सुश्री आसावरी केळकर-वाईकर

 ☆ सूर संगत ☆ सूरसंगत (भाग-१९) – ‘तालवाद्ये’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

‘गीतम्‌ वाद्यम्‌ नृत्यम्‌ च त्रयम्‌ संगीतमुच्यते’ अशी संगीताची व्याख्या आपल्या प्राचीन संगीतज्ञांनी केली आहे. गेल्या काही लेखांमधे आपण मुळात संगीत कसे अस्तित्वात आले असावे आणि माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग कसे आणि का झाले असावे, ह्याविषयी विचार केला. परंतू त्यावेळी फक्त गीत किंवा गायन ह्या प्रकाराला अनुसरूनच लेखन झालं. आता वाद्यं का आणि कशी अस्तित्वात आली ह्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. असं म्हटलं जातं कि सृष्टीच्या कणाकणात लय आहे. त्यामुळे वाद्यप्रकारांमधे तालवाद्ये ही सर्वात आधी अस्तित्वात आली. असं मानलं जातं कि, भगवान शंकरांकडून ‘डमरू’ ह्या पहिल्या तालवाद्याची निर्मिती झाली. दुसरी एक अशी कथा वाचायला मिळते कि, स्वाती नावाच्या एक ऋषींनी एकदा पावसाचे मोठाले थेंब कमळाच्या पानांवर पडताना त्याचा आवाज ऐकला. एका लयीत कानांवर पडत राहिलेला तो सुंदर आवाज ऐकून त्यांच्या मनात ‘अशी सातत्यानं लय राखण्यासाठी तालवाद्यं हवीत’ ही कल्पना आली. म्हणजे शेवटी निसर्गाच्या प्रेरणेतूनच ही कल्पना जन्मली.

जुन्या ग्रंथांमधे असा उल्लेख आढळतो कि भरतमुनींच्या काळात शंभरभर तरी तालवाद्यं अस्तित्वात होती. ‘ताल’ ही संकल्पना नंतरची! मात्र कोणत्याही गोष्टीला अंगभूत ‘लय’ असते आणि ती साधली गेली तरच ती गोष्ट जास्त प्रभावी ठरते हे निश्चित! ह्यावरून असं म्हणता येईल कि, गायन, नृत्य कलेतील अंगभूत लयसौंदर्य आणखी खुललून ते जास्त प्रभावी करण्याच्या प्रयत्नातून तालवाद्ये अस्तित्वात आली. गायनाला, नृत्याला अर्थपूर्ण जोड/साथ देण्यासाठी तालवादन अस्तित्वात आले आणि प्रगतशील मानवाच्या प्रयत्नांतून पुढे तर तालवाद्ये आणि तालसंकल्पना इतकी विकसीत झाली कि त्यांचंच ‘एकलवादन’ (सोलो) शक्य होऊ लागलं ज्यावेळी लयसौंदर्याचं प्रामुख्य आणि सूर फक्त साथ देण्यापुरते मर्यादित असतात.

तालाचा विचार करताना एका आवर्तनामधे ठराविक अंतराने ठराविक मात्रा राखणं हा महत्वाचा भाग येतो. मात्र अगदी सहजी गुणगुणतानाही लय साधली गेली तरच त्यातून आनंद मिळतो. बोली भाषेचाच वापर करून माणसाच्याच जगण्यातील महत्वाच्या क्षणांचा उत्सव करणारे छोटेछोटे गीतप्रकार अस्तित्वात येत असतानाच शेवटपर्यंत त्यातली लय पकडून ठेवण्यासाठी मानवाकडून सहजस्फूर्तीने त्या लयीच्या हिशोबाने ठराविक अंतराने टाळी वाजवली गेली असेल, कधी हाताने मांडीवर आघात करून लय राखली गेली असेल, पायाने ठेका धरला गेला असेल. ह्या क्रिया आपल्या प्रत्येकाकडूनही अगदी सहजी घडत असतातच. एरवीही घरी आरतीच्या वेळी एका लयीत टाळ्या वाजवणे, कोणतेतरी गीत ऐकत असताना आपल्याही नकळत पायाने ठेका धरला जाणे, एखाद्या गायकाच्या जोशपूर्ण गायनाला साथ देताना श्रोत्यांनी उत्स्फूर्तपणे त्या गाण्याच्या लयीसोबत टाळ्या वाजवणे हे किती सहजी घडते! अशाप्रकारे लय साधताना मानवाने केलेला शारीरिक अवयवांचा उपयोग हा वाद्य कल्पनेचा प्रारंभकाल मानला जातो.

पूर्वीच्या जीवनमानाचा विचार केला तर लक्षात येईल कि स्वत:च्या शरीराच्या आधारे ठेका धरणे ह्याशिवाय भवताली उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा ह्या गोष्टीसाठी वापर करताना हुशार मानवाने दोन दगड एकमेकांवर आपटून, दोन लाकडाचे तुकडे एकमेकांवर आपटून पाहिले असतील. आजचे ‘टिपरी’ हे वाद्य म्हणजे दोन लाकडी काठ्यांचा एकमेकांवर आघात करणे हेच तर आहे! मात्र त्याचा उगम हा आदिमानवाच्या संगीतातील लय टिकवून ठेवण्याच्या गरजेतून झाला. आपल्याकडच्या चिपळ्या म्हणजेही एकसारख्या आकाराचे दोन लाकडी तुकडेच तर आहेत. पुढं धातूचा शोध लागला त्यानंतर चिपळीच्या तसेच करताल ह्यासारख्या वाद्याच्या लाकडी तुकड्यांमधे धातूच्या चकत्या बसवण्याचे प्रयोग झाले, टाळ, मंजिरी, झांज हे प्रकार अस्तित्वात आले. मात्र ह्या सगळ्याचं मूलतत्व एकच कि, दोन घन पदार्थांचा एकमेकांवर आघात केला तर नादनिर्मिती होते आणि त्याची लय पकडून ठेवण्यासाठी मदत होऊ शकते हा आपल्या जुन्या पिढ्यांनी लावलेला शोध!

आपल्या देवघरातील छोट्या घंटा किंवा देवळातल्या मोठ्या घंटा म्हणजेही एका घन पदार्थाच्या तुकड्याने दुसऱ्या घन पदार्थावर होणाऱ्या आघातातून केली जाणारी नादनिर्मिती! घुंगरूं हेसुद्धा एक प्रकारचं वाद्यच ज्यामधे धातूच्या पोकळ गोलाच्या आत असलेल्या एका धातूच्याच तुकड्याचा आघात झाला कि नादनिर्मिती होते. पायांत बांधल्यावर आपल्या पायाच्या हालचालींमुळं किंवा हातात घेऊन वाजवताना हाताने घुंगरू हालवल्यामुळं हा आघात आपोआप होतो.

प्राचीन काळी अन्न शिजवण्यासाठी मातीची भांडी वापरली जात असत. त्यावर बोटांनी आघात केला तरी सुंदर नाद निघतो हाही शोध त्यांना लागला. आज दक्षिणेतील घटम, कर्नाटक किनारपट्टींतल्या प्रांतातील घुमट, उत्तरेतील मटका ही वाद्यं हे त्याचंच उदाहरण!

प्राचीन काळी जंगलात राहाणाऱ्या मानवाचं मुख्य अन्न म्हणजे प्राण्यांची शिकार करून त्यांचं मांस शिजवून खाणं हे होतं. शिकार केलेल्या प्राण्याचा खाण्यालायक भाग म्हणजे त्याचं मांस! हळूहळू त्या प्राण्याचं कातडं, हाडं, शिंगं हा सगळा उर्वरित भागही कसा वापरता येईल ह्याचा विचार मानवाच्या मनात सुरू झाला असेल किंवा कधी तो आपसूक मानवाच्या समोर आला असेल. प्राण्यांचं कातडं बसायला वापरणं, त्याचा अंगरखा शिवून थंडीत आपल्या शरीराला ऊब मिळावी म्हणून वापरणं ही त्याची काही उदाहरणं! वाद्यांच्याबाबत विचार करता एका बाबीचा उल्लेख जुन्या पुस्तकांत आढळतो कि, शिकार केलेल्या प्राण्यांचं कातडं वाळण्यासाठी झाडाला टांगून ठेवलं असताना ते वाळल्यानंतर सहज त्यावर माणसाच्या हाताचा आघात झाला आणि त्यावेळी ‘वाळलेल्या कातड्यावर आघात केला असता नादनिर्मिती होते’ हा शोध लागला. हळूहळू पोकळ भांड्यावर हे चामडं बांधून त्यावर आघात केला तर आणखी सुंदर नादनिर्मिती होते (कारण पोकळ भाग हा त्या नादाचा ‘रेझोनेटर’ आणि ‘अम्प्लिफायर’ म्हणून काम करतो) हे लक्षात आलं आणि त्यातून चर्मवाद्यांची निर्मिती झाली.

ह्या चर्मवाद्यांना ‘अवनद्ध वाद्यं’ असं म्हटलं जातं. ‘अवनद्ध’ ह्या शब्दाचा अर्थच मुळी ‘कातड्याने मढवलेले’ असा होतो. आता डोळ्यांसमोर अशी अनंत वाद्यं उभी राहातील. लोकसंगीतात वापरली जाणारी अनेक तालवाद्यं ढोल, ताशा, हलगी, संबळ, टिमकी, नगारा इ. सगळीच ह्या प्रकारात येतात. ह्यापैकी काही वाद्यं हाताने आघात करून वाजवली जातात तर काही काठीने आघात करून! आज शास्त्रीय संगीतातील समाजमान्यता पावून सर्व रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी तबला, पखवाज, मृदंग इ. वाद्येही ह्याच प्रकारातली! ह्या सर्वच वाद्यांमधे सध्या जो भाग लाकडी असतो तो पूर्वी मातीचा असायचा. पुढं मग कालमानानुसार लाकूड, धातू इ. गोष्टी वापरून विविध प्रयोग होत राहिले. ह्याचा अर्थ एकच कि अगदी प्राचीन काळापासून माणसाने निसर्गाच्या सान्निध्यात वावरताना निसर्गाकडून विविध गोष्टी शिकत आपला विकास साधला. संगीतही त्याला अपवाद नाही. ह्याच प्रक्रियेमधे उपलब्ध साधनांच्या वापरातून वाद्यांची उत्पत्ती होत राहिली. तालवाद्यांप्रमाणे तंतुवाद्ये आणि सुषीर वाद्ये कशी अस्तित्वात आली ह्याची रंजक कहाणी आपण पुढच्या लेखात जाणून घेऊ!

क्रमश:….

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments