सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – १६) – ‘क्षणसंगीत’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆

जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासात मानवी आयुष्यातील प्रत्येक महत्वाचा क्षण साजरा करताना माणसानं संगीताची मदत घेऊन ते क्षण आणखी देखणे कसे केले हा विचार केला कि विविध गीतप्रकार आठवून थक्क व्हायला होतं… मुळात एका जिवाच्या जन्माची चाहूल लागल्याचा एखाद्या भावी मातेच्याआयुष्यातील आनंदी क्षण सर्वांसोबत वाटून घेताना गायली जाणारी डोहाळतुलीचं कोडकौतुक करणारी, येत्या जिवाच्या आगमनाचं सहर्ष स्वागत आणि त्याच्यासाठी शुभचिंतन करणारी डोहाळगीतं, मग मूल जन्मल्यावर त्याला जोजवताना वेळोवेळी गायली जाणारी अंगाईगीतं आणि बारशाच्यावेळी त्याच्या आगमनाचा आनंद व्यक्त करणारी, त्या जिवासाठी परमात्म्याचे आशीष मागणारी, त्या निरागस जिवाचं गुणागान करणारी, त्या जिवानं पुरुषार्थ गाजवावा म्हणून सहजी दोन महत्वाच्या कानगोष्टी सांगणारी पाळणागीतं, पुढं त्या बालजिवाचं छोट्या-छोट्या बडबडगीतांतून केलेलं मनोरंजन आणि कधी अशा गीतांतूनच नकळत त्याला दिलेलं जगण्यासाठी आवश्यक तत्वांचं बाळकडूही संगीतामुळं सहज सोप्या पद्धतीनं मनात रुजायला मदत होते.

पुढं त्या जिवाच्या आयुष्यातील प्रत्येक शुभप्रसंगी गायल्या गेलेल्या मंगलाक्षतांचा विचार केला कि लक्षात येतं त्या मंगलगीतांमुळं त्या क्षणांतला आनंद द्विगुणित होतोच, शिवाय आयुष्यात येणारं ते बदलाचं वळण सहज पार करण्यासाठी कोणत्या जबाबदाऱ्यांची जाणीव मनात असावी हेही नकळत सुचवलं जातं.

मुलांच्या मौंजीबंधनाला सध्या एका संस्कारापेक्षा ‘इव्हेंट’चं जास्त रुपडं आलं आहे. पूर्वीसारखे हे बटू आता मातेला सोडून गुरुगृही राहायला जात नाहीत, स्वत:ची कामं स्वत: करून काबाडकष्ट काढून त्यांना शिक्षण घ्यावं लागत नाही हे जरी खरं असलं तरीही आता बाल्यावस्थेतला पहिला टप्पा पार झाला आहे आणि विद्याभ्यासासाठी आपल्याला एका निर्धारानं सज्ज व्हायचं आहे ही जाणीव त्या जिवात रुजणं आवश्यक आहेच. आत्ताच्या काळानुसार विद्याभ्यासासाठीच्या त्यांच्या काबाडकष्टांचं स्वरूप बदललं आहे इतकंच! पण कष्ट हे घ्यावे लागणार असतातच आणि त्यासाठी सातत्यानं मनोबल राखून ठेवण्याची गरज आणि त्यासाठी काय करावं लागेल हे सगळं ह्या मंगलगीतांतूनच सूचित केलं जातं.

मातृभोजनावेळच्या गीतांतले संकेत म्हणजे आता आईचं बोट सोडून आपल्याला जास्त वेळ शाळेत राहून शिक्षण घ्यायचं आहे, त्यावेळी आई सोबत नसणार तरीही मन लावून आपल्याला अभ्यास करायचा आहे. मंगलाष्टकांमधे बटूच्या विद्याभ्यासासाठी देवदेवतांचे आशीर्वाद मागितले जातात, त्या बटूनं आता खंबीरपणे, दृढनिश्चयानं, नियमांचं पालन करत संयम राखून विद्यार्जनासाठी परिश्रम करणं त्याचा भविष्यकाळ उज्वल करण्यासाठी किती आवश्यक आहे हे सूचित केलं जातं, त्यासाठी मौंजीबंधनाच्या रुपानं त्याच्यावर काय संस्कार केले जात आहेत त्याचा अर्थ सांगितला जातो.

मंगलाष्टकाचे ते सूर जमलेल्या इतरेजनांचं मनोरंजन करतात, त्याच्या आप्तेष्टांचा आनंद द्विगुणित करतात, त्या सोहळ्याची रंगत वाढवतात आणि त्याचवेळी त्या बटूच्या मनात निश्चितच काही अनमोल भावतरंग उमटवतात. संगीताची ही केवढी मोठी किमया आहे. त्या क्षणापर्यंत ‘बाळ’ असणारा तो जीव थोडा का होईना वेगळा भासायला लागतोच. मंगलगीतं आणि मंत्रसंस्कार दोन्हीच्या सुरांमुळं सोहळा देखणा होतोच परंतू आयुष्यात महत्वाचं वळण येतंय आणि त्याला जबाबदारीनं सामोरं जायला हवं, हा विचार त्या बालजिवाच्या मनात त्याच्या त्यावेळच्या जाणिवेच्या कुवतीनुसार, त्याच्या बालबुद्धीनं केलेल्या आकलनानुसार का होईना अधोरेखित व्हायला मदत नक्की होत असणार.

त्यापुढचा मोठा संस्कार म्हणजे लग्नसंस्कार! दोन जिवांचं, दोन घराण्यांचं, दोन विचारप्रवाहांचंही मीलन होताना त्यातून नवीन सुंदरसं काही अंकुरावं, उत्पन्न व्हावं हा विश्वनियमही राखला जावा असा हा संस्कार! ह्या सोहळ्यातील पूर्वसंस्कार, प्रत्यक्ष विवाहसोहळा आणि त्यानंतरचेही सर्व विधी, धार्मिक प्रथा, चालीरिती सगळं अत्यंत संगीतमय आहे. सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवून जात्याची पूजा करताना कर्त्याधर्त्या गणेशाचं केलेलं स्तवन, घाणा भरताना गायल्या जाणाऱ्या ओव्या, उत्सवमूर्तींना हळद लावताना गायली जाणारी गीतं, लेकीची पाठवणी करताना विहीणबाईंना तिला सांभाळून घेण्याची विनवणी करणारी गीतं, कारल्याच्या वेलाखालून विहीणबाई जाताना गायली जाणारी मांडवगीतं असे किती प्रकार सांगावे. ह्यावेळी जे उखाणे घेतले जातात ती भले गीतं नसतील, मात्र त्यातही एक लय सांभाळली गेली असेल तरच ते उखाणे रंगतदार होतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या संपूर्ण सोहळ्यात सुरू असणारं सनई, चौघडे अशा मंगलवाद्यांचं पार्श्वसंगीत जी वातावरणनिर्मिती करतं तिचं वर्णन शब्दांत करताच येणार नाही.

प्रत्यक्ष दोन जिवांच्या डोक्यावर अक्षत पडते त्यावेळी गायल्या गेलेल्या मंगलक्षतांतून तर किती वैविध्यपूर्ण संकेत त्या दोन्ही जिवांना दिले जातात. सामोऱ्या येत असलेल्या वळणातली असीम सुंदरता सांगितली जाते, त्याबरोबरच ती सुंदरता राखण्यासाठी आपापला अहंभाव सोडून एकमेकांत विरघळून जाण्याची आवश्यकता, आता आपण एकटे नाही तर आपल्या दोघांचं मिळून एकच आयुष्य आहे हा अत्यावश्यक विचार आणि ह्यासोबत दोघांच्या आजवरच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडली गेलेली नातीगोती, भावसंबंध आदरभावानं जपणं, वृद्धिंगत करणं ह्या नव्या जबाबदारीविषयीही संकेत दिला जातो.

लग्नसमारंभानंतर वरगृही पूजेसोबतच प्रथा म्हणून काही ठिकाणी गोंधळ घालण्याची प्रथा आहे. खास गोंधळी लोकांना बोलावून ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. अर्थातच अठरापगड जाती असलेल्या आपल्या देशात गोंधळाप्रमाणेच इतरही अनेक प्रथा विविध समाजांमधे अस्तित्वात आहेत आणि त्या-त्या गोष्टींत पारंगत असणाऱ्या कलाकारांना मुद्दाम आमंत्रित करून ह्या प्रथा साजऱ्या केल्या जातात.

त्यानंतर वर्षभरातल्या सणसमारंभांपैकी मंगळागौरीसारखे सण म्हणजे तर संगीतानेच सजलेले म्हणायला हवेत. त्यातले विविध खेळ आणि त्यावेळी गायली जाणारी गीतं म्हणजे ‘स्त्रीगीते’ ह्या लोकसंगीतप्रकारातला सुंदर भाग आहे. त्यात गीत आणि नृत्य ह्याचं सुंदर मिश्रण आहे. जगणं जास्तीत जास्त सुंदर करण्यासाठी क्षणांचा उत्सव करण्याची मानवी मनाची उर्मी संगीताच्या मदतीनं कशी नेमकेपणानं भागवली जाते ह्याची ही सगळी उदाहरणं म्हणता येतील. माणसाच्या जगण्यातली, संस्कृतीतली संगीताची प्रचंड व्याप्ती ह्या सगळ्या उदाहरणांतून आपल्याला दिसून येते.

अर्थातच मी जे-जे उल्लेख केले ते एकतर जगण्यातल्या व्यक्तिगत क्षणांमध्ये सामावल्या गेलेल्या संगीताविषयी आणि मला माहिती असलेल्या गोष्टींतून… मात्र ह्यापेक्षा कितीतरी जास्त प्रकार निश्चितच अस्तित्वात आहेत. प्रांत व त्याचे भौगोलिक वैशिष्ट्य आणि त्यानुसार जन्मलेली तिथली संस्कृती, भाषा, समाजव्यवस्थेनुसार विशिष्ट जनसमुदाय अशा अनेक गोष्टींनुसार अक्षरश: अनेकविध गीतप्रकार अस्तित्वात आलेले आहेत.

राहाता राहिला मानवी आयुष्यातील सर्वात गंभीर क्षण… अंतिम क्षण… मृत्यू! ह्या क्षणातही मानवानं किती विविध दृष्टीकोनांतून संगीताला सामावून घेतलं आहे… भावनांचा निचरा होण्यासाठी, मनाला अंतिम सत्याची जाणीव करून देण्यासाठी इ. गोष्टींपासून ते अगदी मृत्यूची खात्री करून घेण्यासाठीही, ह्याविषयी माहिती पुढच्या लेखात पाहूया!

क्रमशः….

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 4 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments