळ गाणे कसे शक्य होते? थोडक्यात सांगायचे तर प्रत्येकवेळी ‘कॅलिडोस्कोप’ फिरवला असता त्याच ठराविक काचेच्या तुकड्यांतूनच कशी नवनवीन डिझाईन्स तयार होतात, तसंच रागात जे काही स्वर असतील त्यांचा वापर करून कलाकार नवनवीन ‘स्वरांची डिझाईन्स’ शोधत राहातो. कलाकाराची कल्पनाशक्ती, सृजनशीलता आणि व्यासंग जितका उत्तम तितकी उत्तमोत्तम आणि जास्त संख्येनं डिझाईन्स रेखून तो रागाचं महावस्त्र देखणेपणी विणत राहातो.
मुळात आरोह-अवरोह म्हणजे काय? संगीतातील ‘सा रे ग म प ध नी’ हे सात सूर सर्वांनाच माहिती असतील. मात्र प्रत्येकच रागात सातही स्वर वापरले जातात असं नाही. कमीतकमी पाच सूर रागात असावे लागतात. त्यामुळं रागात कोणतेही पाच, सहा किंवा सात सूर असतात असं ढोबळमानानं म्हणता येईल. खालच्या ‘सा’पासून वरच्या ‘सा’पर्यंत रागात वापरल्या जाणाऱ्या स्वरांच्या चढत्या अनुक्रमास आरोह म्हणतात आणि वरच्या ‘सा’पासून खालच्या ‘सा’पर्यंत उतरत्या क्रमातील स्वरानुक्रमास अवरोह म्हणतात. एकाच रागाच्या आरोह व अवरोहातील स्वरसंख्या व स्वरही सारखेच असतील असेही नसते. मात्र रागाच्या आरोह-अवरोहात कलाकाराला काहीही बदल करता येत नाही किंवा त्यात नसलेला कोणताही दुसरा सूर रागात वापरता येत नाही.
सरस्वती रागाविषयी बोलायचे झाले तर पटकन आठवते ‘हे बंध रेशमाचे’ ह्या संगीत नाटकातील ‘विकल मन आज’ हे पद! हे संपूर्णच गीत पं. जितेंद्र अभिषेकींनी सरस्वती रागावर बेतलेलं आहे. दुसरं एक भावगीत आठवतं ते म्हणजे सुमन कल्याणपुरांच्या आवाजातलं ‘रिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात!’ ह्या गाण्यात मात्र ध्रुवपद सरस्वती रागाचा भास निर्माण करत असले तरी पुढे रागात नसलेल्या सुरांचाही वापर झाला आहे. अर्थातच एखादी सुरावट राग म्हणून सादर होत नसेल तर तिथे रागाचे नियमही लागू होत नाहीत. म्हणूनच सुगम व उपशास्त्रीय संगीतात रागाचे बंधन न पाळता संगीतकाराच्या कल्पकतेनुसार स्वररचना तयार होते. आपण फक्त एखाद्या गाण्याला विशिष्ट रागाधारित गीत म्हणतो कारण ती स्वररचना आपल्याला त्या रागाची आठवण करून देते. मात्र त्या रचनेसारखेच त्या विशिष्ट रागाचे स्वरूप आहे असे म्हणणे मात्र संयुक्तिक होणार नाही.
सरस्वती रागाच्या आरोह व अवरोह दोन्हींतही सहा सूर आहेत. ‘सा, रे, तीव्र म, प, ध, कोमल नि, सां’ असा रागाचा आरोह आणि ‘सां, कोमल नि, ध, प, तीव्र म, रे, सा’ असा अवरोह आहे. हा राग कल्याण थाटातून उत्पन्न झाला आहे. रागशास्त्रानुसार रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी हा राग गायला जातो. वरील गीतांच्या गोड चाली आठवल्या तरी राग अत्यंत मधुर असल्याचे आपल्याला जाणवेल. शुद्ध ‘रे’ वरून ‘तीव्र म’वर जाणं हा प्रत्येकच वेळी मनाला सुखद झोका आहे आणि त्यापुढं येणारी पधनिधसां ही स्वरसंगती अत्यंत लडिवाळ भासते. परंतू हे शुद्ध, कोमल, तीव्र स्वर म्हणजे काय प्रकार आहे? याविषयी आपण पुढच्या लेखात जाणून घेणार आहोत.
मी अत्यंत टाळंटाळ करत असतानाही नेटाने माझ्या मागे लागून मला ह्या विषयावर लिहायला प्रवृत्त केल्याबद्दल उज्वलाताईंना मन:पूर्वक धन्यवाद! जिज्ञासू वाचकांच्या सूचना, प्रतिक्रिया व प्रश्नांचे जरूर स्वागत आहे. ही लेखमाला वाचतावाचता वाचकांच्या मनात रागसंगीताविषयी आस्था निर्माण झाली तर त्याहून मोठा आनंद नाही.
© सुश्री आसावरी केळकर-वाईकर
चेन्नई
मो 09003290324
ईमेल – [email protected]
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
खूप इच्छा होती संगीत समजून घ्यायची! धन्यवाद !