सुश्री आसावरी केळकर-वाईकर
☆ सूर संगत ☆ सूरसंगत (भाग – २१) – ‘तंतुवाद्ये’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆
वाद्यांचा आणखी एक महत्वाचा प्रकार म्हणजे तंतुवाद्यं! तत्म्हणजे तार, ह्यावरून आपल्या लक्षात येईल कि ज्या वाद्यामधे तार/तारा वापरल्या गेलेल्या असतात त्याला तंतुवाद्य किंवा तत्वाद्य असं म्हणतात. ह्या वाद्यांच्या शोधाची कहाणी खूपच रंजक आहे. प्राचीन काळी निसर्गाच्या सान्निध्यात राहात असताना जंगली श्वापदांपासून स्वत:चं संरक्षण करण्यासाठी आणि नंतर शत्रूंपासूनही स्वसंरक्षण करण्यासाठी मानवप्राणी ‘धनुष्य-बाण’ हे शस्त्र वापरत असे हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. बाण सोडताना धनुष्याची प्रत्यंचा खेचावी लागते तीही किती अंतरावर बाण गेला पाहिजे हा अंदाज घेऊन! एकदा बाण सोडला कि ही खेचलेली प्रत्यंचा त्याच्या पूर्वस्थितीत येईतोवर कंप पावते आणि त्या कंपनांमुळं त्या प्रत्यंचेतून नादनिर्मिती होते.
तंतू कंपन पावल्यावर त्यातून नादनिर्मिती होते हे ह्यातून बुद्धिमान मानवप्राण्यानं हेरलं. त्यापूर्वी पोकळ वस्तूवर चामडं ताणून बांधलं तर आवाजाची गुणवत्ता आणि पातळी वाढते हे ज्ञान तालवाद्यांच्या निर्मितीप्रक्रियेतून त्याला मिळालेलंच होतं. मग ह्या दोन्ही गोष्टींचा एकत्रित विचार करून त्यानं लाकूड धनुष्याकारात कोरून त्यावर चामडं घट्ट बांधलं आणि त्याला तारही जोडली. अशाप्रकारे ‘वीणा’ जन्माला आली.
असं म्हणतात कि अगदी पूर्वी वीणा ही एकच तार असलेली होती जिच्या दांडीच्या वरच्या व खालच्या बाजूच्या भागात प्रत्येकी एकेक भोपळा होता. हिला ‘घोषा’ किंवा ‘घोषिका’ असं म्हटलं जातं. हिचा उल्लेख भरतमुनींच्या ‘नाट्यशास्त्र’ ह्या संगीताच्या आद्यग्रंथात आढळतो. पुढं संगीत रत्नाकर ग्रंथात उल्लेखिली गेलेली ‘एकतंत्री वीणा ’ही एक तार असलेलीच होती! तिलाच ‘मूलवीणा’ किंवा ‘ब्रम्हवीणा’ असंही म्हटलं जातं. ही सर्व वीणांची जननी मानली गेली आहे आणि ह्या वीणेचं दर्शन किंआ स्पर्श मोक्ष देणारा असतो असंही मानलं गेलं आहे. ह्यातून एक गोष्ट नक्कीच दिसून येते कि, मानवानं त्याच्या आयुष्यात संगीताला दिलेलं भक्तीचं, अतीव श्रद्धेचं, आदराचं स्थान! आज आपल्याकडं भजनसंप्रदायात आवर्जून वापरली जाणारी एकतारी डोळ्यांपुढं आणली कि थोड्याफार फरकानं पूर्वीची एक तार असलेली वीणा कशी असेल ह्याची कल्पना येऊ शकते.
असं म्हणतात कि, एकतारीवर गाणं सर्वात कठीण असतं आणि जो एकतारीवर रियाज करतो तो नेमकेपणी अगदी सुरेल गाऊ शकतो. त्याचं कारण म्हणजे, एकाच तारेमुळं तिच्यातून गाणाऱ्याला फक्त आधारस्वर मिळत असतो आणि त्या एकाच सुराच्या आधारे इतर सगळे सूर लावणं हे कठीण काम! आणि हे कठीण काम जमतं तेव्हां गायकाचा सूर साधला जातोच कारण इतर सुरांचा त्या आधारस्वराशी तेव्हांच मेळ बसतो जेव्हां ते अगदी नेमकेपणी लागतात. म्हणूनच आजही असे एकतारीवर गाणारे कित्येक गायक (भले त्यांनी शास्त्रोक्त संगीताचं शिक्षण घेतलेलं असो किंवा नसो) सुराला एकदम पक्के असतात, त्यांचा गाणं ऐकलं कि केवळ प्रचंड सुरेलपणाच्या किमयेनं आपण वेगळ्याच विश्वात पोहोचतो, इतर कसलाही दिखावा, तंत्रज्ञानाची साथ, बाकी कोणतेही साथीदार नसतानाही! ह्या वीणेला मोक्षदायिनी म्हणण्याचं कारण ह्यातच दडलं असावं.
पुढं हळूहळू वेगवेगळे प्रयोग होत तारांच्या वेगवेगळ्या संख्या व रचनेतील इतरही काही बदलांनुसार अनेक वीणा अस्तित्वात आल्या. आलापिनी वीणा, धनुकलीने वाजवली जाणारी धनुष्याकृती ‘पिनाकी वीणा’ (आधुनिक व्हायोलीनचं प्राथमिक स्वरूप), एकवीस तारांची मत्तकोकिला वीणा, सात तारांची चित्रवीणा, नऊ तारांची विपंची, सारिकायुक्त अशी किन्नरी वीणा, तीन तारा असणारी त्रितंत्री वीणा(जिला सतारीचं प्राथमिक रूप मानलं जातं), भरपूर म्हणजे शंभर तारा असलेली ‘शततंत्री’ वीणा, कात्यायनी वीणा अशा वेगवेगळ्या रचना व तारसंख्या असलेल्या अनेक वीणांचा उल्लेख आपल्या जुन्या ग्रंथांमधे आढळतो. वेदिक काळात ‘वनस्पती’, ‘बाण’, ‘औडंबरी’, ‘क्षोणी’ इ. वीणा अस्तित्वात असल्याचाही उल्लेख आढळतो. राजा समुद्रगुप्त जी वीणा वाजवायचा ती सात तारांची ‘परिवादिनी’ नामक वीणा सुवर्णमुद्रांनी मढवलेली होती असाही उल्लेख आढळतो.
सतार ह्या तंतुवाद्याबद्दल एक महत्वाचा उल्लेख आढळतो कि, ख्यालगायनाला लोकप्रियता मिळवून देण्यात यशस्वी ठरलेल्या महम्मद शाह रंगीलेंच्या दरबारातील सदारंग-अदारंग- महारंग ह्या त्रिमूर्तींपैकी सदारंग म्हणजे ‘नियॉंमत खॉं’साहेबांचा धाकटा भाऊ ‘आमीर खॉं’ हा तीन तारा असलेल्या एका पर्शियन वाद्यावर भारतीय शास्त्रीय संगीतातील राग वाजवून पाहात असे, ते सतारीचं प्रारंभिक रूप! त्याने आणि पुढं इतरांनीही त्या वाद्यावर वेगवेगळे प्रयोग केले आणि आजची पूर्ण विकसित सतार जन्माला आली. नावाच्या साम्यामुळं ‘आमीर खुस्रो’ ह्यांना सतारनिर्मितीचं श्रेय दिलं जातं मात्र त्यात तथ्य नाही, कारण कागदोपत्री पंधराव्या शतकापर्यंत कुठंही ह्या वाद्याचा उल्लेख आढळत नाही.
तंतुवाद्यांमधे ते वाद्य वाजवण्याच्या पद्धतीवरून तत आणि वितत असे दोन प्रकार आढळतात. तत वाद्यं म्हणजे ज्या वाद्यांच्या तारा बोटांनी, नखांनी किंवा ‘नख्खी/मेजराब’ अशा गोष्टींनी वाजवल्या जातात. उदा. तानपुरा, एकतारी, तुणतुणं, सतार, वीणा, स्वरमंडल, सरोद, संतूर इ.
वितत वाद्यं म्हणजे जी वाद्यं बो किंवा गजाच्या सहाय्याने वाजवली जातात. उदा. इसराज, सारंगी, दिलरुबा, व्हायोलीन, आपल्या राजस्थानमधे आढळणारं ‘रावणहाथा’ हे वाद्य इ.
ह्या सर्व वाद्यांच्या रचनांमधे पोकळ भाग (ध्वनिवर्धक व अनुनाद निर्मिती करणारा) म्हणून वाळवून आतून पोकळ केलेले विविध आकारांचे, प्रकारचे भोपळे, नारळाची करवंटी इ. गोष्टींचा वापर होतो. व्हायोलीनमधे असे काही वापरले गेले नसले तरी साऊंडबॉक्स म्हणून लाकडाचाच ‘पोकळ भाग’ तयार केलेला असतो.
निसर्गाकडूनच मिळालेल्या जादूई तत्वांचा वापर करून मानवानं आपल्या बुद्धीकौशल्यानं, अभ्यासूवृत्तीनं आणि नैसर्गिकरीत्या लाभलेल्या शक्तींच्या आधारे कायकाय किमया घडवून आणली हे जाणून घेताना एकीकडं अभिमानानं ऊर भरून येतो आणि त्याचक्षणी निसर्गाच्या महान, अद्भुत शक्तींपुढं नतमस्तकही व्हायला होतं.
क्रमश:….
© आसावरी केळकर-वाईकर
प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत (KM College of Music & Technology, Chennai)
मो 09003290324
ईमेल – [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈