सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग १०-२) – राग~मारवा, पूरिया, सोहोनी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

मारवा~पूरिया या प्रसिद्ध जोडीतील पूरिया या रागाविषयी आपण आज विचार करू या.

मागील लेखांत आपण पाहीले आहे की मारवा पूरिया सोहोनी ही एकाच कुटुंबातील सख्खी भावंडे! परंतु वादी~ संवादी स्वरांच्या भिन्नतेमुळे प्रत्येकाचे चलन स्वतंत्र, अस्त्तित्व स्वतंत्र! पूरियांत गंधार व निषाद ह्या स्वरांना अधिक महत्व आहे. रात्रीच्या प्रथम प्रहरी हा राग सादर केला जातो. मध्यम जरी तीव्र असला तरी मारव्याची उदासीनता पूरियांत नाही. मात्र ह्याची प्रकृती काहीशी गंभीरच! अधिकतर पूरिया मंद्र व मध्य सप्तकात गायिला वाजविला जातो, म्हणजेच हा पूर्वांगप्रधान राग आहे. स्वरांच्या वक्रतेमुळे हा राग मनाला मोहवितो. जसे~”नी (रे)ग, (म)ध ग(म)ग, ध नी  (म)ध ग(म)ग,” अशा प्रकारे वक्र स्वररचना आढळते. नि (रे)सा, ग(म)ध नी (रे)सा/सा नी ध (म)ग (रे)सा असे याचे आरोह/अवरोह आहेत. ‘ग, नी (रे)सा, नि ध नि (म)ध (रे) सा’ या स्वरसूमूहावरून पूरियाची तात्काळ ओळख पटते. या रागाचे पूर्ण चलनच वक्र आहे.

प्रसिद्ध शास्त्रीय गायक बडे गुलाम अली खाॅं यांच्याविषयी असे सांगितले जाते की मुंबईत विक्रमादित्य संगीत परिषदेत बडे गुलाम अली यांनी अल्लादिया खाॅं, फैय्याज खाॅं, हाफीज अली खाॅं यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत मारवा आणि पूरिया हे दोन राग एकापाठोपाठ गायले होते, आणि त्यांचे गायन ऐकून बूजूर्ग मंडळी अगदी अवाक झाली. एका रात्रीतच बडे गुलाम अलीना मुंबईत प्रसिद्धी मिळाली.

वियोग,शृंगाररसोपयुक्त असा हा पूरिया,कारूण्यपूर्ण श्रृंगार हाच या रागाचा स्थायीभाव!

शूद्ध पूरियांतील गाणी सहसा सांपडत नाहीत, परंतु ‘सांज ये गोकुळी सावळी सावळी’, ‘मुरलीधर शाम हे नंदलाला’, ‘क्षणभर उघड नयन देवा’ ही काही भावगीते, भक्तीगीते पूरिया रागावर आधारित  म्हणून उदाहरणादाखल देता येतील. “जिवलगा राहीले दूर घर माझे” ह्या भावगीतांत पूरियाचे स्वर असले तरी त्याबरोबर धनाश्री येऊन तो पूरिया धनाश्री झाला आहे. पूरियांत नसलेला पंचम ह्यांत आहे. सूरत और सीरत या चित्रपटांतील ‘प्रेम लगन’, आई मिलनकी रात मधील कितने दिनो की बात आई सजना रात मिलनकी, ‘रंगीला मधील ‘समा ये क्या हुआ, रुत आ गयी रे रुत छा गई रे’ ही काही बाॅलीवूड गाणी पूरिया धनाश्रीची उदाहरणे सांगता येतील ह्या गाण्यांकडे पाहीले असता पूरिया हा करूणरसप्रधान शृंगार वर्णन करणारा राग असल्याचे सर्वसामान्यांच्याही लक्षात येते.

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments