सुश्री आसावरी केळकर-वाईकर
☆ सूर संगत ☆ होलिकोत्सव विशेष – सूरसंगत (भाग – २३) – ‘सुर संग रंग’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆
दुपारी उज्वलाताईंचा फोन आला कि, उद्या होळी आहे तर तू उद्याचा लेख ‘होरी’ वर लिही आणि मला पटकन सुरेश भट साहेबांनी लिहिलेलं आपलं एक मराठी भावगीत आठवलं
‘आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी!’ मग जुन्या अभ्यासाच्या वह्या बाहेर काढल्या, वाचनातून मेंदूतल्या ‘होरी’च्या फोल्डरमधे असलेले संदर्भ गोळा करण्यासाठी स्मरणशक्तीला ताण दिला. सगळ्याचा मागोवा घेताना अगदी औरंगजेबाच्या संगीतप्रेमासहित बराच खजिना हाती लागला त्याविषयी पुढं लिहीनच, मात्र मगाचच्या गीताचा उल्लेख करण्याचं कारण म्हणजे सगळ्या माहितीतला एक समान धागा त्या एका ओळीतून दिसतो.
‘होरी’च्या एखाद्या प्रकारानुसार त्याची गायनशैली बदलत जाते मात्र त्यातल्या गीताचे शब्द हे होळीच्या उत्सवाचं वर्णन करणारेच असतात… अर्थातच ही गीतं ह्याच कारणास्तव ‘होरी’ किंवा ‘होरीगीत’ म्हणून ओळखली जाऊ लागली. वरील भावगीताचा विचार केला तर वर्णन वृंदावनातल्या होलिकोत्सवाचेच आहे मात्र ह्यातले काव्य वृत्तबद्ध आहे, भटसाहेबांचं शब्दलावण्यही संपूर्ण रचनेत दिसून येतं… कारण विषय ‘होरी’चाच आहे मात्र काव्याला केंद्रबिंदू मानून त्याची रचना झाली आहे. म्हणूनच हे गीतप्रकाराच्या दृष्टीने हे भावगीत आहे, होरी नाही. पारंपारिक होरीगीतांचा विचार करता एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते कि, होळीचे वर्णन असणे इतपतच तिथं साहित्याला/ काव्याला महत्व आहे. मात्र त्याला दर्जेदार साहित्य, उत्कृष्ट काव्य म्हणता येईल असे बहुतांशी नाहीच.
‘होरी’चं मूळ शोधताना पूर्वीच्या लोकसंगीतातच हा प्रकार मोडत असल्याचे दिसून येते. समूहानं रंग खेळत असताना ही गीतं गायली जात. अर्थातच त्यावेळी एखाद्या गायनशैलीशी ही गीतं जोडली गेलेली नसावीतच. फक्त तो उत्सव साजरा करतानाचा आनंद समर्पक पण बोलीभाषेतील शब्दांच्या आधारे सहजस्फूर्त सुरावटींत व्यक्त करणे हेच इतर लोकसंगीतप्रकारांप्रमाणे घडत असावं. त्यामुळं ‘काव्य’ म्हणून ते लिहिणं, त्याचा साहित्यिक दर्जा ह्या गोष्टींचा विचारच तिथं अपेक्षित नाही.
पूर्वीच्या ‘ब्रज’ प्रदेशातील म्हणजे आजच्या मथुरा-वृंदावन व आजूबाजूच्या बऱ्याचशा प्रदेशातील होलिकोत्सव’ देशभर प्रसिद्ध आहे. असं वाटतं कि, तिथल्या ह्या होलिकोत्सवाला मोहक वलय द्वापारयुगात जसं कृष्णाशी ह्या उत्सवाचं नातं जोडलं गेलं तेव्हांपासून प्राप्त झालं असावं आणि ते साहजिकही आहे. साक्षात मनमोहनासोबत रंग खेळून होळी साजरी करण्यापेक्षा देखणा उत्सव कोणता असू शकतो! परंपरागतपणे त्या प्रदेशात पुढंही धामधुमीत हा उत्सव साजरा होत राहिल्यानं त्याचं वर्णन सर्वदूर पोहोचून तो प्रसिद्ध झाला असेल. त्याच काळापासून कदाचित ‘होरी’गीतांमधे बहुतांशी कृष्णासोबत साजऱ्या होणाऱ्या होळीचं वर्णन येऊ लागलं असावं. शिवाय पारंपारिक होरीगीतं ही ‘ब्रज’ भाषेतच आढळतात. त्याआधीच्या ‘लोकसंगीतातील’ होरीगीतं कशी होती हे माझ्या वाचनात आलेले नाही, मात्र त्यात कृष्ण-गोपिकांत रंगलेल्या होळीची वर्णनं असण्याची शक्यता नसणारच!.. अर्थात हा सगळा माझा ह्याबाबतीतला ‘होरा’ आहे!
पुढं कागदोपत्री ‘होरीगीतां’बाबत जे उल्लेख आढळतात ते फार रंजक आहेत. लोकसंगीतातूनच शास्त्रीय संगीत निर्माण झाले. अर्थातच पुढं ह्या शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांनाही मूळ लोकसंगीताने भुरळ घातली नसती तरच नवल होतं. त्यामुळं झालं असं कि लोकसंगीतातल्या ज्या काही उत्तम संगीतधुनी शास्त्रीय संगीताच्या आधारे सुंदर सजवून त्या गायनशैलीच्या निदान एका उपप्रवाहात आणता येतील त्या ‘उपशास्त्रीय’ ह्या प्रकारात अभ्यासू कलाकारांकडूनच सामावून घेतल्या गेल्या. विचार करता सहज लक्षात येईल होरी, चैती, झूला, कजरी इत्यादि आजच्या उपशास्त्रीय संगीतातील कित्येक प्रकार आपल्याला थेट लोकसंगीताच्या पाऊलवाटेशी नेऊन सोडतात.
ह्यापैकी ‘होरी’ गीतांबाबत विचार करायचा झाला तर धृपदशैली प्रचारात असताना त्या शैलीनुसार दुगुन, चौगुन, बोलतान, गमकाचा गीतविस्तारासाठी वापर करून ‘धमार’ ह्या चौदा मात्रांच्या विशिष्ट तालात जी गीतं गायली जाऊ लागली ती ‘धमार’ ह्याच नावानं ओळखली गेली. मात्र ह्या गीतांचे शब्द होलिकोत्सवाचे वर्णन करणारे असायचे. ‘धमार’ गाताना रागाची चौकट पाळूनच गायन केले जाते त्यामुळं शास्त्रोक्त पद्धतीनं धृपदशैली शिकलेल्यांनाच चांगल्याप्रकारे धमार गाता येतो. आजही धृपदगायकच उत्तमप्रकारे ‘धमार’ गाताना आढळून येतात. तर ‘धमार/धमारी/धमाली’ (प्रचारातील नांव ‘धमार’च!) हा एक होरीगीतांतलाच प्रकार आणि ह्या प्रकाराला ‘पक्की होरी’ असं म्हटलं जातं. याशिवाय धमार तालात फक्त काही वैष्णव संतांनी भक्तिरचना केलेल्या व त्यांनाही ‘धमार’ असेच संबोधले गेल्याचे व आजही त्यांचे अनुवंशी कीर्तनकार त्याला धमारच म्हणत असल्याचे आढळते. पुढं यवनकाळात आश्रयदात्या राजांविषयी स्तुतीपर शब्द काही बंदिशींच्या गीतांत रचण्याचा प्रकार सुरू झाला त्याला धमारही अपवाद नव्हते. फक्त धमारात होलिकोत्सवाविषयीच्याच काव्यात खुबीनं असे शब्द गुंफले जात. त्याविषयी माहिती पुढं येईलच.
‘कच्ची होरी’ ह्या प्रकारांतर्गत पुढील प्रकार येतात.
ख्यालगायनशैलीचा बराचसा प्रभाव असणारा उपशास्त्रीय संगीतातील ‘ठुमरी’ हा जो प्रकार आहे त्यापद्धतीने जी होरीगीतं गायली जातात त्यांना ‘होरी-ठुमरी’ असं म्हणतात. खरंतर ही ठुमरीच, फक्त त्यातलेही काव्य होलिकोत्सवात रंगलेले असते. ही गीतं दीपचंदी, तीनताल, जतताल इ. ठुमरीसाठी वापरल्या जाणाऱ्या तालांतच गायली जातात. ह्या प्रकारांत मात्र रागाची चौकट पाळण्याचे बंधन नसते. ह्या गीताच्या विस्तारक्षेत्रात अनेक रागांना सामावून घेतले जाऊ शकते.
अशा प्रकारची काही होरीगीतं अगदी रागाच्या बंदिशीसारखी असतात. त्यांचा विस्तार रागाचे नियम पाळून बंदिशीप्रमाणेच केला जातो. रागानुसार काहीवेळा विस्तारढंग बदलतो… तो ठुमरीकडे जास्त झुकणारा असेल तर ती गीतं ‘बंदिश की ठुमरी’ ह्या प्रकारांतर्गतही धरली जातात. इतर होरीगीतं जी साधारण ‘दादरा’ ह्या उपशास्त्रीय गीतप्रकारानुसार गायली जातात त्यांना ‘होरी’ ह्याच नावानं ओळखलं जातं. ती दादरा किंवा केहरवा तालात निबद्ध असतात. ह्यांच्या विस्तारात रागनियम पाळण्याचे बंधन नसते.
संगीताविषयी विशेष रुची नसलेल्या व्यक्तीवर सहजपणे ‘हा संगीतातला औरंगजेब आहे’ अशी टिप्पणी केली जाते. औरंगजेबाच्या संगीतद्वेषाच्या कित्येक कथा प्रसिद्ध आहेत. मात्र लिखितस्वरूपात औरंगजेबाच्या संगीतप्रेमाविषयी जे स्पष्ट उल्लेख आढळतात त्यात ‘होरी’ला किंबहुना ‘धमार/धमारी’ला स्थान आहे. औरंगजेब मंगलामुखींसोबत (गणिका) अगदी उत्साहाने, जोशपूर्ण रीतीने होळी खेळायचा आणि त्यावेळी त्या गातगात अशी प्रार्थना करायच्या कि, ‘शहेनशहा औरंगजेबाचे आयुष्यमान लोमश ऋषींसारखे असावे आणि त्यांनी नेहमी आपल्यासोबत अशीच जोशपूर्ण होळी खेळत राहावे!’ पूर्वी अकबर, शहेनशहा ह्या कलाश्रयी राजांची प्रशंसा काही बंदिशींतून दरबारगायक करत असत. त्याचप्रमाणे ती औरंगजेबाच्या काळी त्याच्याबाबतही केली गेली. औरंगजेब हा संगीतातला मर्मज्ञ होता, त्याला संगीताची कदर होती, मात्र काही ‘राजनैतिक’ कारणांमुळं त्यानं आपल्या दरबारातून संगीताला बहिष्कृत केले होते असाही उल्लेख आढळतो. तर ‘धमारा’ची रंगीन धूमधाम ही फक्त लोकजीवनात व वैष्णवांच्या मंदिरांपुरतीच मर्यादित न राहाता पार औरंगजेबाच्या अंत:पुरापर्यंत पोहोचली होती असं म्हणायला हरकत नाही.
अकबराच्या काळच्या एका धमाराचा अर्थ भारी गंमतशीर आहे. एकीकडे नायिकेच्या सख्या त्यांच्या मैत्रिणीला म्हणतात, ‘असं रुसून बसून काही साधणार नाही, होळी खेळलीस तरच तुझी मनोकामना पूर्ण होईल’ आणि दुसरीकडे अकबराला म्हणतात, ‘हिची समजूत इतकी सहजी पटणार नाही. शाह जल्लालुद्दीन तुम्ही ‘फगुआ’ (फाल्गुनात दिली जाणारी भेटवस्तू) द्या, म्हणजे आपोआप ती तुम्हाला वश होईल.’ त्या धमाराचे शब्द आहेत-
होरी खेलेई बनैगी, रूसै अब न बनैगी।
मेरो कहो तू मानि नवैली, जब वा रंग में सनैगी॥
कैई बेरि आई-गई तू, नाही मानत ऊंची करि ठोडी भौहें तनैगी।
साहि जलालदीन फगुआ दीजै, आपुतें-आप मनैगी॥
ख्यालगायनशैलीला जनमानसांत स्थान मिळवून देणाऱ्या मोहम्मदशाह रंगीलेच्या दरबारातील सदारंग, अदारंग व महारंग ह्या त्रिमूर्तींपैकी ‘सदारंगांनी’ रागांच्या अनेक बंदिशींप्रमाणेच काही धमारांमधेही मोहम्म्दशाहचे नाव गुंफल्याचे दिसून येते. पुढं सदारंगांचे पुत्र मनरंग ह्यांच्याही ‘धमार’रचना आढळतात. तसेच नूररंग ह्यांनीही ‘धमारी’ रचल्याचे आढळून येते. मात्र ह्या सर्वांनीच धमाराचं कृष्णाच्या लीलांशी असलेलं नातं जपून त्यानुसारच रचनांचं लेखन केल्याचं दिसून येतं.
जाताजाता, आपणां सर्वांना होलिकोत्सवाच्या अनेकरंगी शुभेच्छा!
क्रमश:….
© आसावरी केळकर-वाईकर
प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत (KM College of Music & Technology, Chennai)
मो 09003290324
ईमेल – [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈