सुश्री अरुणा मुल्हेरकर
☆ सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग ५) – अभंग/भजन/भावगीत गायन ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆
शास्त्रीय संगीतावर लिहीत असतांना भक्तीगीत गायन, भावगीत गायन ह्यावर विचार होणे आवश्यक आहे असे मला वाटते कारण रागदारी संगीताला आपण “Music of class म्हटले तर अभंग, भावगीत गायनाला Music of mass म्हणणे योग्य होईल.
संगीताची आवड नाही असा मनुष्य विरळाच! त्याला गायनाविषयी कसलीही जाण नसली तरी देव माझा विठू सांवळा सारखे एखादे भक्तीगीत किंवा शुक्रतारा सारखे भावगीत कानांवर आले की मनाला कसे प्रसन्न वाटते. श्रोताही ते नकळतपणे गुणगुणु लागतो.
ज्ञानेश्वर महाराज, नामदेव, तुकाराम आदि महाराष्ट्रांतील संत मंडळींनी असंख्य अभंगरचना करून ठेवल्या आहेत आणि त्यांतील कित्येक अभंगांना र्हुदयनाथ मंगेशकर, सुधीर फडके, जितेंद्र अभिषेकीसारख्या दिग्गज संगीतकारांनी स्वरबद्ध केल्यामुळे ते अभंग आपल्या ओठांवर रेंगाळत रहातात.
शास्त्रीय संगीताचा आधार असलेली ही एक स्वतंत्र गायन शैली असे आपल्याला अभंग/भजन याविषयी म्हणतां येईल. अभंग एक व्यक्ति गाऊ शकते आणि भजन हे टाळ, झांजा यांच्या गजरांत सामूहिकरित्या सादर केले जाते असा अभंग व भजनांतील फरक! दोन्हीही प्रकार पूर्णतया भक्तीरसांत भिजलेले. यमन, यमनकल्याण, भीमपलास हे अभंग~ गायनाचे अगदी खास राग! समाधी साधन। संजीवन नाम। हा श्री सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेला व गायिलेला अभंग, किंवा माणिकबाईंची कौसल्येचा रामबाई, धननीळा लडिवाळा ही भक्तीगीते ही यमन, यमन कल्याणची उदाहरणे नमूद करता येतील, तसेच मा. कृष्णराव यांनी संगीत दिलेला अवघाची संसार सुखाचा करीन हा ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग भीमपलासीच्या सुरांनी नटलेला आहे. माणिक वर्मांचे अमृताहुनी गोड हे भीमपलासांतील भक्तीगीत तर वर्षानुवर्ष्ये संगीतप्रेमी गात आहेत. याचा अर्थ असा नाही की दुसर्या कोणत्या रागांत भक्तिरचना नसतात. अबीर गुलाल उधळीत रंग यांत देसकारचे दर्शन घडते, ओंकार स्वरूपा या एकनाथ महाराजांच्या अभंगाला श्रीधर फडके यांनी बैरागीचा स्वरसाज चढविला आहे. आजि सोनियाचा दिनु हा ज्ञानेशांचा अभंग र्हुदयनाथांनी भैरवीच्या स्वरांनी भक्तीरसांत बुडविलेला आहे. कानडा राजा पंढरीचा हा तर मधूर मालकंस, भीमसेन अण्णांनी अजरामर केलेला आणि आता यूट्यूबवरून राहूल देशपांडे आणि महेश काळे ह्या द्वयीॅनी घराघरांत पोहोचविलेला. एकूण रागदारी संगीतावर आधारित हे अभंग गायन!
साथीला एकतारी, टाळ आणि मृदुंग असले की भक्तीचे वातावरण चांगलेच तयार होते आणि पट्टीचा कलावंत समर्थपणे सूर, ताल व लय सांभाळून जेव्हा भक्तीगायनाची कला सादर करतो तेव्हा तो श्रोत्यांच्या ह्रुदयाचा ठाव घेतो.गायकाने अभंग संपवितांना विविध ढंगाने पांडुरंग पांडुरंग किंवा विठ्ठला मायबापा असा नामाचा गजर सुरू केला की आपण गाण्याच्या कुठल्या मैफिलीत नसून प्रत्यक्ष ईश्वरदरबारीच बसलो आहोत अशी मनोधारणा होते. हेच खरे भक्तीगीत/अभंग गायन!
भावगीत गायन हा गाण्याचा अगदी स्वतंत्र आणि वेगळा प्रकार! भावनांचा मेळ दर्शविणारी काव्य रचना~कविता, मग त्या मीलनाच्या असतील, विरहाच्या असतील,प्रीतीच्या असतील अथवा निसर्गांतील रंगछटांविषयी असतील,त्या त्या भावरूपी शब्दांना चढविलेला स्वरसाज म्हणजे कवितेचे होणारे भावगीत!
शांताबाई शेळके, मंगेश पाडगांवकर, सुरेश भट आदि काव्य रत्नांच्या कवितांना ह्रुदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, श्रीनिवास खळे, अरूण दाते वगैरे संगीत कारांनी व गायकांनी कवितांचा हा अनमोल ठेवा भावगीतांच्या स्वरूपांत जनतेला,आम्हा रसिकांना दिला.ह्या भावगीत गायनांत आलापी, तानबाजी यांची जराही अपेक्षा नसते. अमूक एक रागांतच ते असले पाहीजे असेही काही बंधन नाही.मात्र शब्दांतून भावना प्रकट करतांना सुरांच्या श्रृतींवर विशेष लक्ष दिल्यास ते भावगीत श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेते.
कांटा रुते कुणाला, शूर आम्ही सरदार, ऋतु हिरवा ऋतु बरवा, काय बाई सांगू कसं ग सांगू, दिवस तुझे हे फुलायचे,या जन्मावर या जगण्यावर शतदां प्रेम करावे,दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे, मेंदीच्या पानावर,तरूण आहे रात्र अजुनी,श्रावणांत घननीळा बरसला ही व अशी कित्येक भावगीते अवीट गोडीची आहेत नि ती आपल्याला कायम आवडतात,आपल्या ओठांवर गुणगुणली जातात याचे कारण त्यांच्यावर चढविलेले स्वरालंकार हे बनावट नसून अस्सल बावनकशी आहेत. ही अशी गीते ऐकली की मनांत येतं, गाणं कोणतंही असो जे कानाला गोड वाटेल आणि मनांत रेंगाळत राहील तेच खरं संगीत!
क्रमशः….
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈