सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत ☆ सूरसंगत (भाग – २४) – ‘एकमेवाद्वितीय आशाबाई’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

आपलं बालपण आणि मग पर्यायानं जगणं समृद्ध करण्यात अनंत गोष्टींचा हातभार असतो. माझ्या पिढीच्या बालपणाचा विचार केला तर ‘आकाशवाणी केंद्र’ आणि त्यामुळं वाट्याला आलेले दर्जेदार सूर, शब्द, विचार ह्या गोष्टींचा वाटा फारच मोलाचा आहे. म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टींत खूप वैविध्य होतं… फक्त सुराचा विचार केला तरी किती विविध सूर ह्या रेडिओ नावाच्या अद्भुत यंत्रानं आयुष्यात आणले. किशोरीताई, भीमसेनजी, कुमारजी, जसराजजी, शोभाजी, आशाबाई, लताबाई, सुधीर फडके, सुमनताई, वाडकरजी, अनुराधाजी हा प्रत्येकच आणि असे अनेक सूर म्हटलं तर किती वेगळे पण तितकेच देखणे! गुलाब, मोगरा, शेवंती, अबोली, जाई-जुई अशा प्रत्येकच फुलाचं सौंदर्य वेगळं… त्यांत तुलना कशी आणि कोणत्या निकषावर करणार!? माझ्याही मनात ह्या प्रत्येक सुरानं सौंदर्याची व्याख्या जास्त गडद आणि विस्तृत करत नेली. त्यांचे ऋण हे शब्दातीत आहेत.

मागच्या आठवड्यात आशाबाईंना ‘महाराष्ट्र भूषण’ सन्मान घोषित झाला. खरंतर, मुळातच दैवी अंशानं सन्मानित झालेल्या व्यक्तींना मिळालेला कोणताही सन्मान, पुरस्कार हा त्या पुरस्काराचाच दर्जा वाढवणारा असतो. त्यामुळं त्याविषयी लिहिण्याचं काही प्रयोजनच नाही. मात्र ह्या बातमीच्या निमित्तानं पुन्हा आपसूक माझ्या मनोविश्वातला ‘आशा भोसले’ हा अमाप देखणा कोपरा धुंडाळला गेला. आशाबाईंच्या गळ्यातल्या बहुपैलुत्वाविषयी मी नव्यानं काही लिहावं इतका माझा वकुब नाही. म्हणून माझ्या त्या सुराशी असलेल्या नात्याला निरखावं हा सोपा मार्ग मी निवडला. आशाबाईंचा सूर हा खूप आपुलकीनं आपल्याला हृदयाशी धरतो असं मला वाटतं. एखाद्या शब्दलेण्याच्या अर्थाकाराशी एकरूपत्व साधत त्या भावविश्वात एका असोशीनं स्वच्छंदपणे किंबहुना स्वैरपणे स्वत:ला झोकून देण्याचा आशाबाईंच्या सुराचा जो स्वभावधर्म आहे त्याला अक्षरश: तोड नाही! अशा त्या झोकून देण्यातलं उन्मुक्तपणच मग ऐकणाऱ्याला आवेगानं येऊन भिडतं आणि तिथेच आशाबाई ह्या ‘एकमेवाद्वितीय’ ठरतात.

तैयार, संस्कारी गळा हे तर गाणाऱ्याचं माध्यम! मात्र आपल्या सुरानं ऐकणाऱ्याच्या भावविश्वात घरटं बांधणं हे अलौकिकत्वाचं देणं आणि ते फेडताना ज्या काळजातून तो सूर उमटतो त्या काळजाचंही तावून-सुलाखून निघणं ओघानं आलंच! म्हणूनच तर ‘भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी’ हे गाताना हुंदके देत ढसाढसा रडणाऱ्या आशाबाई आणि त्यामुळं त्यादिवशी कितीतरीवेळा स्थगित झालेलं रेकॉर्डिंग, ही कथा ऐकायला मिळते. अशी संवेदनशीलता राखल्याशिवाय तो सूर ऐकणाऱ्यांची मनं आरपार छेदून जाणं कसं शक्य होईल!? एखाद्या सुरातल्या रसरशीत जाणिवाच तर ऐकणाऱ्याच्या मनात उतरतात आणि जाणिवांची ती अपार तरलता आशाबाईंच्या सुरांत लख्ख दिसते, म्हणून त्या आपल्या काळजाशी इतक्या सहजी संधान बांधू शकतात.

कोणताही गीतप्रकार असो… प्रत्येकच गीत `हे आशाबाईच गाऊ शकतात’ असं वाटायला लावतं, ह्याचं कारण म्हणजे केवळ त्यांना लाभलेला दैवी सूर नव्हे तर त्यांचा समर्पणभाव! पाणी जसं स्वत:चं वेगळं अस्तित्व विसरून आपल्याला येऊन मिळणाऱ्या रंगात रंगून जातं तसं आशाबाई त्या-त्या रचनेच्या शब्द-सुरांशी एकाकार होऊन जातात आणि मग तिथं काहीच ‘टिपिकल’ न उरता खास त्या-त्या रचनेचा असावा तोच रंग आशाबाईंच्या सुरांतून ओतप्रोत ओसंडत राहातो. ह्या सुराच्या किती आणि कायकाय आठवणी सांगाव्या… आणि सांगायला गेलंच तरी त्या कुठून सुरू कराव्या आणि कुठं व कसं थांबावं तरी!…

‘गोरी गोरी पान फुलासारखी छान’, ‘चंदाराणी का ग दिसतेस थकल्यावाणी’, ‘झुकुझुकु झुकुझुकु आगीनगाडी’, ‘नाच रे मोरा नाच’, ‘शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा’ अशी गीतं ऐकताना अगदी लहान, गोंडस, गोबऱ्या गालांचं मूल ज्यांच्या सुरांतून हसताना स्पष्ट जाणवतं तोच सूर ‘कुठं कुठं जायाचं हनिमुनला’ ह्या शब्दांना न्याय देताना तसूभरही मागं राहात नाही. ‘अजि मी ब्रम्ह पाहिले’, ‘ब्रम्हा विष्णु आणि महेश्वर’ ह्या शब्दांतलं ब्रम्ह ज्यांच्या सुरांतून प्रकट होतं, ‘हरिनाम मुखी रंगते, एकतारी करी वाजते’ ह्या शब्दांतला मीरेचा प्रेमभाव ज्या सुरांतून झरलेला ऐकताना डोळ्यांच्या कडा ओलावतात, ‘जन्मभरीच्या श्वासांइतुके मोजियले हरिनाम, बाई मी विकत घेतला श्याम’ ह्या भाबड्या शब्दांतला अतूट भक्तिभाव जे सूर स्पष्ट दाखवतात तेच सूर ‘जा जा जा रे नको बोलू जा ना’, ‘हवास मज तू, हवास तू’, ‘शारद सुंदर चंदेरी राती’ ‘चढाओढीनं चढवित होते, बाई मी पतंग उडवित होते’, ‘एक झोका चुके काळजाचा ठोका’, ‘येऊ कशी प्रिया’, ‘जांभुळपिकल्या झाडाखाली’, ‘बाई माझी करंगळी मोडली’, ‘रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना’ असे कित्येक अनोखे भावही अगदी नेमकेपणी टिपून ते आपल्या मनात उतरवतात. ह्यातल्या कुठल्याच रंगात रंगून जाताना तो सूर जराशीही गल्लत करत नाही.

‘तरुण आहे रात्र अजुनी’ मधल्या ऐन तारुण्यात वैधव्य भाळी आलेल्या सैनिकाच्या पत्नीचा तो मूक आकांत, ‘चांदण्यात फिरताना माझा धरलास हात’ ऐकताना श्वासांत जाणवू लागलेली थरथर, ‘का रे दुरावा का रे अबोला’ मधली ती काळजाला हात घालणारी मनधरणी,  ‘देव जरी मज कधी भेटला’ मधे उतरलेलं मूर्तिमंत आईचं काळीज, ‘नभ उतरू आलं’ मधलं त्या सुराचं झिम्माडपण, ‘गेले द्यायचे राहून’ मधली जखम भळभळत ठेवणारी खंत, ‘दिसं जातील दिसं येतील’ मधल्या संयमी सुरांतून डोकावणारा आशावाद, ‘केव्हांतरी पहाटे’ मधल्या सुरांतला गूढ चांदणभास, ‘मल्मली तारुण्य माझे,  तू पहाटे पांघरावे’ मधली ती प्रणयोत्सुकता, ‘जिवलगा राहिले रे दूर घर माझे’ म्हणत त्या परमोच्च शक्तीला घातलेली विरक्तीभरली साद, ‘पाण्यातले पाहाता प्रतिबिंब हासणारे’ ऐकताना ओठांवर येणारं लाजरं हसू आणि मनात उमलणारे ते नवखे भाव, ‘भोगले जे दु:ख त्याला’ मधली मन कुरतडणारी वेदना,

‘खेड्यामधले घर कौलारू’ मधली डोळ्यांसमोर सुरम्य खेडं उभं करणारी रमणीयता, ‘समईच्या शुभ्र कळ्या’मधलं एक अगम्यपण, ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’ म्हणतानाचं सुरूपता वाट्याला न आल्यातलं दुखरेपण आणि एके क्षणी सत्य उमजल्यावर सुरांत उतरलेला त्या पिल्लाच्या देहबोलीतला डौल, ‘मी मज हरपुन बसले गं’ म्हणतानाचं ते सुराचं हरपलेपण, ‘स्वप्नात रंगले मी’ ऐकणाना आपलं भावविभोर होत गुंगून जाणं, ‘स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हां’ मधल्या अपूर्णतेतल्या गोडीनं अवघा जीव व्यापून टाकणं… हा प्रत्येक आणि असे अजून कित्येक भावरंग नेमकेपणी अनुभवताना आपण आशाबाईंच्या सुराचं न फेडता येण्यासारखं देणं लागतो.

आजच्यासारखी ‘ब्रेक-ब्रेक के बाद’ रेकॉर्डिंगची सोय उपलब्ध नसताना ‘जिवलगा कधी रे येशील तू’ सारखी पाच रागांत बांधलेली अवघड रचना सहजसुंदर सुरांत पेलणं, ‘घनरानी साजणा’ मधली सुराची जितकी उंची तितकीच खोलीही सहजी जपणं, ‘चांदणे शिंपीत जाशी’ मधली चंचलता सांभाळतानाही सुराचं नेमकेपण जपणं, वडील मा. दीनानाथांच्या शैलीत त्यांनी सादर केलेली नाट्यपदं अशा कित्येक गोष्टी दैवदत्त देखण्या सुराला आशाबाईंनी मेहनतीनं पाडलेले पैलूही दाखवतात… अर्थात मी करत असलेलं हे सगळंच वर्णन म्हणजे मुळाक्षरं गिरवत असलेल्या चिमुरड्यानं अनभिज्ञतेच्या कोषात असताना एखाद्या प्रतिभासंपन्नतेची स्तुती करण्याइतकं बालिश आहे. मात्र ह्या असामान्य सुरावर वेडं प्रेम करायला तर कोणत्याच गुणवत्तेचा निकष लागू होत नाही. त्याच प्रेमभावानं आज मी ‘ज्योतीनं तेजाची आरती’ असा प्रकार केलाय. अक्षरश: तसाच प्रकार… म्हणून केवळ बसल्याबसल्या मनात सहजी उमटलं ते लिहीत गेले, एक सामान्य पण वेडं प्रेम करणारी रसिक म्हणून! त्यांच्या सगळ्या कामाचा हा धावता आढावा म्हणावं इतकाही ह्याचा आवाका नाही. त्यांचा उर्दू, हिंदी ह्या भाषांचा अभ्यास आणि त्यातलं अजोड असं सांगितिक कर्तृत्व ह्या गोष्टीकडे वळायचं तर यादी संपता संपणार नाही. मराठीतलीच आधी कुठं संपलीये म्हणा!

आशाबाई, तुमच्या सुराविषयी, तुमच्या संगीतप्रवासाविषयी नुसतं लिहायच्या कल्पनेनंही दमछाक होतेय! तुमचा सूर, त्याचं अलौकिकत्व, समर्पणभावानं तुमचं त्याच्याशी तादात्म्य पावणं हे आम्ही फक्त अनुभवावं आणि त्या दिव्य अनुभूतीच्या ऋणात राहावं! तुम्ही आणि तुमचा सूर चिरंतन होवो, ही त्या विश्वनियंत्याकडे आम्हा संपूर्ण ई-अभिव्यक्ती परिवाराची मन:पूर्वक प्रार्थना!

क्रमश:….

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments