सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगीत राग गायन (भाग १०-३) – राग~मारवा, पूरिया ~सोहोनी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

सोहोनी

सोहोनी म्हणजे पूरियाचीच प्रतिकृति,फरक इतकाच की पूरिया पूर्वांगात तर सोहोनी उत्तरांगात रमणारा राग. तार षड् ज हे सोहोनीचे विश्रांतीस्थान. मध्यसप्तकांतील सुरांकडे येऊन तो पुन्हा तार षड् जाकडे धांव घेतो. उत्तरांगातील धैवत आणि पूर्वांगांतील  गंधार हे याचे अनुक्रमे वादी/संवादी स्वर म्हणजे मुख्य स्वर.

मारवापूरियासोहोनी, सगळ्यांचे स्वर तेच म्हणजे रिषभ कोमल आणि मध्यम तीव्र.

सा ग (म)ध नी सां/सां (रें)सां,नी ध ग,(म)ध,(म)ग (रे)सा असे याचे आरोह अवरोह.कंठाच्या सोयीसाठी आरोही रचनेत रिषभ वर्ज्य केला जातो. सांनी ध, ग (म)ध नी सां ही रागाची मुख्य सुरावट त्याचे स्वरूप स्पष्ट करते. पंचम वर्ज्य असल्याचे वरील स्वर समूहावरून वाचकांच्या लक्षात येईलच. वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.

मारवा कुटुंबांतील हे कनिष्ठ भावंड अतिशय उच्छृंखल, चंचल प्रवृत्तीचे असल्याचे लक्षांत येते.

मारव्यांत कोमल रिषभाला प्राधान्य तर सोहोनीत रिषभाचा वापर अत्यंत अल्प स्वरूपात त्यामुळे मारव्याची कातरता, व्याकूळता यांत नाही.

सोहोनीचा जीव तसा लहानच. त्यामुळे जास्त आलापी यांत दिसून येत नाही. अवखळ स्वरूपाचा हा राग मुरक्या, खटका, लयकारी यांत अधिक रमतो. नृत्यातल्या पद  रचना, एकल तबल्याचा लेहेरा अशा ठिकाणी सोहोनी चपखल बसतो. पट्टीचा कलावंत मात्र हा अल्पजीवी राग मैफिलीत असा काही रंग भरतो, की तो त्याला एका विशिष्ठ ऊंचीवर नेऊन ठेवतो, आणि त्यानंतर दुसरा राग सादर करणे अवघड होऊन बसते.

सुप्रसिद्ध अभिनेत्या भारती आचरेकर यांनी एकदां त्यांच्या मातोश्री कै. माणिकबाई वर्मा यांची आठवण सांगतांना एक किस्सा सांगितला होता. माणिक वर्मांनी एका मैफिलीत “काहे अब तुम आये हो” ही सोहोनीतील बंदीश पेश केली होती. रात्र सरत आल्यावर घरी परत आलेला तो, त्याच्याविषयीचा राग, मनाची तडफड पण त्याच क्षणी त्याच्याविषयी वाटणारी ओढ हा सगळा भावनाविष्कार त्या बंदीशीतून अगदी सहज साकार झाला होता. श्रोत्यांमध्ये पू.ल. देशपांडे बसले होते. ते सहज उद्गारले, “मी यापुढे कित्येक दिवस दुसरा सोहोनी ऐकूच शकणार नाही.”

राधा~कृष्णाच्या रासक्रीडेवर आधारित सोहोनीच्या अनेक बंदीशी आहेत. “रंग ना डारो श्यामजी गोरीपे” ही कुमारांची बंदीश प्रसिद्धच आहे.”अरज सुनो मेरी कान्हा जाने अब। पनिया भरन जात बीच रोकत बाट।” ह्या बंदीशीतही गोपींची छेड काढणारा नंदलाल आपल्याला दिसतो.

भक्तीरसाचा परिपोष सोहोनीच्या सुरावटीतून किती सहज दिसून येतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे पं.जितेंद्र अभिषेकीबुवांनी गायिलेला “हरीभजनावीण काळ घालवू नको रे” हा अभंग!

सिनेसंगीतात ह्या रागावर आधारित बरीच गाणी आढळतात. स्वर्ण सुंदरी मधील अजरामर गीत “कुहू कुहू बोले कोयलीया” यांत दुसरे अनेक राग असले तरी मुखडा सोहोनीचाच आहे. “जीवन ज्योत जले” हे आशा भोसले यांनी गायीलेले गाणे जुने असले तरी परिचित आहे. मुगले आझम

मधील “प्रेम जोगन बन” हे गीत सोहोनीलच! बडे गुलामअली खाॅं यांची “प्रेमकी मार कट्यार” ही ठुमरी काळजाचा ठाव घेणारी~ संगीतकार भास्कर चंदावरकरांनी सामना या सिनेमांत “सख्या रे घायाळ मी हरिणी” हे सोहोनीच्या स्वरांतच निबद्ध केलेले आहे.

सोहोनीबहार,सोहोनीपंचम, कुमार गंधर्वांचा सोहोनी~भटियार असे काही सोहोनीबरोबर केलेले जोड रागही रसिक वर्गांत मान्यता पावलेले आहेत.

चिरस्मरणीय असा हा सोहोनी भावदर्शी आणि चित्रदर्शी आहे.

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments