सुश्री अरूणा मुल्हेरकर
☆ सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन ( भाग १ ) ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆
मागील पांच सहा भागांत काही रागांविषयी लिहिल्यानंतर मनांत आले की वाचकांना राग गायनाच्या विविध ढंगांविषयी थोडी माहिती प्रस्तूत करावी.
पंधरा/सोळाव्या शतकांत अकबर बादशहाच्या नवरत्न दरबारांत संगीत क्षेत्रांतील मिया तानसेन हे एक रत्न होते, हे बहुतेक सर्वांनाच ज्ञात आहे. ह्या तानसेनाची रागदारी संगीत पेश करण्याची जी पद्धत होती तिचा उल्लेख धृपद गायन असा केलेला आढळतो. तानसेनांनाही धृपदिया या विशेषणाने संबोधिले जात असे.हीच गायकी त्या काळांत प्रचलित होऊन अनेक धृपदिये प्रसिद्ध झाले. तत्पूर्वी मंदिरांतून ईशस्तूति करण्यासाठी ही धृपद गायन पद्धति होती, परंतु तानसेन आणि त्याचबरोबर राजा मानसिंग या दोघांनी हे गायन देवळांतून राजदरबारी नेले.
ह्या गायकीची खास वैशिष्ठ्येः
गीत रचना चार टप्प्यांमध्ये असते.
१) अस्ताई ~ पुर्वार्ध
२) अंतरा ~ उत्तरार्ध
३) संचारी ~ दुसरा अंतरा
४) आभोग ~ तिसरा अंतरा
गायन सादर करतांना प्रथम रागांतील स्वरांचे तालमुक्त आलाप गातात,आलापीच्या शेवटच्या टप्प्यांत गमकयुक्त ताना घेतल्या जातात. विविध प्रकारची लयकारी आणि बोलताना हे धृपद गायकीचे खास वैशिष्ठ्य आहे. अनिबद्ध आलाप गायन हा धृपदाचा मन लुब्ध करणारा भाग आहे. यांतून रागाचे स्पष्ट स्वरूप श्रोत्यांना दिसून येते.
सरगम गाण्याची प्रथा या ठिकाणी अपेक्षित नाही.आलापीनंतर गीत सादर करतांना पखवाज किंवा मृदुंग हे तालवाद्य साथीला असते. धृपद गायन अत्यंत जोरकस व मर्दानी आवाजात असते त्यामुळे धृपद गायकीत स्री कलावंत आढळत नाहीत. गीतांतील काव्य वीर, शृंगार आणि भक्तिरसाला पोषक असे आहे. ईश्वरस्तुती,संगीत शास्रांच्या नियमांचे वर्णन,निसर्ग सौंदर्य,बादशहाच्या दरबाराचे वर्णन हे प्रामुख्याने गीतांचे विषय.धृपदांत चार प्रकार आढळतात.
गौबरहार बानी,खंडारबानी,डागुरबानी आणि नौहारबानी. मिया तानसेनाची गौबरहारबानी, जी अत्यंत प्रासादिक व शांत रसाचा परिपोष करणारी होती.अकबराच्याच कारकिर्दीतील समोखसिंह नामक बीनकाराच्या खंडहार या निवासस्थानावरून त्याच्या धृपदास खंडारबानी हे नाव पडले. गातांना सरळ स्वर न घेता खंडित स्वराविष्कार करणे ही ह्याची खासियत!व्रजचंद नावाचा धृपदिया डागूर या गावचा,त्यावरून त्याची धृपद गायकी डागूरबानी या नावाने ओळखिली जाऊ लागली.वैचित्र्यपूर्ण व रहस्यमय भाव प्रकट करणे हे याचे गायन कौशल्य! धृपद गायक श्रीचंद रजपूत नौहरगांवचा. त्याची वाणी ती नौहरबानी अशी ओळख!एका स्वरावरून पुढल्या स्वरावर जातांना मधले एखाद दोन स्वर वगळणे ही ह्याची शैली!
चौताल,रुद्रताल,ब्रम्हताल,सूलताल,मत्तताल या तालांमध्ये बहुतेक धृपदांच्या गीतरचना केलेल्या आढळतात.
तानसेनाचे गुरू हरीदास यांनी धृपदांत बर्याच रचना केल्या. नमून्यादाखल चौतालात निबद्ध असलेली ही रचना पहावी.
” हरी हरी छाॅंडके फिरहु न आवे तोरे
एक एक घरी तोहे करोरन कीजात है ~ अस्ताई
घरी पल दिन सोये फिरहु न आवे तोरे
छिन भंग देहताको मरन जैसी घात है ~अंतरा
प्रभू को संभार प्यारे तजके अमृत बिष
काहेको खात है~ संचारी
कहे हरीदास यह साॅंसको बिश्वास कहाॅं
एक एक छिनमे वो तो निकस निकस जावत है ~
आभोग.
धृपदाच्या बरोबरीनेच धमार गायन प्रचारांत आले. यांतील रचना चौदा मात्रांच्या धमार याच तालांतील असतात आणि बहुतांशी शृंगार रसप्रधान असतात. होळी रंगपंचमी हे या गीतांचे प्रमूख विषय.
आजकाल धृपद गायकी विशेष प्रचारांत नसली तरी डागर बंधू, गुंडेचा बंधू आणि अगदी आजचे धृपद गायक पं.उल्हास कशाळकर ही नावे या क्षेत्रांत प्रसिद्ध आहेत.
अठराव्या शतकाच्या सुरवातीला धृपद गायकी मागे पडून ख्याल गायकी पुढे आली.
क्रमशः….
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈