सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगीत राग गायन (भाग १२) – राग~वसंत ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

सूरसंगतराग~वसंत

ऋतुचक्रांतील वसंत ऋतूचे आगमन झाले की शिशीरांत निष्पर्ण झालेल्या सृष्टीत नवचैतन्य येते. वृक्ष वल्लरींना नवी पालवी फुटून सर्वत्र निसर्ग बहरास येतो. संगीतांतील वसंत रागाचे ह्या ऋतूशी फार जवळचे नाते आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. वसंताचे अवरोही स्वर कानावर पडले की उत्साहाचे वातावरण निर्माण झालेच पाहीजे.असा हा राग वसंत!

ह्या रागासंबंधी फार मनोरंजक अशी आख्यायिका आहे. असे म्हणतात की बूढन मिश्र नावाच्या एका गायकाने पटमंजीरी हा राग गायला आणि त्याच्या प्रभावाने एक प्रचंड वृक्ष निष्पर्ण झाला. हा चमत्कार पाहून सर्व मंडळी आश्चर्यचकित झाली.  तत्कालीन राजाने त्याच्या या गायनकौशल्यावर खूष होऊन त्याला बक्षीशीही दिली,परंतु त्याचवेळी जयदेव या गायकाला ही बातमी समजल्यावर त्याने वसंत राग आळवून पर्णविरहीत वृक्षावर पुन्हा नवीन पालवी नार्माण केली. वसंत ऋतूतील नवी पालवी आणि हा राग याचे असे हे अतूट नाते आहे. गीत गोविंद या जयदेवाच्या अमर ग्रंथातील”ललित लवंगलता परिशीलन कोमल मलय समीरे” ही अष्टपदी म्हणजे वसंत ऋतूचे सुंदर वर्णन आहे, ती वसंत रागांत गायली तर अधिक मनभावन ठरते.

हा आल्हाददायक राग वसंत ऋतूत केव्हाही गावा, मात्र इतर वेळी तो मुख्यत्वेकरून रात्रीच्या अंतीम प्रहरी गाण्याची/वाजविण्याची प्रथा आहे.

चैत्र~ वैशाख हा वसंत ऋतूचा काळ असला तरी माघातल्या वसंत पंचमीपासून फाल्गुनी पौर्णिमेपर्यंत वसंतोत्सव साजरा केला जातो. या वसंतोत्सवाला फाग म्हणतात. त्यामुळे राधा~कृष्णाच्या रासक्रीडा नृत्य ~संगीतांतून सांगातली जाते.अब्दूलकरीमखाॅं साहेबांची “फगवा ब्रीज खेलनको चलोरी” ही वसंतातली बंदीश आजही पेश केली जाते.’नबी के दरबार’ हा वसंतांतील बडा ख्याल गंगूबाई हनगल, माणिक वर्मा यांच्याकडून रेडिओवर बर्‍याचदां ऐकल्याचे स्मरते.

वसंतच्या शास्त्रीय स्वरूपाबाबत प्राचीन काळापासून बरेच मतभेद आहेत. असे म्हणतात की गंधार व निषाद कोमल असलेला काफी थाटात गायला जात असे. कवी जयदेवाच्या गीतगौविंदमध्ये हा राग असा आहे. जग्गनाथपूरीच्या मंदीरांतही अजूनही काफी थाटातला वसंत गायला जातो. मात्र सध्या प्रचलित असलेला वसंत  पूर्वी थाटांतील आहे. यांतही दोन प्रकार आहेत. एका प्रकारात दोन मध्यम व शुद्ध धैवत घेऊन पंचम वर्ज्य केला जातो तर दुसरा प्रकार संपूर्ण मानला जातो. कितीही वाद असले तरी दोन्ही मध्यमांचा प्रयोग करणारा ललित अंगाचा वसंतच आज अधिक प्रचलित आहे.

वादी व संवादी स्वर अनुक्रमे तार षड्ज व पंचम असे आहेत, शुद्ध धैवताच्या प्रकारांत पंचम वर्ज्य असल्यामुळे शुद्ध मध्यम संवादी मानतात.

या रागाचे वैशिष्ट्य असे की षड्जापर्यंत अवरोह झाल्यावर लगेच शुद्ध मध्यम मुक्तपणे व स्वतंत्र घेतला जातो व नंतर मींडेच्या सहाय्याने ‘नी (ध)(म)(ध) नी सां’ असा आरोह केला जातो.राग ओळखण्याचे हे व्यवच्छेदक लक्षण आहे. उत्तरांगप्रधान असलेला हा राग स्वरसप्तकाच्या उत्तरांगांत अधिक खुलतो.

ह्या वसंत किंवा बसंत रागाबरोबर बसंतबहार, बसंतहिंडोल, बसंती~केदार असे बरेच जोड राग आहेत. कुमार गंधर्वांनी गौरी बसंत तर रातंजनकरबुवांनी बसंत मुखारी हे राग लोकप्रिय करून ठेवले आहेत.

“केतकी गुलाब जूही मन बसंत फूले” ही बसंत बहारची बंदीश प्रसिद्ध आहे. मंदारमाला नाटकांतील पं.राम मराठे आणि प्रसाद सावकार यांची “बसंतकी बहार आयी” ही जुगलबंदी न ऐकलेला श्रोता विरळाच! सर्व सामान्यांसाठी बसंतचे उदाहरण घ्यायचे झाले तर देवदास चित्रपटांतील माधुरी दिक्षित(चंद्रमुखी)हिचे “काहे छेड छेड मोहे गरवा लगाये हे वसंत रागांतील गाण्यावरील नृत्य.

वसंत ऋतूचे स्वागत करणारा आणि कलावंतांच्या विशेष पसंतीचा आणि अतिशय प्राचीन असा हा राग वसंत/बसंत!

क्रमशः ….

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments