सुश्री अरूणा मुल्हेरकर
☆ सूर संगीत राग गायन (भाग ११) – राग~मधूवंती ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
सूरसंगतराग~मधूवंती
“रंजयती इति राग” असे संगीतांतील रागांविषयी म्हटले जाते. कोणताही राग घ्या, रसिकांचे मनोरंजन करणे हेच त्याचे काम!राग म्हणजे तरी नेमके काय? तर कमीत कमी पांच व अधिकाधिक सात शुद्ध/कोमल स्वरांची गुंफण!
मधूवंती हा त्यामानाने आधुनिक असा सुमधूर राग.
कुमार गंधर्व आणि वसंतराव देशपांडे यांचे फार जवळचे स्नेहसंबंध होते.वसंतराव कुमारांना गुरू मानत असत.काही कारणांमुळे दोघांत वाद होऊन थोडा दुरावा निर्माण झाला होता,त्यावेळी मनाच्या विमनस्क अवस्थेत वसंतरावांनी
“मैं आऊ तोरे मंदरवा
पैय्या परत देहो मनबसिया”
अशा अस्थाईच्या दोन ओळी लिहून पाठविल्या.त्यावर कुमारांनी ताबडतोब “अरे मेरो मढ्ढैया तोरा आहे रे।काहे धरो चरन मोरे मनबसिया।।” असा अंतरा लिहून पाठविला व बंदीश पूर्ण केली. तीच पुढे मधूवंतीतील बंदीश म्हणून प्रसिद्ध झाली.
“मी तुमचाच आहे, माझे घरही तुमचेच आहे, असे असतांना माझे चरण धरण्याची काय गरज? असा या ओळींचा अर्थ आहे. दोघांच्या मैत्रीतील सामंजस्य जसे यांत दिसून येते तसाच मधूवंती हा शूद्ध मैत्रीचा राग आहे. याच्या नावांतच मधू आहे, तेव्हा या रागांतील माधूर्याविषयी वेगळे सांगावयास नको.
तांत्रिक द्दृष्ट्या हा राग तोडी थाटांतून निर्माण झाला आहे, परंतु तोडीप्रमाणे रिषभ/धैवत कोमल नसून शुद्ध आहेत. ह्याचे चलन तोडीप्रमाणे असल्यामुळे या रागाचा जनक तोडी थाट असावा असे वाटते.
जाति~ओडव/संपूर्ण
वादीपंचम, संवादीषडज्, राग सादर करण्याची वेळ दिवसाचा तिसरा प्रहर. सहाजिकच मध्यम तीव्र आणि गंधार कोमल. वैचित्र्यासाठी कधीकधी अवरोही रचनेत कोमल निषाद वापरण्याची पद्धत आहे.
नि सा (ग)(म)प नि सां
सां नि ध प,(म)प (नि)ध प,(म)(ग)रे सा असे याचे आरोह नि अवरोह.(ग) (म) प नि सां नि ध प,(म) प (ग) (म)प (नी) ध प,(म)प (ग) (म)(ग) रे सा या स्वरसमूहावरून मधूवंतीची ओळख पटते.
सांझ भई,अजहूॅं नही आये प्रीतम प्यारे ही विलंबीत तीनतालमधील अश्विनी भिडे~देशपांडे यांची बंदीश प्रचलित आहे.बैरन बरखा रितू आई ही कुमारांची मध्यलय तीनतालमधील बंदीश वर्षाऋतूचे चित्र डोळ्यासमोर उभे करते.
असे म्हणतात की कोल्हापूरच्या पाध्येबुवांनी अंबिका असा राग तयार केला,पुढे विलायतखाॅंसाहेबांनी त्याचे मधूवंती असे गोजिरे नामकरण केले.
सुमन कल्याणपूर यांचे मधूवंतीच्या सुरासुरांतून आळविते मी नाम। एकदां दर्शन दे घनश्याम।।हे गीत रसिकजनांचे आवडते आहे. गीत रामायणांतील श्रीराम जेव्हा वनवासाला निघण्यापूर्वी सीतेचा निरोप घेण्यासाठी तिच्या महाली गेले तेव्हा काकूळतीने सीतेने हट्ट केला व ती म्हणाली, “निरोप कसला माझा घेता।जेथे राघव तेथे सीता।।” बाबूजींनी ही रचना मधूवंती या रागांतच निबद्ध केली आहे.
वरील गीतांतील शब्दांवरून मधूवंतीच्या स्वरांत विनवणी, नम्रता या भावना साकार होत असल्याचे आपणांस दिसून येते. बहरला पारिजात दारी, फुले कां पडती शेजारी हे माणिक वर्मांचे गाजलेले गीत मधूवंतीच्या सुरांवरच आधारलेले आहे. मनमंदीरमे आयो शाम, रस्मे उल्फतको निभाये, पायलिया बावरी ही काही सिनेगीते मधूवंतीचीच झलक दाखवितात.
क्रमशः ….
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈