सुश्री आसावरी केळकर-वाईकर
☆ सूर संगत ☆ सूरसंगत (भाग – २२) – ‘सुरसकथा’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆
वाद्यवर्गीकरणपद्धतीनुसार वाद्यांचे विभाजन कोणत्या प्रकारांमधे होते हे आपण गेल्या दोन-तीन भागांत पाहिले. वाद्यांच्या बाबतीत आणखी थोडा मागोवा घेत गेलो तर जुन्या ग्रंथकारांच्या कृपेने काही मनोरंजक गोष्टी हाती लागतात. भगवान शंकरांचा डमरू हे सर्वात प्राचीन वाद्य मानलं गेलं आहे. त्रिपुरासुराचा वध केल्यानंतर शंभू महादेव नृत्य करू लागले. त्याला तालसंगत करण्यासाठी ब्रम्हदेवाने एका अवनद्ध वाद्याची निर्मिती केली. त्याचा वाजवायचा भाग अर्थातच कातड्यानं मढवलेला होता. मात्र ढाचा मातीचा होता म्हणून त्या वाद्याला मृद्+अंग म्हणजे मृदंग म्हटलं गेलं. शिवपुत्र श्रीगणेशांनी हे वाद्य त्यावेळी वाजवलं. मृदंगाच्या उत्पत्तीची अशीआख्यायिका आहे. आणखी एका कथेनुसार वृत्तासुराला मारल्यानंतर आनंदित झालेले भगवान शंकर तांडवनृत्य करू लागले. त्यांच्या नृत्याला तालसंगत करण्यासाठी गणपतीने जमिनीत एक खड्डा खणला, त्यावर मृत वृत्तासुराचं कातडं पांघरलं आणि त्यावर तो ताल वाजवू लागला.
भगवान शंकरांच्याच बाबतीत आणखी एक कथा आढळून येते. ते कैलास पर्वतावर तप करत असताना मुरजासुर नावाच्या राक्षसाने त्यांना त्रास देऊन त्यांचा तपोभंग केला. त्यामुळं क्रोधित झालेल्या शंकरांचं त्याच्याशी तुंबळ युद्ध होऊन त्यात मुरजासुर मारला गेला. हात-पाय-मुंडकं तुटलेल्या अवस्थेतलं त्याचं शव तिथून गिधाडांनी उचलून नेलं. त्यांनी ते पंजांत धरून त्यातलं मांस बऱ्यापैकी खाल्लं. मात्र जास्ती वजनामुळं ते शरीर त्यांच्या पंजातून सुटून खाली एका झाडावर पडलं. काही काळानंतर ते शरीर पूर्ण वाळून त्याचा फक्त वाळक्या ताठरलेल्या कातड्याचा पोकळ सांगाडा झाडावर शिल्लक राहिला.
एके दिवशी जोरात वारं सुटल्यामुळं झाड्याच्या फांद्या त्या कातड्यावर आपटून सुंदर नाद निर्माण होऊ लागला. वनभ्रमण करत असलेल्या शंकरांनी तो सुंदर नाद ऐकला आणि उत्सुकतेपोटी त्या आवाजाच्या दिशेने येत त्या झाडाजवळ पोहोचले. ते कातडं पाहून त्यांना घडलेली सगळी घटना आठवली. त्यांनी त्या कातडी ढाचाच्या एका बाजूला डाव्या हातानं आघात केल्यावर ‘ता’ हा बोल उत्पन्न झाला आणि दुसऱ्या बाजूला उजव्या हाताच्या आघाताने ‘घी’ हा बोल उत्पन्न झाला. त्यापुढंही ते दोन्ही हातांनी त्यावर आघात करत राहिले तसे वेगवेगळे बोल उत्पन्न झाले. थोड्यावेळानं शंकर तिथून निघून गेले.
त्यानंतर एकदा ते पार्वतीसोबत पर्णकुटीत बसले असताना पावसाचे थेंब कुटीच्या वाळलेल्या पानांवर पडू लागले तसा सुंदर नाद उत्पन्न झाला. तो नाद पार्वतीला खूपच आवडल्यानं तिनं शंकरांना विनंती केली कि त्यांनी अशा प्रकारचं काही वाद्य तयार करावं ज्यातून अशा सुंदर नादांची निर्मिती होईल. तेव्हां त्यांनी तिला मुरजासुराची कथा सांगितली आणि त्यातून उत्पन्न होणऱ्या विविध वर्णांचं विस्तृत वर्णन केलं. पुढं असं जे अवनद्ध वाद्य अस्तित्वात आलं त्याला ‘मुरज’ हे नाव मिळालं. मात्र दुसऱ्या एका ग्रंथातील वर्णनानुसार ‘मर्दल’ नावाच्या वाद्याची निर्मिती ही ‘मुरज’ नावाच्या राक्षसाच्या मृत शरीरातून झाली आणि ती श्रीकृष्णांनी केली.
अवनद्ध वाद्यांची माहिती घेताना सरोवरातील कमळाच्या पानांवर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांमुळे निर्माण होणारा कर्णप्रिय नाद ऐकून स्वाती नामक ऋषींना तालवाद्यनिर्मितीची प्रेरणा मिळाली हे आपण पाहिलं. त्यापुढची कथा म्हणजे तो सुंदर नाद त्यांनी आपल्या मनात अगदी साठवून घेतला आणि मग ते आपल्या आश्रमात परतले. तिथं त्यांनी विश्वकर्म्याला हा वृत्तांत सांगून त्या सुंदर नादाचं वर्णनही केलं आणि त्याला असा नाद निर्माण करणारं वाद्य तयार करायला सांगितलं. त्यांनी सांगितलेल्या नादांचं वर्णन मनात ठेवून तसे नाद निर्माण होतील असं मातीचा ढाचा असलेलं जे वाद्य विश्वकर्मानं तयार केलं ते ‘पुष्कर’ ह्या नावानं ओळखलं गेलं. कालमानानुसार ह्याच वाद्याच्या आधाराने लाकूड, धातू इ.. गोष्टींचा वापर करत प्रयोग होत राहिले आणि त्यातूनच मृदंग, पटह, दर्दुर अशा वाद्यांची निर्मिती झाली.
रामायणकाळात आजच्या रागसंगीतासारख्या शैलीला गंधर्वगान म्हटलं जायचं. प्रभू श्रीरामचंद्र स्वत: गंधर्वगानप्रवीण होते आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र लव-कुशही संगीतज्ञ असल्याचा उल्लेख आढळतो. रावणही मोठा संगीतज्ञ होता. त्यानं निर्माण केलेल्या रावणास्त्र किंवा रावणहस्त ह्या तंतुवाद्याचा उल्लेख प्राचीन वाद्यांमधे आढळून येतो. लंका आणि भारताच्या काही भागात आजही हे वाद्य कालानुसार होत गेलेल्या परिवर्तित स्वरूपात उपलब्ध आहे. वीणेच्या प्रकारांमधेही ‘रावणी’ नावाच्या वीणेचा उल्लेख आढळतो. आपल्याकडील राजस्थान प्रांतातलं रावणहाथा हे वाद्य ह्याच ‘रावणहस्त’चं परिवर्तित रुपडं असावं जे पुढं आजच्या सुप्रसिद्ध व्हायोलिन ह्या वाद्याचा आधार मानलं जातं.
भगवान श्रीकृष्णांच्या केवळ मानवालाच नाही तर निसर्गातील प्रत्येक पशु-पक्षी, वृक्षवेलींना किंबहुना अवघ्या विश्वालाच संमोहित करणाऱ्या जादुई बासरीवादनाविषयी तर आपल्याला कितीतरी सुरस कथा वाचायला मिळतात. श्रीकृष्ण हे महान संगीतज्ञ होते आणि त्यांच्यासारखा श्रेष्ठ बासरीवादक पुन्हा कधीच पृथ्वीवर अवतरला नाही. महाभारतात उल्लेखिलेले श्रीकृष्णाचा ‘पांचजन्य’नामक शंख आणि अर्जुनाचा ‘देवदत्त’नामक शंख हे मुख्यत्वे युद्धाच्यावेळी काही संकेत देण्यासाठी वापरले गेले तेही एक प्रकारचं सुषीर वाद्यच! जसे श्रीकृष्ण सर्वोत्तम बासरीवादक तसाच अर्जुन हा सर्वोत्कृष्ट वीणावादक असल्याचं मानलं जातं. अर्जुनही उत्तम संगीतज्ञ होता. पांडवांच्या अज्ञातवासाच्या काळात अर्जुनानं बृहन्नडा नावानं स्त्रीरूप धारण करून विराट राजाची कन्या उत्तरा हिला संगीतशिक्षण देण्याचं काम पत्करलं होतं. अर्जुनाचं वीणावादनही समोरच्याला भान विसरायला लावायचं आणि ह्या कालखंडातील संगीताच्या विकासाचं मोठं श्रेय अर्जुनाकडं जातं, असं मानलं गेलं आहे.
बनारस घराण्याचे शहनाईवादक शहनाईची उत्पत्ती श्रीमहादेवांच्याच शृंग किंवा सींग ह्या सुषीर वाद्यातून झाली असं मानतात. ह्या वाद्याचं वादन पहिल्यांदा शिव-पार्वतीमीलनाच्या शुभसमयी झाल्याचंही मानलं जातं. विवाहादि शुभकार्यप्रसंगी शहनाईवादनाची प्रथा आजतागायत आपल्याला पाहायला मिळते. त्या पद्धतीचं मूळ दर्शविणारी ही कथा जुन्या ग्रंथांमधे आढळून येते.
क्रमश:….
© आसावरी केळकर-वाईकर
प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत (KM College of Music & Technology, Chennai)
मो 09003290324
ईमेल – [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈