सुश्री अरूणा मुल्हेरकर
☆ सूर संगीत राग गायन (भाग १३ ) – राग~ संपन्न भैरव कूळ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
सूर संगत~संपन्न भैरव कूळ
प्राचीन काळी संगीतांतील उत्पत्ती देव देवतांपासून झाल्याचे मानले गेले. पंचमहाभुतांना देवता मानून त्यांची स्तुती आणि प्रार्थना मुख्यतः संगीताद्वारे केली जात असे. अशा संगीतात काही रागस्वरूपे देव देवतांच्या नावानेच अस्तित्वात आली.पुढे त्या त्या रागांना देव~देवतांची वर्णने लावण्यांत आली. अशा प्रकारच्या रागांमध्ये भैरव हा प्रमूख आहे. भैरव म्हणजेच शिव शंकर, शंभू महादेव!
हा भैरव थाटजन्य राग. रिषभ व धैवत कोमल. वादी~संवादी अनुक्रमे धैवत व रिषभ.सात स्वरांचा संपूर्ण जातीचा हा राग प्रातःकाळी गायला जातो. “जागो मोहन प्यारे” ह्या गाण्याच्या ओळी कानांवर पडल्या की भैरव रागाचे दर्शन घडते. यशोदा मैय्या तिच्या नंदलालाला प्रातःकाळी उठविते, “उठी उठी नंदकिशोरे”, “प्रातसमय भई भानूदय भयो, ग्वाल बाल सब भूपति थाडे” अशा वर्णनाच्या बंदीशी ह्या भैरव रागांत ऐकायला मिळतात. पहाटेच्या वेळी चित्त प्रसन्न होते.
सा (रे) ग म प (ध) नी सां
सां नी (ध)प म ग (रे) सा असे ह्याचे सरळ आरोह अवरोह असले तरी सादर करतांना वक्र स्वरूपांत आढळतो, जसे रिषभाला मध्यमाचा स्पर्ष”ग म(रे) सा, धैवताला ग म नी(ध), नी(ध)प असा निषादाचा स्पर्ष हे भैरवाचे खास वैशिष्ठ्य आहे. गायन/वादन रंजक करण्यासाठी पूर्वांगांत सा ग म प ग म(रे)सा, आणि उत्तरांगांत ग म नी(ध)सां अशी वक्र स्वररचना करतात. शांत रस हा या रागाचा आत्मा म्हणता येईल.
अकबराच्या दरबारांतील तानसेनाने या रागाविषयी “कहे मिया तानसेन सुनो शाह अकबर। सब रागनमे प्रथम राग भैरव।” असे म्हटले आहे. संगीत मार्तंड पं. जसराजजी यांच्या संगीत शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांचे शिक्षण भैरव रागानेच सुरू होते हे बर्याचजणांना माहीत असेलच.
अतिशय संपन्न असे हे भैरव कूळ आहे. अनेक वर्षांपूर्वी कुमार गंधर्वांनी ‘भैरव के प्रकार’ अशी एक मैफील केली होती. ह्या मैफीलीत भैरवाबरोबरच सादरीकरणांत थोडेफार फेरफार करून अहीर भैरव, शिवमत भैरव, भवमत भैरव, बीहड भैरव, बैरागी भैरव, बंगाल भैरव, प्रभात भैरव, धुलिया भैरव, आनंद भैरव नटभैरव, भैरव बहार असे भैरवाचे अनेक प्रकार सादर करून श्रोत्यांना भैरवाचे वैभव दाखवून दिले होते.
“नवयूग चूमे नैन तुम्हारे” हे सलील चौधरींनी संगीतबद्ध केलेले भैरवातील गीत रात्रीकडून पहाटेकडे नेते. “जागो मोहन प्यारे” ह्या पारंपारिक बंदीशीत काही वेगळे शब्द आणि सूर चपखल बसवून लतादिदींच्या आवाजांत ऐकतांना वेगळाच आनंद मिळतो. खेड्यांतून शहरांत आलेला एक तरूणराज कपूरपाण्यासाठी वणवण फिरतो, पहाट होते, प्राचीवर सूर्यबिंब उगवते, पण पाणी न मिळाल्यामुळे त्रासलेल्या त्याला एक सामान्य पाणी भरणारी स्त्रीनर्गीसत्याच्या ओंजळीत घागरीने पाणी घालते. भैरवाच्या सुरांनी भरलेली ती पहाट~चित्रपट संपतो पण भैरव कायम मनांत रेंगाळतो.
कालिंगडा, रामकली,जोगिया ही भैरवाचीच रूपे! “मोहे भूल गये सांवरिया” हे बैजू बावरांतील गीत, सामनामधील “तुम्हावरी केली मी मर्जी बहाल”, जाळीमंदी पिकली करवंद”ह्या लावण्या म्हणजे भैरवाचे चंचल रूप कालिंगडा.
रामकलीतून भैरवाचे मृदू स्वरूप दिसते.भीमसेन जोशी “सगरी रैन मै जागी”ह्या बंदीशीने सवाई गंधर्व उत्सवाची सांगता करीत असत.
जोगिया म्हणजे करूण रसांत भिजलेला भैरव!”पिया मिलनकी आस”ही ठुमरी ऐकतांना डोळे न पाणावणारा श्रोता विरळाच.सौभद्र नाटकांतील”माझ्या मनीचे हितगूज सारे ठाऊक कृष्णाला”हे बाल गंधर्वांनी अजरामर केलेले पद.गीत रामायणातील परित्यक्ता सीतेच्या तोंडी असलेले “मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे”हे गीत श्रोत्यांना देहभान विसरावयास लावते.
असे हे सूर संपन्न भैरव खानदान! हे जाणून घेतल्याशिवाय संगीत शिक्षण अधूरे आहे.
क्रमशः ….
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈