सुश्री आसावरी केळकर-वाईकर

 ☆ सूर संगत ☆ सूरसंगत (भाग-२०) – ‘सुषीरवाद्ये’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

मागच्या लेखात एक उल्लेख अनावधानाने राहून गेला त्याविषयी…

तालवाद्यांपैकी ज्या वाद्यांमधे प्राण्यांचं कातडं वापरलेलं असतं त्यांना ‘अवनद्ध वाद्ये’ किंवा ‘चर्मवाद्ये’ असं म्हणतात, त्याचं कारण ‘अवनद्ध’ ह्या शब्दाचा अर्थच ‘कातड्याने मढवलेले’ हे आपण पाहिलं. मात्र तालवाद्यांपैकी इतर वाद्यं, ज्यामधे धातूचे, लाकडाचे दोन तुकडे किंवा चकत्या किंवा नळ्या/काठ्यांचा एकमेकांवर आघात झाल्याने नादनिर्मिती होते त्या वाद्यांना घनवाद्ये असं म्हणतात. दोन्ही प्रकारातली वाद्यं ही तालवाद्यंच आहेत आणि दोन्हींतही नादनिर्मिती ही आघातानेच होते… फरक आहे तो फक्त कातड्याचा वापर त्या वाद्यात झाला आहे कि नाही, इतकंच!

सुषीर वाद्यांकडं वळायचं म्हटलं कि पटकन आपल्या डोळ्यांसमोर उभा राहातो मनमोहन मुरलीधर कृष्ण… आपल्या मुरलीवादनानं अवघ्या जगताला संमोहित करणारा! त्याचं वाद्य म्हणजे ‘बासरी’ ज्यात फक्त एका आकारबद्ध पोकळीत फुंकर मारल्यानंतर निर्माण होणाऱ्या कंपनांतून नादनिर्मिती होते. सर्व सुषीर वाद्यांमधे हे एकच तत्व लागू आहे. मात्र मुळात ह्या तत्वाचा शोध कसा लागला असावा? ह्या तत्वानुसार माणसाकडून अंत:प्रेरणेनं घडणारी गोष्ट म्हणजे शीळ! कोणत्याही वाद्याचा आधार न घेता गोड, मधूर शीळ कशी घातली जाते? तर तिथं असतं ते फक्त एकच तत्व, फुंकरीतून म्हणजेच हवेच्या साहाय्यानं केली जाणारी नादनिर्मिती! शीळ घालत असताना आपसूक निर्माण होणाऱ्या आपल्या तोंडाच्या आणि ओठांच्या स्थितीचा विचार केला असता लक्षात येईल कि, ह्या प्रक्रियेत घशातून येणारा हवेचा झोत तोंडाची पोकळीतून मार्गस्थ होऊन ओठांच्या एका विशिष्ट आकारामुळे योग्यप्रकारे नियंत्रित होत असल्यानं नेटकी व सुंदर नादनिर्मिती होते.

जुन्या ग्रंथांमधे उल्लेख आढळतात कि, प्राचीन काळी ‘अन्न’ म्हणून प्राण्यांची शिकार केल्यावर त्यांचं मांस खाल्यानंतर उरलेले अवयव शिल्लक तसेच राहात असतील. कधीतरी गमतीतच कुणीतरी प्राण्यांच्या शिंगांमधे फुंकर मारून पाहिली असेल आणि असं केलं तर त्यातून छान आवाज येतो हे लक्षात आलं असेल. हळूहळू पुढं हेही लक्षात आलं असेल कि शिंगांचा आकार, लांबी बदलली कि आवाजाची जात बदलते. नंतर ह्या गोष्टीचा उपयोग माणूस एखाद्या कारणासाठी सगळ्यांना एकत्र जमवण्यासाठी किंवा एकमेकांना काही संकेत देण्यासाठी करू लागला.

सर्वांना माहीत असणारी ह्याबाबतीतली काही उदाहरणं म्हणजे… ‘रणशिंग’ हे युद्ध सुरू होत असल्याचा संकेत देणारं वाद्य!… काही मंगल प्रसंगाच्या सुरुवातीला वाजवलं जाणारं व सैन्यसंचालन, मिरवणुकी ह्यातही आढळून येणारं अर्धचंद्राकृती ‘शृंग’ हे वाद्य, शिवाय ‘तुतारी’ हे वाद्यही बऱ्याच जणांना माहिती असेल. ह्या वाद्यांना मंगलवाद्यं मानलं जातं. कारण ही वाद्यं म्हणजे प्राण्यांची शिंगं, म्हणजे नैसर्गिकरीत्या अस्तित्वात आलेली!… पुढं मग इतर वाद्यांप्रमाणं वेगवेगळे प्रयोग ह्यात झाले. आज धातूचीही ह्या प्रकारची वाद्यं आपल्याला पहायला मिळतात, काही थोडा भाग धातूचा आणि उर्वरित भाग लाकडाचा अशीही असतात, मात्र त्यांचं मूळ हे प्राण्यांचं शिंग आहे.

ह्याच बरोबर बांबूसारख्या पोकळ नळकांडीत फुंकर मारून बघितली असतानाही आवाज येतोय हेही लक्षात आलं आणि त्यातून हळूहळू पावा, अलगूज, वेणू, बासरी ह्यांनी जन्म घेतला. झाडाच्या पातळ पानाची गुंडाळी (ज्याला बहुधा आपण पुंगळी म्हणायचो) करून त्यात फुंकल्यावरही सुंदर आवाज येतो हे आपण सर्वांनीच लहानपणी करून पाहिलं असेल. ही पिपाणीची शिशुअवस्था म्हणता येईल.

त्याचबरोबर झाडांची पानं एकावर एक ठेवून ती ओठांत धरून त्यात फुंकर मारून आवाज काढण्याचा उद्योगही आपण सर्वांनीच केला आहे. दोन पानांच्यामधे आपसूक तयार होणाऱ्या हवेच्या छोट्याशा पोकळीत फुंकर मारली गेल्यानंच त्यातून आवाज निघत असतो. आज ज्या वाद्यांमधे ‘रीड’ ही संकल्पना वापरलेली दिसून येते तिचा जन्म ह्या प्रकारातूनच झाला असावा.

अशाप्रकारे नादनिर्मिती होऊ शकते हे एकदा लक्षात आल्यावर ‘शंख’ हेही एक नैसर्गिक वाद्य माणसाला सापडलं. प्राचीन काळापासून हे वाद्य पवित्र मानलं गेलं आहे त्याचं कारणच कदाचित ‘परमशक्तीकडून झालेली ह्या वाद्याची निर्मिती’ हे असावं! नैसर्गिक शक्तीनं तयार स्वरूपातच आपल्याला बहाल केलेलं हे वाद्य वाजवताना मानवाला फक्त त्यात फुंकर मारण्याशिवाय काहीच करायचं नसतं आणि ‘परमोच्च शक्तीनं’ तयार केलेलं वाद्य म्हणजे त्यात काहीतरी शक्ती असणंही अपरिहार्यच! म्हणूनच जिथं शंख फुंकला जातो त्या जागेतील सर्व नकारात्मक शक्ती नाश पावून तिथलं वातावरण शुद्ध होतं असं आपल्याकडं विश्वासानं मानलं जातं. घराघरांतून पूजाविधीच्या वेळी शंखपूजन आणि शंख फुंकण्याचं कारणही हेच असावं.

गारुड्याची पुंगी म्हणजेही सुषीर वाद्यच! छोट्या आकाराच्या भोपळ्याच्या खालच्या भागात एकसारख्या लांबीच्या बांबूच्या दोन नळ्या प्रत्येकी एकेरी जिव्हाळीसहीत (रीड) मेणाने घट्ट बसवलेल्या असतात. त्यातल्या एका नळीला छिद्रं असतात व दुसरी नळी एकच आधारस्वर निर्माण करत राहाते. वरती भोपळ्याच्याच निमुळत्या भागातून फुंकर मारली कि नादनिर्मिती होते.

ह्या प्रकारच्या वाद्यांपैकी शास्त्रीय संगीतनिर्मिती करू शकण्याइतपत विकसित, प्रगत अवस्थेला पोहोचलेली वाद्यं म्हणजे बासरी, शहनाई, सुंद्री आणि दक्षिण प्रांतातील नादस्वरम्‌ ! ह्या प्रकरातील वाद्यं वाजवण्याच्या दोन पद्धती आहेत. काही वाद्यांचं निमुळतं टोक ओठांत धरून मग त्यात फुंकर मारली जाते, उदा. शहनाई, सुंद्री, पुंगी, पावा इ. आणि काही वाद्यांमधे बाहेरून फुंकर घालून नादनिर्मिती केली जाते. उदा. बासरी, शंख इ.!

क्रमश:….

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments